उलगडले भारुडाचे सौंदर्य
By admin | Published: May 16, 2016 01:42 AM2016-05-16T01:42:56+5:302016-05-16T01:42:56+5:30
विविध रूपकांमधून भारुडाचे उलगडलेले सौंदर्य...सुंदर निरूपणाद्वारे भक्ती, विवेक आणि ज्ञानाचा झालेला जागर
पुणे : विविध रूपकांमधून भारुडाचे उलगडलेले सौंदर्य...सुंदर निरूपणाद्वारे भक्ती, विवेक आणि ज्ञानाचा झालेला जागर...नाट्यमयता आणि संगीतामधून रूपकांना लाभलेला आधुनिकतेचा परिसस्पर्श...आणि भारुडाची ही बहुरूपता ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवण्यासाठी रसिकांची झालेली अभूतपूर्व गर्दी...अशा माध्यमातून संत वाङ्मयाचे व्यासंगी अभ्यासक आणि प्रसिद्ध भारूडकार डॉ. रामचंद्र देखणे यांच्या रंगलेल्या २१००व्या ‘बहुरूपी भारूड’च्या प्रयोगाने ‘कळसाध्याय’ गाठत उपस्थितांना परमानंदाची अनुभूती दिली.
महाराष्ट्रातील लोप पावत चाललेल्या लोककलांचे अस्तित्व अबाधित राखण्यासाठी निर्मित केलेल्या ‘बहुरूपी भारूड’ या कार्यक्रमाचा २१०० प्रयोग बालगंधर्व रंगमंदिर येथे शनिवारी रंगला. भारुडाची अनुभूती घेण्यासाठी अभूतपूर्व गर्दी झाली होती. संपूर्ण सभागृह ‘हाऊसफुल’ झाले. जिथे जागा मिळेल तिथे प्रेक्षक आसनस्थ होत होते. अगदी व्यासपीठावर विंगेत बसून अनेक मान्यवरांनांही प्रेक्षकांसोबत कार्यक्रमाचा आनंद घ्यावा लागला. शेवटी सभागृहाचा प्रवेश बंद करण्यात आला. तरीही बाहेरील असंख्य रसिक आत येण्यासाठी धडपडत होते. अखेर रसिकांचा मान राखीत, सभागृहाबाहेर स्क्रिन लावून कार्यक्रमाचा आस्वाद घेण्याची सोय करण्यात आली.
परमात्म्याला आपल्या अवस्थेत आणणं हेच भावदर्शन आहे, असा अर्थ त्यांनी उलगडला. ‘वासुदेव माझे नाव’ हे भारूड सादर करीत कृष्णदेव क्षीरसागर यांनी वासुदेवाने समाजात प्रबोधनाची पहाट आणली असल्याचा संदेश दिला. स्वत: ‘कडकलक्ष्मी’च्या पेहरावात येत डॉ. देखणे यांनी या रूपकामागचा आशय विषद केला. यातील वेडी आणि कडकलक्ष्मी यामधील नाट्यमय प्रसंगाने रंगत आणली. भावार्थ देखणे आणि सहकाऱ्यांनी ‘अग अग विंचू चावला’ चे सादरीकरण केले. ‘संबळ’च्या कडक वादनाने जागर गोंधळ चांगलाच रंगला. पालकमंत्री गिरीश बापट, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, माजी आमदार उल्हास पवार, माजी एअर मार्शल भूषण गोखले, ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे, अभिनेत्री लीला गांधी, डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. डी. पाटील, नाट्य समीक्षक, डॉ. वि. भा. देशपांडे, मसापचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी, सुनील चिंचोळकर, देखणे यांच्या पत्नी अंजली देखणे, मुलगा भावार्थ, सून पूजा उपस्थित होते. बालगंधर्वमध्ये खूप कार्यक्रम आजवर झाले; पण एवढी गर्दी पहिल्यांदाच अनुभवायला मिळाली, पुणेकरांचे डॉ. देखणे यांच्यावर किती प्रेम आहे हे यातून दिसते, असे बापट यांनी
सांगितले. (प्रतिनिधी)