वेळप्रसंगी त्याग करायला तयार राहा; शिवसेना बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2024 06:41 AM2024-03-20T06:41:15+5:302024-03-20T06:42:27+5:30
शिंदे यांच्यासोबत झालेल्या चर्चेत काही लोकसभा सदस्यांना पुन्हा उमेदवारी मिळणार नसल्याची माहिती देण्यात आल्याचे समजते.
लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: लोकसभा निवडणुकीत आपल्याला महायुती म्हणूनच काम करायचे आहे. त्यामुळे वेळप्रसंगी त्याग करायला तयार रहा. उमेदवार कोणताही असला तरी महायुतीचा उमेदवार म्हणून त्याच्यासाठी काम करण्याचा सल्ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना खासदारांच्या बैठकीत दिल्याची माहिती सुत्रांनी दिली. शिंदे यांच्यासोबत झालेल्या चर्चेत काही लोकसभा सदस्यांना पुन्हा उमेदवारी मिळणार नसल्याची माहिती देण्यात आल्याचे समजते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी मंगळवारी शिवसेना खासदारांची बैठक झाली. त्यात लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपावरून महायुतीत कोणताही दुरावा नाही. जागा वाटपात प्रत्येकाचा सन्मान राखला जाईल. जागा वाटपापेक्षा देशात एनडीएला ४००पेक्षा जास्त जागा कशा मिळतील व त्यासाठी महाराष्ट्रात ४५ जागांचे लक्ष्य कसे गाठता येईल, हेच महत्त्वाचे आहे. महायुतीला मजबूत करण्याचा निर्धार बैठकीत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्याची माहिती खा. राहुल शेवाळे यांनी दिली. शिवसेनेच्या खासदारांमध्ये कोणत्याही प्रकारची नाराजी नसल्याचा दावा त्यांनी केला.
मंगळवारी सकाळी ११:०० ते १:०० अशी दोन तास महत्त्वाची बैठक शिंदे यांच्या निवासस्थानी झाली. बैठकीला राहुल शेवाळे, राजेंद्र गावित, भावना गवळी, श्रीरंग बारणे, संजय मंडलिक आदी खासदारांसह इतर पदाधिकारी उपस्थित होते. शिंदे यांनी शिवसेनेच्या खासदारांसमवेत चर्चा केली व प्रत्येक मतदारसंघाची माहिती जाणून घेतली.
- येत्या एक ते दोन दिवसांत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करून जागा वाटपाचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती राहुल शेवाळे यांनी दिली. खासदारांमध्ये नाराजी नाही. शिंदे यांच्यावर पूर्ण विश्वास असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रसार माध्यमातून येणाऱ्या बातम्यांमुळे वातावरण दूषित होत असल्याचे शेवाळे म्हणाले.
‘राजसोबत काम करायला आवडेल’
राज ठाकरे यांचे महायुतीत नक्कीच स्वागत केले जाईल. आम्हाला त्यांच्यासोबत काम करायला आवडेल, जागा वाटपाचा निर्णय वरिष्ठ नेते घेतील. त्यांच्या निर्णयाची अंमलबजावणी आम्ही करू.
- नरेश म्हस्के, प्रवक्ते, शिवसेना