वर्सोवा ते मढ सागरीसेतूच्या गटांगळ्या; प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध
By admin | Published: September 1, 2014 03:35 AM2014-09-01T03:35:43+5:302014-09-01T03:35:43+5:30
वर्सोवा ते मढ दीड तासाचा प्रवास अवघ्या १५ मिनिटांवर आणणाऱ्या पालिकेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची होडी गटांगळ्या खाऊ लागली आहे़
शेफाली परब-पंडित, मुंबई
वर्सोवा ते मढ दीड तासाचा प्रवास अवघ्या १५ मिनिटांवर आणणाऱ्या पालिकेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची होडी गटांगळ्या खाऊ लागली आहे़ मढ-मनोरी या बेटांना उपनगराशी जोडणाऱ्या सागरीसेतूला स्थानिक मच्छीमार समाजाने विरोध केला आहे़ या प्रकल्पामुळे गावठाण संस्कृतीला धोका असल्याने सेतूचे काम होऊ देणार नाही, अशी भूमिका येथील रहिवाशांनी घेतली आहे़
मढ-मनोरी अशा बेटांवर राहणाऱ्या रहिवाशांना उपनगरात येण्यासाठी फेरी बोटीशिवाय पर्याय नाही़ या गैरसोयीचा सर्वाधिक फटका रुग्ण, गर्भवती महिला व रुग्णांना बसतो़ त्यामुळे वर्सोवा ते मढ व मालाड ते मनोरी असे दोन सागरीसेतू बांधण्याचा निर्णय पालिकेने २०११मध्ये घेतला़ या प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यासाठी सल्लागार नेमण्याची प्रक्रियाही सुरू झाली; तरीही तीन वर्षे हा प्रकल्प धूळखात पडला़ काही आठवड्यांपूर्वीच या प्रकल्पाला गती मिळून पालिका अधिकाऱ्यांनी वर्सोवा व मढची पाहणी केली़ त्या वेळी या सर्वेक्षणात गावठाणमधील रहिवाशांनी व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला़ या विरोधामुळे हा प्रकल्प पुन्हा एकदा रखडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत़ त्यामुळे या रहिवाशांचे मनपरिवर्तन होईपर्यंत या प्रकल्पाला ब्रेक लागला आहे़