बीडमध्येही तब्बल साडेपाच कोटी रोखीने काढले!
By admin | Published: July 6, 2015 02:03 AM2015-07-06T02:03:33+5:302015-07-06T02:03:33+5:30
अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष रमेश कदम व व्यवस्थापकीय संचालक यांनी मोबाईलवरुन दिलेल्या आदेशावरुन पाच व्यक्तींनी तब्बल ५ कोटी ५२ लाख ५० हजार रुपये बँकेतून रोखीने काढले होते.
शिरीष शिंदे, बीड
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष रमेश कदम व व्यवस्थापकीय संचालक यांनी मोबाईलवरुन दिलेल्या आदेशावरुन पाच व्यक्तींनी तब्बल ५ कोटी ५२ लाख ५० हजार रुपये बँकेतून रोखीने काढले होते. या घोटाळ्याप्रकरणी तत्कालीन व्यवस्थापकासह इतरांवर दोन महिन्यांपूर्वी गुन्हा दाखल झाला़ मात्र, बँकेतून पैसे काढणाऱ्या ह्यत्याह्ण पाच व्यक्तींची नावे महामंडळाकडे उपलब्ध असूनही त्यांचा आरोपींमध्ये समावेश का करण्यात आला नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे़
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळतील विवरण पत्रात कोट्यावधी रुपये काढल्याचा तपशील दिनांक निहाय आहे. बीड शहरातील बँक आॅफ महाराष्ट्र शाखेच्या विकास महामंडळाचे ६००३२६८३८४४ या क्रमांकाचे खाते आहे. या खात्यातून महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष रमेश कदम व व्यवस्थापकीय संचालक एस.के. बावणे यांनी मोबाईलवरुन आदेश दिल्याचे जिल्हा व्यवस्थापक सीक़े़ साठे यांनी विवरण पत्रात नमूद केले आहे़ १३ मे २०१४ रोजी औरंगाबाद येथील सतनाम अॅटोमोबाईल्सला आर.टी.जी.एस.द्वारे ही रक्कम रोखीने देण्याचे आल्याचे उघडकीस आले आहे़ तत्कालीन व्यवस्थापक एल.पी. घोटमुकले व बी.एम. नेटके असताना ही रक्कम महामंडळाच्या एनएसएफडीसी योजनेर्तंगत दिली गेली होती. हा अपहार उघडकीस आल्यानंतर तत्कालीन व्यवस्थापक घोटमुकले, नेटके, लिपीक श्रावण हातागळे, सचिन कांबळे यांच्या विरुद्ध शिवाजी नगर पोलीस ठाण्यात ९ मे २०१५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीन आरोपींचा अटकपूर्व जामीन जिल्हा न्यायालयाने फेटाळला असून, त्यांनी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली आहे तर बी.एम. नेटके यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. दरम्यान, गुन्हा दाखल झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना निलंबीत करण्यात आले आहे. या संदर्भात महाराष्ट्र बँकेच्या व्यवस्थापकाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला़ मात्र, तो होऊ शकला नाही.
महामंडळाच्या निधीतून जिल्हा कार्यालयामार्फत बेकायदेशीरपणे वितरीत करण्यात आलेली रक्कम एकाचवेळी व्याजासह भरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोणतेही कागदपत्रे, दस्तावेज न देता कर्ज देण्यात आले असल्याने नोटीस बजावली आहे. ज्यांनी कर्ज घेतले नाही त्यांचे जबाब ठाण्यात घेतले जात आहे. बँकेतून पैसे काढणाऱ्या व्यक्ती महामंडळाशी संबंधित नाहीत. या प्रकरणाची चौकशी सुरु आहे
- सी.के. साठे, जिल्हा व्यवस्थापक, अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, बीड
यांना वाटली रोखीने खिरापत
लक्ष्मण मरीबा वाघमारे, माणिक निवृत्ती वैरागे, रहीम (वाहन चालक), नितीन भिवाजी लोखंडे व लखन केरबा कसबे या पाच जणांना मे ते डिसेंबर २०१४ या कालावधीत ५ कोटी ७३ लाख ७५ हजार ५०२ रुपये देण्यात आले.