धीर धरा, आरक्षण मिळेल, टोकाचे पाऊल उचलू नका; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भावनिक आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2023 05:56 AM2023-10-23T05:56:26+5:302023-10-23T06:00:04+5:30
सरकार कायद्याच्या चौकटीत बसणारे आणि टिकणारे आरक्षण देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई/ठाणे : मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याचा शब्द मी दिला आहे. त्यामुळे माझ्या भावांनो आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नका. कुटुंबासाठी तुम्ही लाखमोलाचे आहात, असे भावनिक आवाहन करतानाच सरकार कायद्याच्या चौकटीत बसणारे आणि टिकणारे आरक्षण देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
शासनाने केलेली क्युरेटिव्ह याचिका १३ ऑक्टोबर २०२३ रोजी सुप्रीम कोर्टाने दाखल करून घेतली आहे. आरक्षणाबाबत वस्तुस्थितीदर्शक बाजू प्रभावीपणे मांडण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. मराठा समाजातील तरुणांच्या आत्महत्येच्या घटना ह्या दुर्देवी आणि दु:खदायक, वेदनादायी आहेत. माझी विनंती आहे की समाजातल्या माझ्या भावांनो टोकाचे पाऊल उचलू नका. बंधूंनो आपला जीव लाख मोलाचा आहे. आपल्या कुटुंबाचा, आई वडिलांचा, मुला बाळांचा विचार करा, अशी भावनिक साद देतानाच राज्य शासन मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करीत असल्याची ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.
मराठवाड्यात जुन्या नोंदींच्या आधारे कुणबी दाखले देण्यासाठी निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समितीची कार्यवाही सुरू आहे. खोलवर जाऊन नोंदी तपासण्याचे काम समितीमार्फत सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
आरक्षण मिळेपर्यंत जे लाभ आहेत ते मराठा समाजाला जास्तीत जास्त कसे मिळतील यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सागितले. मी देखील सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा असून समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणारे आणि टिकणारे आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध असल्याच्या पुनरूच्चारही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला.