सुंदर साजिरा श्रावण आला...
By Admin | Published: August 2, 2016 05:21 PM2016-08-02T17:21:23+5:302016-08-02T23:08:26+5:30
श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सर सर शिरवे क्षणात फिरूनि ऊन पडे... बालकवींनी या गीतातून वर्णिलेला श्रावण हा मनामनांत चैतन्य पेरणारा
- विजय बाविस्कर
श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे,
क्षणात येते सर सर शिरवे क्षणात फिरूनि ऊन पडे...
बालकवींनी या गीतातून वर्णिलेला श्रावण हा मनामनांत चैतन्य पेरणारा पाचूसारखा हिरवागार महिना. भारतीय वर्षगणतेतील या पाचव्या महिन्याच्या पौर्णिमेच्या सुमारास श्रवण नक्षत्र असते; म्हणून ह्यश्रावणह्ण नाव या महिन्याला पडले. श्रावण म्हणजे हिरव्या रंगाचे मुक्त प्रदर्शन. हिरव्या रंगांची विशाल वस्त्रे एकावर एक लपेटून उभे असलेले चराचर डोळ्यांचे पारणे फेडते. ज्येष्ठात सुरू झालेला पावसाळा श्रावणात चांगलाच स्थिरावलेला असतो. या दिवसांत ऊन-पावसाचा लपंडाव चाललेला आढळतो. क्षणात आभाळात काळ्या ढगांची पीछेहाट होऊन सूर्याची किरणे धरणीवर तेजाची बरसात करतात, तर दुसऱ्याच क्षणी गडद निळे ढग, सूर्यकिरणांना मागे सारून घननीळ बरसतो आणि रेशीमधारा रिमझिमतात. जलधारांची बरसात करू लागतात. जलबिंदूंच्या माध्यमातून सूर्याच्या सप्त रंगांचे मनोहारी दर्शन घडविणारा श्रावण... श्रावण म्हणजे निसर्गाची रंगपंचमी. ओल्या मातीतून, गंधातून पुलकित करणाऱ्या या काळात नव्या पानाफुलांच्या आगमनाने श्रावणाच्या बहराला पूर्तता येते. याच महिन्यात जाईजुई, पारिजात, सोनचाफा इ. फुलांच्या वेलींना व झाडांना बहर येतो व त्यांच्या सुवासाने आसमंत दरवळून जातो.
श्रावणातल्या संध्याकाळी, मावळत्या सूर्याला निरोप देणारे ढग, विविध रंगांनी नटूनथटून पश्चिमेच्या क्षितिजापाशी गोळा होतात. सूर्यबिंबाला त्या वेळी सौम्य, शांत अशी वेगळीच रुपेरी झळाळी प्राप्त झालेली असते. या सृष्टिसौंदर्याच्या मोहातूनच कविवर्य मंगेश पाडगावकरांनी
श्रावणात घन निळा बसरला रिमझिम रेशीमधारा,
उलगडला झाडांतून अवचित हिरवा मोरपिसारा
असे यर्थाथ वर्णन केले आहे.
श्रावण महिन्यातील प्रत्येक तिथीला कोणते ना कोणते धर्मकृत्य असते; पण त्यातील सोमवार हा विशेष मानतात. दर सोमवारी फक्त रात्री एक वेळ जेवून शिवव्रत करण्याची प्रथा आहे. दर मंगळवारी नवविवाहिता मंगळागौरीची पूजा करतात. तर, भाविक स्त्रिया शुक्रवारी लक्ष्मीची पूजा करून सवाष्णीला पुरणपोळीचं जेवण घालतात. संध्याकाळी स्त्रियांना हळदी-कुंकू देतात. रविवार म्हणजे आदित्यवार. या दिवशी आदित्याची म्हणजेच सूर्याची पूजा करून त्याला खिरीचा नैवेद्य दाखविण्याची प्रथा आहे. श्रावण महिना अनेक व्रतवैकल्ये आणि सणांनी सजलेला आहे. शुद्ध पंचमीला नागाची पूजा करून नागपंचमी साजरी होते. आजही कविवर्य गदिमांनी लिहिलेले व भावगीतगायक गजाननराव वाटवे यांनी अजरामर केलेले ह्यफांद्यावरी बांधिले गं मुलिंनी हिंदोळे, पंचमीचा सण आला डोळे माझे ओलेह्ण हे गीत स्त्रीवर्गात तितकेच लोकप्रिय आहे. श्रावण पौर्णिमेला येणाऱ्या नारळी पौर्णिमेला नदी आणि समुद्रालगत राहणारे कोळी बांधव नदी वा समुद्राची पूजा करून त्यांना नारळ अर्पण करतात. या दिवसाला राखी पौर्णिमा असेही म्हणतात. बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधून हे पवित्र नाते अधिक घट्ट करते. याच दिवशी सुताची पोवती करून विष्णू, शिव, सूर्य इ. देवतांना अर्पण करतात म्हणून या तिथीला पोवती पौर्णिमाही म्हणतात. याच दिवशी नवीन यज्ञोपवीत धारण करण्याची ब्राह्मण पुरुषांची परंपरागत प्रथा आहे. या विधीला श्रावणी असे म्हणतात. श्रावणातल्या वद्य अष्टमीला श्रीकृष्णांचा जन्मदिन असतो. म्हणून तिला जन्माष्टमी किंवा कृष्णाष्टमी म्हणतात. नवमीला गोपाळकाला हा दहीहंडी उत्सव साजरा होतो. श्रावणी अमावास्येला पिठोरी अमावास्या म्हटले जाते. गावागावांमधून या दिवशी बैलपोळ्याचा सण साजरा करतात. उत्तर भारतात या महिन्यात झुलन यात्रा, रक्षाबंधन, जन्माष्टमी व नंदोत्सव हे उत्सव विशेष महत्त्वाचे मानतात. पौर्णिमेच्या दिवशी राधा व कृष्ण यांना हिंदोळ्यावर बसवून झोके देतात व स्त्रिया त्यांच्यासंबंधी गीते गातात. हा उत्सव एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत चालतो. गीत, वाद्य वगैरेंच्या साह्याने घरोघरी तो उत्साहात साजरा होतो. या दिवसांत राधा-कृष्णांची पूजा करतात. घरोघरी कृष्णचरित्रातील काही भाग नाट्यरूपात सादर केला जातो. कृष्णजन्माच्या दुसऱ्या दिवशी नंदोत्सव करतात. नंदाला पुत्र झाला, या समजुतीने गीत, नृत्य, नाट्य यांच्या द्वारे हा उत्सव साजरा करतात. तसेच, या दिवशी हळदी-कुंकू मिसळलेले पाणी पिचकारीने अंगावर उडवतात. आषाढात सुरू झालेल्या चातुर्मासातील सर्वांत श्रेष्ठ मास म्हणून श्रावण महिन्याचे महत्त्व आहे. वसंतऋतूपेक्षा वेगळ्या तऱ्हेच्या पावसाळी फुलांनी हिरव्यागार वृक्षलतांनी नटलेली विलक्षण चिरसुगंधी विविधरंगी फुले हसऱ्या-नाचऱ्या श्रावणाला लाजरा बनवतात. म्हणूनच ज्ञानपीठ पुरस्कारविजेते कविवर्य कुसुमाग्रज यांच्याच शब्दात सांगयचे तर -
हासरा नाचरा जरासा लाजरा, सुंदर साजिरा श्रावण आला
कवींना भुरळ घालणारा, सृजनाला आवाहन करणारा असा हा आनंदाचा धनी असलेला श्रावण खरोखरच मनभावन आहे.