लसीकरणानंतर दुष्परिणाम झाल्यास उपचाराची तयारी ठेवा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2021 07:16 AM2021-01-05T07:16:40+5:302021-01-05T07:17:01+5:30
Corona Vaccine: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ; कोरोना लसीकरणाचा घेतला आढावा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : उपचार करणाऱ्या डॉक्टरांना मार्गदर्शनासाठी टास्क फोर्ससारखी यंत्रणा तयार करावी. लसीकरणानंतर त्याचे काही दुष्परिणाम झाल्यास त्यावरील उपचाराची पूर्वतयारी ठेवा. आरोग्य संस्थांमध्येच लसीकरण करावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्य सचिवांना निर्देश दिले.
वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यानी कोरोना लसीकरणाचा आढावा घेतला. यावेळी मुंबई महापालिकेचे आयुक्त आय. एस. चहल, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी लसीकरणाच्या तयारीचे सादरीकरण केले.
ब्रिटनमधील नव्या कोरोना विषाणूमुळे राज्यात अधिक दक्षता घेत जात असली तरी परदेशातून अन्य राज्यात उतरून तेथून महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या प्रवाशांचा ओघ लक्षात घेता अशा प्रवाशांना ते उतरतील त्या विमानतळावरच क्वारंटाईन करण्याची मागणी केंद्र शासनाकडे करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री यावेळी म्हणाले, ब्रिटनमधून थेट मुंबईत उतरलेल्या प्रवाशांना नियमाप्रमाणे विमानतळावरून संस्थात्मक विलगीकरणात पाठविण्यात येते. मात्र, गेल्या काही दिवसापासून असे निदर्शनास आले आहे की, इतर राज्यातील विमानतळावर उतरून प्रवासी देशांतर्गत प्रवास करून महाराष्ट्रात येतात. त्यामुळे त्यांचा मागोवा काढणे शक्य होत नाही. केंद्र सरकारने अशा परदेश प्रवास करून आलेल्यांना त्या त्या विमानतळावरून क्वारंटाईन करावे.
या बैठकीस मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरव विजय, मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने आदी उपस्थित होते.
'त्या' प्रवाशांचा मागोवा काढणे अशक्य
n गेल्या काही दिवसापासून असे निदर्शनास आले आहे की, इतर राज्यातील विमानतळावर उतरून प्रवासी देशांतर्गत प्रवास करून महाराष्ट्रात येतात. त्यामुळे त्यांचा मागोवा काढणे शक्य होत नाही. केंद्र सरकारने अशा परदेश प्रवास करून आलेल्यांना त्या त्या विमानतळावरून क्वारंटाईन करावे.