विसंवादामुळेच उसवते नात्यांची वीण..!

By admin | Published: March 11, 2016 02:02 AM2016-03-11T02:02:37+5:302016-03-11T02:02:37+5:30

घर जोडून ठेवण्याचे काम करते ती एक ‘स्त्री’... चूल-मूलच्या चौकटीतून स्वत:च्या कर्तृत्वाचे अवकाश व्यापण्यासाठी ’ती’ बाहेर पडली... विचारांनीही स्वतंत्र झाली... पण नात्यांपासून दुरावली.

Because of the discourse, weaving relationships! | विसंवादामुळेच उसवते नात्यांची वीण..!

विसंवादामुळेच उसवते नात्यांची वीण..!

Next

नम्रता फडणीस/सायली जोशी-पटवर्धन,  पुणे
घर जोडून ठेवण्याचे काम करते ती एक ‘स्त्री’... चूल-मूलच्या चौकटीतून स्वत:च्या कर्तृत्वाचे अवकाश व्यापण्यासाठी ’ती’ बाहेर पडली... विचारांनीही स्वतंत्र झाली... पण नात्यांपासून दुरावली. संसाराची दोन चाके असणाऱ्या पती-पत्नी दोघांचीही नाते टिकविणे ही जबाबदारी. संवादातून सुंदर नात्याला बहरत ठेवून वाटचाल करणे हे वैवाहिक जीवनाचे फलित असले पाहिजे, नेमकी हीच गोष्ट दोघांच्या नात्यातून हद्दपार झाली आहे. विसंवाद, अवास्तव अपेक्षा, नात्याकडे गांभीर्याने न बघणे, छोट्या छोट्या कारणासांठी विभक्त होण्याचा विचार करणे अशा गोष्टींंमुळे विवाहपद्धतीलाच तडा जात असल्याचे दिसून आले आहे. अनेक जोडपी आपल्या मुलांचाही विचार न करता नात्यांची वीण तोडून विभक्त होण्याचा मार्ग निवडत असल्याची धक्कादायक बाब ‘लोकमत’ पाहणीतून समोर आली आहे.
पोलीस आयुक्तालयामध्ये गुरुवारी आणि शुक्रवारी महिला सहायक कक्षात समुपदेशनाचा तास भरतो. जोडपी तक्रारी घेऊन या ठिकाणी येतात. नात्यांमध्ये दुरावा का येतो? नातं तुटण्याला नेमक्या कोणत्या गोष्टी कारणीभूत असतात? याचा शोध घेण्यासाठी ‘लोकमत’ने थेट या ठिकाणी भेट देऊन नात्यांची ही गुंतागुंत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यात आपल्या नात्यांची विस्कटलेली घडी पूर्वपदावर आणण्यासाठी काहीशी धडपड होतानाही दिसलीही; त्यांच्याशी संवाद साधून जोडप्यांच्या आयुष्याला सकारात्मक दिशा देण्याचे काम कोणताही मोबदला न घेता अ‍ॅड. जयश्री तुंगार, लीना पाटील, शुभांगी कदम, पौर्णिमा चव्हाण, रश्मी जोशी, अनुजा जोशी आणि अ‍ॅड. मधुमिता सुखात्मे करीत आहेत. पुरुषही रडतात...
पुरुष सहसा कुणासमोर रडत नाहीत; पण महिलांचे अत्याचार सहन न झाल्याने पुरुषही समुपदेशकांसमोर रडून मन मोकळे करतात. महिला सहायता कक्ष महिलांनाच सपोर्ट करतो, अशी चुकीची समजूत महिलांमध्ये असल्याने महिला पुरुषांविषयीच्या खोट्या तक्रारींचा पाढा वाचतात... मात्र, पुरुषांमध्ये विश्वास निर्माण करून त्यांना बोलते करण्याचे कौशल्य या महिला समुपदेशकांकडे असल्याने त्यांनाही न्याय मिळतो. प्रसंग १
लग्नाला ३५ वर्षे झाली... पत्नीचा जॉब सकाळी ९.३0 ते १.३0 आणि पतीचा १२ ते ६. दोघांना एकमेकांबरोबर वेळ घालवायला खूप कमी अवधी मिळतो. असे असूनही मिळालेले क्षण एकत्र घालविण्याऐवजी भांडण.. कुरबुरी.. यामध्येच त्यांचे आयुष्य चालले आहे... इतकी वर्षे एकमेकांच्या सहवासात राहूनही दोघांचा एकमेकांवर विश्वास नाही. पत्नीच्या बडबडण्याला तो कंटाळला आहे... आणि तोही छोट्या छोट्या गोष्टी काढून याच्याशी का बोलते, इकडे का जाते यावरून तिच्याशी वाद घालतो... दोघंही या वयात एकमेकांसाठी किती बदलू शकतात, याचे उत्तर मात्र दोघंही द्यायला तयार नाहीत. प्रसंग २
दोघांचं लव्हमॅरेज...पण त्याने जात लपवली...सांगितले नाही..
आठ वर्षांच्या संसारवेलीवर दोन
फुले उमलली...त्यांचीही पर्वा न
करता तो काम करत नाही... दारू पिऊन मारहाण करतो.. खुनाची
धमकी देतो.. अशी तिची तक्रार..
तर आमच्या संसारात तिच्या
घरच्यांचा अवास्तव हस्पक्षेप... संवाद दोघातही नाही... हा प्रश्न सामंजस्याने सुटणारा असूनही त्यांना एकमेकांशी बोलायचेच नाही...प्रसंग ३
त्याच्या आईवडिलांचा अवास्तव हस्तक्षेप म्हणून दोघांना वेगळे घर करून दिले...तरी ती नवऱ्याबरोबर व्यवस्थित राहायला तयार नाही... सासू-सासऱ्यांकडून मानसिक छळ केला जातो.. त्यांच्याशी सहा महिने त्याच्या आईवडिलांचा संपर्कदेखील नाही.. मानसिक अत्याचार काय होतात, हेदेखील सांगता येत नाहीत... घरच्यांच्या सांगण्यावरून ती त्याच्याविरूद्ध तक्रार दाखल करते... ३ महिन्यांच्या तान्हुल्याचा देखील विचार दोघांच्या ठायी नाही. प्रसंग ४
तिचे वय अवघे १९... तिला लग्न करण्याची अजिबात इच्छा नसताना घरच्यांच्या दबावामुळे ते झाले... मात्र आता शिक्षण पूर्ण करून स्वत:च्या पायांवर उभे राहण्याची स्वप्ने बघत असताना तिला आपला नवराच नको आहे... तिच्यासाठी तो वाटेल ते करायला तयार असताना हिला मात्र या नात्याचे किंवा आपल्यामुळे समोरच्या व्यक्तीचे आयुष्य उद्ध्वस्त होत असल्याचे गांभीर्यच नाही... त्यात तिच्या घरच्यांनाच या सगळ्या गोष्टींचे विशेष गांभीर्य नसल्याने मुलगा मात्र परिस्थितीत भरडला गेला...प्रसंग ५
बायकोला ताडी पिण्याचे असलेले व्यसन... आणि त्यापासून तिला दूर करताना नवऱ्याचा लागलेला कस... यावरून त्याने तिला काही बोलले तर तडक माहेरी निघून जाणारी ती आणि या सगळ्यात त्यांच्या लहानग्यांची होत असलेली फरफट... समजूतदारपणा न दाखवता दोघांचाही असलेला आडमुठेपणा आणि त्यावरून घटस्फोटाचा झालेला निर्णय त्या दोघांना, त्यांच्या चिमुरड्यांना आणि दोन्ही कुटुंबातील लोकांना मानसिक, शारीरिक आणि आर्थिक त्रासाचाच.सध्याच्या धावपळीच्या जगात पती-पत्नी नात्यामधील वाढलेला विसंवाद आणि त्याच्याकडे पाहण्याचा दोघांचाही दृष्टिकोन नात्यातील गुंतागुंत वाढण्यासाठी कारणीभूत ठरत आहे. संसाराचा कणा म्हटल्या जाणाऱ्या स्त्रीनेच जर समंजसपणा न दाखविण्याचे ठरविल्यास भारतीय संस्कृतीत मानाची मानली जाणारी कुटुंबव्यवस्था येत्या काळात आणखी धोक्यात येईल.
- प्रतिभा जोशी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, महिला साहाय्य कक्ष

