‘मस्तानी’चे सौंदर्य धोक्यात

By admin | Published: March 12, 2016 01:22 AM2016-03-12T01:22:20+5:302016-03-12T01:22:20+5:30

सासवड-पुणे रस्त्यावरील निसर्गरम्य दिवेघाटाच्या कुशीत ऐतिहासिक मस्तानी तलावाकडे येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांचे लक्ष वेधले जाते. तलावाचे सौंदर्य पाहून प्रवासी आनंदी होत असे

The beauty of 'mastani' is in danger | ‘मस्तानी’चे सौंदर्य धोक्यात

‘मस्तानी’चे सौंदर्य धोक्यात

Next

गराडे : सासवड-पुणे रस्त्यावरील निसर्गरम्य दिवेघाटाच्या कुशीत ऐतिहासिक मस्तानी तलावाकडे येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांचे लक्ष वेधले जाते. तलावाचे सौंदर्य पाहून प्रवासी आनंदी होत असे. प्रत्यक्ष तलावावर गेल्या काही वर्षांपर्यंत मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत होते. परंतु सध्या मस्तानी तलावाची व परिसराची अत्यंत दुरवस्था झाल्याने तलावाकडे येणाऱ्या पर्यटकांची संख्या कमालीची रोडावली आहे. लोकप्रतिनिधी, पुरातत्त्व विभाग, वनविभाग यांच्या अक्षम्य दुर्लक्षितपणामुळे मस्तानी तलावाचे सौंदर्य धोक्यात आले आहे. सध्या मस्तानी तलावाला मोठ्या दुरुस्तीची गरज आहे.
तलावाच्या दुरुस्तीची मागणी आम्ही अनेकदा केली. मात्र वनविभाग सांगतो, की तलावाचा ताबा पुरातत्त्व विभागाकडे आहे व पुरातत्त्व विभाग सांगतो, की ताबा वनविभागाकडे आहे. शासनाने एकदा स्पष्ट करावे, की तलावाच्या दुरुस्ती व देखभालीची जबाबदारी नेमकी कोणाची आहे. म्हणजे आम्हाला नेमका पाठपुरावा करून तलावाचे सौंदर्य व ऐतिहासिक ठेवा जपता येईल, असे हवेली तालुका शिवसेनेचे प्रमुख संदीप मोडक, जिल्हा परिषद सदस्या स्वाती टकले, पंचायत समिती सदस्या नंदाताई मोडक, वडकीच्या सरपंच रेश्मा मोडक, तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष बाळासाहेब साबळे यांनी सांगितले.
गतवर्षी तलावात दोन जण बुडून ठार झाले. यावर उपाय म्हणून सुरक्षारक्षक तलाव परिसरात नेमले पाहिजेत, तसेच संरक्षक कठडे बसविले पाहिजेत.
पुरंदर, बारामती, भोर या बाजूकडून येणाऱ्या पर्यटकांची संख्या जास्त आहे. त्यांना संपूर्ण दिवेघाट ओलांडून गेल्यावर तलावाकडे जाता येते.
दिवेघाटातून मस्तानी तलावाकडे जाण्यास थेट पायरी मार्ग काढल्यास पर्यटकांचा वेळही वाचेल व पायरीमागार्मुळे तलाव परिसराच्या सौंदर्यात भरही पडेल, असे इको फाऊंडेशनचे संचालक तानाजी सातव यांनी सांगितले. (वार्ताहर)
> भिंती ढासळल्या : अपघाताची शक्यता
1मस्तानी तलावात मोठ्या प्रमाणावर गाळ साचला आहे. त्यामुळे तलावाची पाणी साठवणक्षमता कमी होऊन फारच थोड्या प्रमाणावर पाणी साठते. गणेश मंदिराच्या बाजूची एक भिंत सोडता संरक्षक कठडे, भिंती पूर्णपणे ढासळल्या आहेत. त्यामुळे पावसाळ्यात दिवेघाटाच्या डोंगरमाथ्यावरून माती, दगड, काटेरी झाडे-झुडपे तलावात वाहून येतात.
2तलावाकडेचा रस्ता पावसाने वाहून गेला असून रस्त्यावर भलेमोठे खड्डेच खड्डे पडले आहेत. त्यामुळे पर्यटकांना अपघाताची शक्यता आहे. पाळीव प्राणी व भटकी जनावरे यांचा तलावात मुक्तपणे संचार असतो. तलावाभोवती काटेरी झुडपे, रानगवत मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. तलाव परिसरात देखभाल व बंदोबस्तासाठी एकही कर्मचारी उपलब्ध नाही.
3या सर्व दुरवस्थेमुळे गेल्या काही दिवसांपासून तलावाकडे येणाऱ्या पर्यटकांची संख्या कमालीची रोडावली आहे.तलावाचे पर्यटनस्थळ व्हावे, म्हणून दहा वर्षांपूर्वी शासनपातळीवर हालचाली सुरू झाल्या होत्या. त्यानंतर मात्र पर्यटनस्थळ हा विषय मागे पडलाच पडला. परंतु तलावाची साधी देखभालीची काळजीही घेण्यात आली नाही. त्यामुळे या ऐतिहासिक तलावाची दुर्दशा होऊन ऐतिहासिक वारसा नष्ट होण्याची शक्यता आहे.

Web Title: The beauty of 'mastani' is in danger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.