शिवस्मारकाच्या खर्चाबाबत तारतम्य बाळगा
By admin | Published: January 5, 2017 03:56 AM2017-01-05T03:56:07+5:302017-01-05T03:56:07+5:30
अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक झालेच पाहिजे, त्याला आमचा विरोध नाही.
ठाणे : अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक झालेच पाहिजे, त्याला आमचा विरोध नाही. परंतु त्यावरील खर्चाबाबत तारतम्य बाळगणे गरजेचे असल्याचे मत राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. सध्या गेटवे आॅफ इंडिया आणि शिवाजी पार्क येथे शिवाजी महाराजांचे पुतळे आहेतच, त्यामुळे त्यांच्या स्मारकावर किती पैसे खर्च करावेत याचा पुनर्विचार होणे गरजेचे आहे, असे पवार म्हणाले.
बुधवारी मुंब्य्रातील स्टेडियमच्या लोकार्पण सोहळ्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. सहकारी साखर कारखाने विक्रीतील कथित घोटाळ्याबाबत ज्येष्ठ समजासेवक अण्णा हजारे यांनी केलेल्या आरोपांवर पवार म्हणाले, या निमित्ताने अण्णांनी त्यांच्या विरोधात बोलण्याची संधी दिली याचा मला आनंदच होत आहे. समाजसेवक म्हणून किती दिवस गप्प बसायचे? सल्लामसलत करुन त्यांच्यावर खटला दाखल करणार असून आता न्यायालयातच त्यांना उत्तर दिले जाईल.
गडकरी पुतळा उखडणे दुर्दैवी
नाटककार राम गणेश गडकरी उत्तम साहित्यिक होते, सामाजिक लिखाणातून त्यांनी आपली विचारधार व्यक्त केली. त्यांच्या पुतळ््याची विटंबना होणे ही अतिशय दुर्दैवी व निषेधार्ह घटना आहे, असे ते म्हणाले.
नोटाबंदीमुळे मर्यादित
जागा लढविणार
पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर झाल्या असून काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढविणार आहे. गोव्यात पहिल्यापेक्षा अधिक जागा लढवू. परंतु निवडणुका लढविण्यासाठी देखील पैसे लागतात. नोटबंदीमुळे आता निवडणुकीसाठी पैसे कोणत्या बँकेतून आणायचे, असा पेच सध्या आम्हाला पडला असल्याने आम्ही मर्यादीत जागेवरच निवडणुका लढविणार असल्याचे पवार यांनी जाहीर केले.
मैदानात काय खेळायचे हे
त्यांनी सांगायचे का ?
क्रिकेटच्या खेळात पारदर्शकता आणण्यासाठी ज्या समितीवर सहा कोटींचा खर्च करण्यात आले. त्याच समितीने क्रिकेटच्या बाबत अशा पध्दतीने निर्णय देणे योग्य नाही. क्रिकेटचे मैदान रिकामे असताना त्याठिकाणी टेनिस खेळावे असा सल्ला दिला जात आहे. क्रिकेटच्या मैदानावर काय खेळायचे ते आता यांनी आम्हाला सांगायचे का, अशा शब्दात पवार यांनी न्या. लोढा समितीच्या शिफारशींची खिल्ली उडवली.