‘नंबर वन होऊ या’
By admin | Published: January 13, 2017 04:26 AM2017-01-13T04:26:28+5:302017-01-13T04:26:28+5:30
भाजपा कार्यकारिणीने ज्या पद्धतीने नगरपालिका निवडणुकीत काम करून पक्षाला राज्यात नंबर वन केले, त्याच पद्धतीचे काम
ठाणे :भाजपा कार्यकारिणीने ज्या पद्धतीने नगरपालिका निवडणुकीत काम करून पक्षाला राज्यात नंबर वन केले, त्याच पद्धतीचे काम करून जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिका निवडणुकीतही भाजपालाच नंबर वन करायचे स्वप्न डोळ्यांसमोर ठेवून, या निवडणुकांना सामोरे जाऊन नंबर वन होऊ या, असे आवाहन भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी ठाण्यात कार्यकर्त्यांना केले.
भाजपाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक गुरुवारी ठाण्यातील टिपटॉप येथे पार पडली. यावेळी ज्या सभागृहात ही बैठक आयोजित करण्यात आली होती, त्याला स्व. जयवंतीबेन मेहता सभागृह नाव दिले होते. यापूर्वी ठाण्यात १९९२ मध्ये भाजपा कार्यकारिणीची बैठक झाली होती. त्यानंतर, आता सुमारे २५ वर्षांनंतर ही बैठक होत आहे. असे असले, तरी ठाणे जिल्हा हा भाजपाचा बालेकिल्ला असून, या जिल्ह्याने रामभाऊ म्हाळगी, रामभाऊ कापसे अशांसारखे दिग्गज लोकसभेला दिले, तर जगन्नाथ पाटील, वसंत पटवर्धन, अरविंद पेंडसे आदींनीदेखील महत्त्वाचे योगदान दिल्याच्या इतिहासाला उजाळा दिला. नोटाबंदीच्या निर्णयानंतरही राज्यातील जनतेने भाजपाला कौल देत, तब्बल ७२ नगराध्यक्ष आणि १२०० नगरसेवक निवडून दिले. अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याचे १५ वर्षांत केवळ स्वप्नच काँग्रेसने पाहिले, परंतु त्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवले ते भाजपा सरकारनेच. इंदू मिलची जागादेखील देण्याचे काम भाजपा सरकारने केले ओबीसींसाठी स्वतंत्र महामंडळ व स्वतंत्र मंत्रालय असावे, अशी मागणी केली जात होती. त्यानुसार, मंत्रालय मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्र मंत्रालय स्थापन केल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
हिणवणाऱ्यांना टोला
जे जातीयवादी म्हणून भाजपाला हिणवत होते, त्यांनीदेखील आमच्याबरोबर एकाच ताटात खरकटे खाल्ले होते, असा टोला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी लगावला.