रोषाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा; धनगर आरक्षणावरून पडळकरांचा शिंदे सरकारलाच इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2023 10:55 AM2023-11-17T10:55:49+5:302023-11-17T10:56:31+5:30
सर्व धनगर समाजाने २१ नोव्हेंबरला राज्यातील सर्व तहसिल कार्यालये, प्रांत अधिकारी कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयांवर जाऊन निवेदन द्यावे, असे आवाहन पडळकर यांनी केले आहे.
मराठा आरक्षणावरून राज्यात गेल्या काही महिन्यांपासून वातावरण तापलेले असताना आता ओबीसी समाजाने देखील आरक्षण बचाव आंदोलन सुरु केले आहे. यातच मराठा समाजाला पाठिंबा देणाऱ्या धनगर समाजाने आता हालचाली सुरु केल्या असून भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शिंदे सरकारला इशारा दिला आहे.
एकनाथ शिंदे, आपण राज्याचे मुख्यमंत्री आहात. आपली ओळख संवेदनशील नेता अशी आहे. तरी तुम्हाला राजधर्माची आठवण करून देण्याची वेळ माझ्यावर आली आहे. आपण मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यात सर्वांसाठी सर्वसमावेशक नेतृत्त्व करणार असल्याची प्रतिज्ञा होती. धनगर समाजाच्या आरक्षण अंमलबाजवणीसाठी शासनाने ५० दिवस दिले होते. आज ही मुदत संपली आहे. तरी या मुद्द्यावर शाकीय पातळ्यांवर काहीही ठोस हलचाल दिसत नाही. फक्त विशिष्ट समाजासाठी आपली वाटेल ते करायची तयारी आहे अशी धारणा बहुजन समाजाची आपल्या बद्दल होत आहे, अशी टीका पडळकर यांनी केली.
आघाडी सरकारने आरक्षण नाकारून धनगर जमातीवर अन्याय केला. शिंदेंच्या महायुतीच्या सरकारच्या नेतृत्त्वात धनगर आरक्षण अंमलबाजवणी होईल, ही आशा सामान्य धनगरांना होती. मात्र, त्यांच्याकडूनही निराशा पदरी पडत आहे. धनगर समाजाच्या उद्धारासाठी सुरु असलेल्या योजना बंद आहेत. त्या आमच्या आठही मागण्यांची अंमलबाजवणीची तात्काळ गरज आहे. समित्या गठित करून धनगर समाजाच्या पदरात यातून काहीही पडणार नाही, ही भावना समान्य धनगरांच्या मनात निर्माण होते आहे, असे पडळकर म्हणाले.
वेळीत योग्य पावले उचलावी आणि धनगर आरक्षणाचा मुद्दा निकालात काढावा. अन्यथा धगनर समाजाच्या संविधानिक प्रतिक्रियेला व आंदोलनाच्या रोषाला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी. हा इशारा राज्यातील तमाम धनगर समाजाच्यावतीने मी तुम्हाला देत आहे. सर्व धनगर समाजाने २१ नोव्हेंबरला राज्यातील सर्व तहसिल कार्यालये, प्रांत अधिकारी कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयांवर जाऊन निवेदन द्यावे, असे आवाहन पडळकर यांनी केले आहे.