‘चिल्लर’ संकटामुळे ‘पीएमपी’ प्रशासनही बुचकळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2018 08:14 PM2018-10-12T20:14:57+5:302018-10-12T20:28:41+5:30
दैनंदिन तिकीट विक्रीतून जमा होणारी सुमारे दीड ते दोन लाख रुपयांची चिल्लर स्वीकारण्यास बँकेने नकार दिला आहे.
पुणे : दैनंदिन तिकीट विक्रीतून जमा होणारी सुमारे दीड ते दोन लाख रुपयांची चिल्लर स्वीकारण्यास बँकेने नकार दिला आहे. त्यामुळे पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) प्रशासनासमोर या ‘चिल्लर’चे करायचे काय? असा वेगळाच पेच निर्माण झाला आहे. या ‘चिल्लर’ संकटामुळे प्रशासनही बुचकळ्यात पडले आहे.
पीएमपीचे एकूण १३ आगार असून त्यामार्फत बसचे दैनंदिन संचलन चालविले जाते. या आगारांमधील बस संचलनातून दररोज जमा होणारी रक्कम सेंट्रल बँक आॅफ इंडियाच्या कॅम्प शाखेतील महामंडळाच्या खात्यात जमा केली जाते. तिकीट विक्रीतून दररोज दीड ते दोन लाख रुपयांची चिल्लर जमा होते. पण बँकेने ४ आॅक्टोबरपासून ही चिल्लर स्वीकारण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आगारांमध्ये चिल्लर साठवून ठेवावी लागत आहे. प्रशासनाकडून याबाबत बँकेशी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. मात्र, त्यानंतरही बँकेने रिझर्व्ह बँकेचा हवाला देत ही रक्कम घेणार नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे प्रशासनाला मागील आठ दिवसांपासूनची जमा झालेल्या सुमारे १२ ते १५ लाख रुपयांच्या चिल्लरचा संबंधित आगारांमध्येच ढीग लावावा लागत आहे.
बँकेच्या भुमिकेमुळे प्रशासनासमोर चिल्लरचे नवे संकट उभे राहिले आहे. दिवसागणिक चिल्लरचा साठा वाढत जाणार आहे. लाखो रुपयांची चिल्लर बँकेत जमा होत नसल्याने दैनंदिन खर्चावरही मर्यादा येऊ लागल्या आहेत. तसेच रोजच्या हिशेब नोंदीच्या कामकाजावरही परिणाम होऊ लागला आहे. आधीच पीएमपीची आर्थिक स्थिती चांगली नाही. त्यातच हे चिल्लर संकट उदभवल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. कामकाजातील सुसुत्रता कायम राखणे अडचणीचे झाले असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
....
एसटी तसेच पीएमपीमध्ये दररोज लाखो रुपयांची चिल्लर जमा होते. त्यामुळे बँकेने पैसे स्वीकारायला हवेत. पण चिल्लर न स्वीकारण्याबाबत रिझर्व्ह बँकेचे निर्देश असल्याचे सेंट्रल बँकेचे म्हणणे आहे. आमच्या अधिकाऱ्यांनी बँकेशी सातत्याने चर्चा करूनही त्यांनी ऐकले नाही. त्यामुळे आगारांमध्ये चिल्लर साठून राहत आहे. हे आता अडचणीचे ठरू लागले आहे. त्यामुळे आता मी स्वत: बँक अधिकाऱ्यांशी चर्चा करेन. रिझर्व्ह बँकेचे नेमक्या सुचना काय आहेत, हे पाहिले जाईल.
- नयना गुंडे, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपी