सिद्धिविनायक मंदिराकडून तलावाचे सौंदर्यीकरण
By admin | Published: October 8, 2016 04:17 AM2016-10-08T04:17:02+5:302016-10-08T04:17:02+5:30
मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिराने पुढाकार घेऊन आदर्श गावातील तलावाचे सौंदर्यीकरण केले आहे.
तुमसर (भंडारा) : मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिराने पुढाकार घेऊन आदर्श गावातील तलावाचे सौंदर्यीकरण केले आहे. तुमसर तालुक्यातील शेवटच्या टोकावरील जंगलव्याप्त आदिवासीबहुल रोंघा या गावाचे त्यामुळे रूपच बदलून गेले.
खासदार आदर्श गाव याच धर्तीवर राज्यात आमदार आदर्श गाव ही योजना मागील वर्षी सुरू करण्यात आली. नागपूर विभागाचे पदवीधर मतदारसंघाचे विधान परिषद सदस्य प्रा. अनिल सोले यांनी तुमसर तालुक्यातील रोंघा गावाची निवड केली. गावाशेजारी जुना तलाव होता. आ. सोले यांनी मुंबईच्या प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिर समितीची मदत घेऊन तलावाचा संपूर्ण कायापालट केला. आतापर्यंत या गावात सुमारे अडीच कोटींची विविध कामे झाली आहेत. (तालुका प्रतिनिधी)