‘देखणी’ काव्यसंग्रह कोकणी भाषेत
By Admin | Published: May 31, 2016 01:57 AM2016-05-31T01:57:42+5:302016-05-31T01:57:42+5:30
ज्ञानपीठ विजेते प्रसिद्ध लेखक भालचंद्र नेमाडे यांच्या साहित्यकृतींची भुरळ अनेकांना नेहमीच पडली आहे. त्यांचे साहित्य इतर भाषांमध्ये अनुवादित होण्याचे प्रमाणही वाढत आहे.
पुणे : ज्ञानपीठ विजेते प्रसिद्ध लेखक भालचंद्र नेमाडे यांच्या साहित्यकृतींची भुरळ अनेकांना नेहमीच पडली आहे. त्यांचे साहित्य इतर भाषांमध्ये अनुवादित होण्याचे प्रमाणही वाढत आहे. नेमाडे यांचा ‘देखणी’हा प्रसिद्ध काव्यसंग्रह लवकरच कोकणी भाषेत प्रकाशित होत असून, त्यांच्या या साहित्यकृतीचा रसास्वाद आता गोवेकरांनाही घेता येणार आहे.
देशीवादाच्या सिद्धांताबरोबरच आपल्या दर्जेदार साहित्याने भारतीय साहित्यक्षेत्रात वेगळा मानदंड निर्माण करणाऱ्या नेमाडे यांच्या देखणीचा काव्यानुवाद संत तुकारामांच्या निवडक अभंगाचे आणि रवींद्रनाथ टागोरांच्या संपूर्ण गीतांजलीचे सहितसाठी सुबोध कोकणी अनुवाद करणारे साहित्य अकादमी प्राप्त गोव्यातील ज्येष्ठ कवी रमेश वेळुस्कर यांनी केला आहे.
‘देखणी’तील कविता या प्रामुख्याने त्यांच्या गोव्यातील वास्तव्यात लिहिलेल्या आहेत. गोव्यातील वास्तव्य हे नेमाडे यांच्यासाठी नेहमीच आनंदाचा भाग राहिला आहे.
नेमाडे यांच्या कोकणी भाषेवरील प्रेमामुळे ‘नेमाडे सहितोत्सव’ आणि त्यांच्या निवडक कवितांच्या विशेष पोस्टरच्या यशस्विततेनंतर ‘सहित’च्या वतीने आता त्यांचा ‘देखणी’ हा काव्यसंग्रह कोकणीमध्ये आम्ही प्रकाशित करत आहोत. त्यांच्या ७८व्या वाढदिवसानिमित्त हा अनुवाद म्हणजे आम्हा नेमाडेप्रेमींकडून त्यांना छोटीशी भेट देण्याचा प्रयत्न असल्याचे सहित प्रकाशनचे व्यवस्थापकीय संपादक किशोर शिंदे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)