फुलपाखरांचे सौंदर्य बदलते ऋतुप्रमाणे
By Admin | Published: February 9, 2015 01:02 AM2015-02-09T01:02:07+5:302015-02-09T01:02:07+5:30
निसर्गाने विविध माध्यमांतून रंगांची उधळण केली आहे. सृष्टीचं सौंदर्य खुलवले आहे. फुलपाखरे म्हणजे हे त्याचेच एक उदाहरण. त्याच्या रंगीबेरंगी रंगाचे सौंदर्य मोहवून टाकणारे आहे.
‘चिलाडस पांडवा’ वर आशिष टिपले यांचे संशोधन
सुमेध वाघमारे - नागपूर
निसर्गाने विविध माध्यमांतून रंगांची उधळण केली आहे. सृष्टीचं सौंदर्य खुलवले आहे. फुलपाखरे म्हणजे हे त्याचेच एक उदाहरण. त्याच्या रंगीबेरंगी रंगाचे सौंदर्य मोहवून टाकणारे आहे. परंतु मानवी मनाला भुरळ घालणाऱ्या काही फुलपाखरांचे हे अभिजात सौंदर्य ऋतुप्रमाणे बदलत असल्याचे एका संशोधनातून समोर आले आहे. ‘चिलाडस पांडवा’ त्या फुलपाखराचे नाव. ‘लायकिनीडी’ जातीच्या या फुलपाखराच्या पंखाचा रंग पावसाळा, हिवाळा व उन्हाळ्यात बदलतो.
निसर्गाने प्रत्येक सजीवाला कोणते ना कोणते अलौकिकत्व बहाल केले आहे. म्हणूनच निरिनराळ्या ऋतूंचे निरनिराळे सोहळे निसर्गाच्या अंगणात रंगतात.निसर्गाच्या अत्यंत जवळ असलेल्या फुलपाखरांमध्ये ऋतूंचा काही परिणाम होतो का, हे जाणून घेण्यासाठी सेलू येथील विद्याभारती महाविद्यालयाचे प्राणिशास्त्राचे विभागप्रमुख डॉ. आशिष टिपले यांनी फुलपाखरांवर संशोधन करणे सुरू केले.
रंग बदल, वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी
डॉ. टिपले यांनी सांगितले, फुलपाखरांना आपल्या शत्रूपासून स्वत:चे संरक्षण करायचे असते. अशात त्यांना वातावरणाशी जुळवून घ्यायचे असते व त्यांच्यात एकरूप व्हायचे असते. दुसरे महत्त्वाचे कारण त्यांच्या जनुकामध्ये होणारे बदल असू शकतात. त्यावर भारतीय शास्त्रज्ञांनी काम करण्याची गरज आहे.