समाजस्वास्थासाठी अंतर्मुख होऊन विचार व्हावा

By admin | Published: May 21, 2017 12:03 AM2017-05-21T00:03:18+5:302017-05-21T00:04:12+5:30

शारीरिक वा मानसिक छळ हा स्त्रीचा असो वा पुरुषाचा... छळ ही गोष्ट वाईटच आहे. निसर्गाने माणूस घडविताना स्त्री-पुरुष असा भेद केला नाही, मग तिथे भेद करणारे आपण कोण?

To be thoughtful about social life | समाजस्वास्थासाठी अंतर्मुख होऊन विचार व्हावा

समाजस्वास्थासाठी अंतर्मुख होऊन विचार व्हावा

Next

- अमित देशपांडे

विशेषत: ‘४९८-अ’ मधील काही तरतुदी, कौटुंबिक अत्याचार कायदा, व्यभिचारविषयक कायदे, लैंगिक छळ आणि बलात्कारासंबंधीचे कायदे, कौटुंबिक कायदे, घटस्फोट, पोटगी, मुलाचा ताबा इत्यादी लिंगनिरपेक्ष असावेत, अशी पुरुष संघटनांची मागणी आहे.

शारीरिक वा मानसिक छळ हा स्त्रीचा असो वा पुरुषाचा... छळ ही गोष्ट वाईटच आहे. निसर्गाने माणूस घडविताना स्त्री-पुरुष असा भेद केला नाही, मग तिथे भेद करणारे आपण कोण? या सगळ््याचा सारासार विचार केला, तरी खूप गोष्टी सुलभ होतील.

आपल्या समाजात पूर्वापार पुरुषप्रधान सत्ता आहे. परिणामी, आपल्याकडील घटना, कायदे स्त्रीकेंद्री आहेत. मात्र, आता काळानुरूप समाजात घडणाऱ्या घटनांचा विचार करून, या कायद्यांमध्ये बदल घडणे गरजेचे आहे. सगळे नागरी आणि फौजदारी कायदे स्त्री व पुरुष सर्वांसाठी सारखेच असावेत. विशेषत: ‘४९८-अ’ मधील काही तरतुदी, कौटुंबिक अत्याचार कायदा, व्यभिचारविषयक कायदे, लैंगिक छळ आणि बलात्कारासंबंधीचे कायदे, कौटुंबिक कायदे, घटस्फोट, पोटगी, मुलाचा ताबा इत्यादी लिंगनिरपेक्ष असावेत, अशी पुरुष संघटनांची मागणी आहे.
महिलांच्या तुलनेत हे प्रमाण खूपच कमी असले, तरी ‘पुरुषांचा छळ’ हीसुद्धा वस्तुस्थिती आहे, याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. सासरची मंडळी; विशेषत: नवऱ्याचे आई-वडील आलेले न खपणे, हे या छळवणुकीचे मुख्य कारण दिसते. कोणाचीही जबाबदारी नको, आपला राजा-राणीचा संसार सुखाचा. मात्र, या ‘सुखी संसारा’त माहेरची मंडळी चालतात, असे काहीसे विचित्र वातावरण अनेक घरांत बघायला मिळते. आपल्याला आई-वडील, आपले नातेवाईक हवेत, तसे आपल्या जोडीदारालाही हवेसे असतात, एवढा माणुसकीचा विचारही फारसा होताना दिसत नाही, तसेच या गोष्टींना खुद्द मुलीचे आई-वडील, नातेवाईक खतपाणी घालत असलेले दिसतात, असे समुपदेशक, विवाह संस्थाचालक असे या संबंधित अनेकांचे मत आहे. वर्तमानपत्रे, नियतकालिकांत प्रसिद्ध होणारी समुपदेशात्मक प्रश्नोत्तरे बघितली, तरी त्यात या स्वरूपाच्या प्रश्नोत्तरांचे प्रमाण अधिक असल्याचे दिसते. मात्र, आतापर्यंत मर्यादित असलेली ही चर्चा, पोलिसांच्या अहवालामुळे उघड झाली आहे. प्रमाण कमी असले, तरी पुरुषांचाही मानसिक (काही वेळा शारीरिकही) छळ होतो, ही वस्तुस्थिती असल्याचे उदाहरणांसह सिद्ध झाले आहे. अनेक पुरुष रीतसर तक्रार देण्यास धजावत नाहीत, असे निरीक्षणही पोलिसांनी नोंदवले आहे, त्यावरून परिस्थितीचे गांभीर्य लक्षात यावे.
आपल्या संसारात सासू-सासऱ्यांची अडचण होणे, या कारणाबरोबरच इतरही काही कारणे आहेत. सासूने सुनेसाठी साडी घेते म्हटल्यावर एखादी सून खूश झाली असती, पण या संबंधित सुनेचा तोल गेला आणि तिने भर रस्त्यात नवऱ्याबरोबर भांडण काढले, सासू-सासऱ्यांसाठी स्वयंपाक करणार नाही, नवऱ्याने लायकी काढली, आता त्याला त्याची लायकी दाखवते, इगो, विवाहबाह्य संबंध अशी कितीतरी कारणे या छळामागे आहेत. समजूतदारपणाचा अभाव, पटवून न घेणे, मी म्हणेन तेच खरे, माहेरचे किंवा मित्र-मैत्रिणींची फूस, तारतम्याचा अभाव, अविचारीपणा यामुळे अनेकींची वतर्वणूक अशी असल्याचे दिसते.
छळ हा स्त्रीचा असो वा पुरुषाचा... छळ ही गोष्ट वाईटच आहे. दुसऱ्यांना वेदना देण्याचा अधिकार आपल्याला कुणी दिला? निसर्गाने माणूस घडविताना स्त्री-पुरुष असा भेद केला नाही, मग तिथे भेद करणारे आपण कोण? या सगळ््याचा सारासार विचार केला, तरी खूप गोष्टी सुलभ होतील. केवळ एका व्यक्तीसाठी नव्हे, तर समाजस्वास्थ्यासाठी हे अशा प्रकारचे वातावरण योग्य नाही. त्यामुळे सुदृढ समाजाच्या निर्मितीसाठी अंतुर्मख होऊन विचार व्हायला पाहिजे.

(लेखक वास्तव फाउंडेशनचे संस्थापक आहेत.)
शब्दांकन : स्नेहा मोरे

Web Title: To be thoughtful about social life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.