लोणावळ्यात सरीवर सरी
By admin | Published: July 2, 2016 02:05 AM2016-07-02T02:05:50+5:302016-07-02T02:05:50+5:30
या वर्षी जून महिन्यात जेमतेम १० इंच पाऊस झाल्यानंतर जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी पावसाने लोणावळ्यात दमदार हजेरी लावली.
लोणावळा : या वर्षी जून महिन्यात जेमतेम १० इंच पाऊस झाल्यानंतर जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी पावसाने लोणावळ्यात दमदार हजेरी लावली. सकाळपासूनच पावसाचा जोर वाढला असून, जोरदार सरी कोसळू लागल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे. मात्र, जोरदार पावसामुळे आठवडे बाजारातील विक्रेते व ग्राहकांची चांगलीच तारांबळ उडाली.
महिनाभरापासून लोणावळेकर वाट पाहत होते, त्या दमदार व जोरदार पावसाला शुक्रवारी सुरुवात झाली. सकाळपासून शहर व ग्रामीण भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्याने डोंगरावरून धबधबे वाहण्यास सुरुवात झाली आहे. रस्त्यांच्या कडेला पाणी तुंबलेले पाहायला मिळाले.
शहरातील अनेक रस्त्यांच्या कडेची गटारेच नाहीशी झाल्याने सर्वच वॉर्डांमध्ये रस्त्यांवर पाणी तुंबल्याचे चित्र पाहायला मिळाले. काही ठिकाणी गटारे योग्य प्रकारे साफ न केल्याने गटारे भरून वाहत होती.
मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गाचे साइडपट्टे पावसापूर्वी मुरुम टाकत भरून घेण्यात आले होते. मात्र, त्यासाठी चांगल्या प्रकारचा मुरुम वापरण्यात न आल्याने पावसाळा सुरू होताच, या साइडपट्ट्यांची अवस्था दयनीय झाली आहे. साइडपट्टे चिखलमय झाले आहेत. त्यावरून अनेक वाहने घसरू लागली असून, नागरिकांचे पायी चालणे अक्षरश: बंद झाले आहे. आयआरबी कंपनीने याची तातडीने दखल घेत दुरुस्ती करावी. अशी मागणी नागरिक करत आहेत.
रेल्वे गेटजवळ झाड पडले
नांगरगाव-भांगरवाडी मार्गावरील भांगरवाडी रेल्वे गेटजवळ एक मोठे झाड शुक्रवारी पहाटे तुटून रस्त्यावर पडल्याने रेल्वे गेटकडे जाणारा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे. लोणावळा परिसरात गुरुवारपासून पावसाची रिमझिम सुरू आहे. शुक्रवारी सकाळपासून पावसाचा जोर चांगलाच वाढला असून, सरीवर सरी कोसळत आहेत. पाऊस व वाऱ्यामुळे रेल्वे गेटसमोर हे झाड रस्त्यावर आडवे पडल्याने मार्ग वाहतुकीसाठी पूर्ण बंद झाला आहे. शुक्रवारचा आठवडी बाजार त्यातच हा मार्ग काही काळ बंद राहणार असल्याने वाहतुकीचा ताण हा कुमार चौकातील मार्गावर आल्याने
वाहतूककोंडी झाली होती. (वार्ताहर)
>खड्डेच खड्डे : रेल्वे विभागातील रस्ते उखडले
मागील अनेक वर्षांपासून डांबराचा स्पर्शही न झालेले रेल्वे विभागातील रस्त्यांचे महिनाभरापूर्वी डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र, बहुतांश ठिकाणी हे रस्ते पहिल्याच पावसात उखडले असून, सर्वत्र खड्डे पडले आहेत. यामुळे कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. डांबरीकरण नेमके कसे करण्यात आले आहे, असा प्रश्न नागरिक विचारू लागले आहे. या विभागातील नगरसेवक सुनील इंगूळकर व शिक्षण मंडळ सदस्य प्रदीप थत्ते यांनी या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.