समुपदेशकांनी काढलेले प्रातिनिधिक निष्कर्ष
आर्थिकदृष्ट्या सबळ जोडप्यांमध्ये आम्ही कोणतीही तडजोड करणार नाही, असा दृष्टिकोन अनेकदा पाहायला मिळत आहे.
मुलगी घराबाहेर पडली तरीही मुले मात्र अजून घरात आली नाहीत. मुलींनी घर आणि बाहेरच्या जबाबदाऱ्या सांभाळत स्वत:मध्ये बदल घडवले; मात्र मुलांची पुरुषप्रधान असलेली मानसिकता आजही तशीच आहे. त्यामुळे नातेसंबंधात अडचणी निर्माण होतात.
जीवनातील प्रत्येक गोष्टीकडे टेम्पररी म्हणून पाहण्याची सवय नात्यांमध्ये दुरावा येण्यासाठी कारणीभूत ठरत आहे. यासाठी लहान-मोठ्या बाबतीत इगो न ठेवता सामंजस्याने त्यावर मार्ग काढणे केव्हाही श्रेयस्कर, असा पर्याय समुपदेशक या जोडप्यांना देताना दिसतात.
पुढील परिणामांचा विचार केला जात नाही आणि तडकाफडकी निर्णय घेतले जातात. त्यामुळे दोन आयुष्य तर उद्ध्वस्त होतातच; मात्र अपत्यांनाही या सर्व परिस्थितीला सामोरे जावे लागते आणि त्यामध्ये या लहानग्यांची पुरती ओढाताण होते.
पालक होताना पालकत्वाची योग्य ती जाण नसल्याने लग्न करत असताना मुला-मुलींना घरातून योग्य ते मार्गदर्शन मिळत नसल्याचेही समुपदेशकांचे म्हणणे होते. त्यामुळे लग्न झाल्यावर नाती, नवीन कुटुंब, शारीरिक-मानसिक ओढाताण यांतील समतोल कसा साधायचा, हेच माहीत नसल्याने लग्नानंतरच्या अडचणींत वाढच होताना दिसते.
मुलींना लग्नाआधी जास्त लाडात वाढविणे आणि त्यांना अतिसंरक्षित करणे, हे लग्न झाल्यानंतरच्या नात्यात बाधा आणणारे प्रमुख मुद्दे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. याबरोबरच मुलीच्या संसारात असलेला अतिहस्तक्षेप हेही नवीन नाते फुलण्याला धोकादायक ठरत आहे.
अनेक वेळा ४९८ अ कलमाचा गैरवापर केला जातो... नवऱ्याला अडकविण्यासाठी त्या वाट्टेल ते सांगतात. अशा वेळी तटस्थ भूमिकेमधूनच पाहावे लागते.

Web Title: Because of the discourse, weaving relationships!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.