माझ्यावर परमेश्वराची कृपा होती म्हणूनच बचावलो...
By admin | Published: August 5, 2015 01:37 AM2015-08-05T01:37:57+5:302015-08-05T01:37:57+5:30
परमेश्वराची कृपा म्हणूनच बचावलो, अशी प्रतिक्रिया ‘कृष्णा निवास’ इमारत दुर्घटनेमधून सर्वात आधी म्हणजे अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप बाहेर
जितेंद्र कालेकर, ठाणे
परमेश्वराची कृपा म्हणूनच बचावलो, अशी प्रतिक्रिया ‘कृष्णा निवास’ इमारत दुर्घटनेमधून सर्वात आधी म्हणजे अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप बाहेर काढलेल्या ८० वर्षीय अरविंद नेनेंनी ‘लोकमत’जवळ व्यक्त केली. ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.
नौपाड्यातील भारत डेअरीसमोर एक इमारत कोसळली आहे, असा दूरध्वनी स्थानिक नगरसेवक संजय वाघुले यांनी मंगळवारी पहाटे २.१५ वाजताच्या सुमारास जवाहर बाग अग्निशमन दलाकडे केला. क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळी दाखल झालेल्या जवाहर बाग आणि वागळे इस्टेट अग्निशमन दलातील एस. एस. शिंदे, सुनील चौरे, भगवान भालेराव, मयूर तरे आणि के. एस. पाटील या जवानांनी दुसऱ्या मजल्यावरील नेणे यांना वाचविण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घातला. त्यांनी एका छोट्याशा फटीत रांगत शिरून त्यांच्या अंगावरील तुटलेली खिडकी आणि स्लॅब बाजूला करून त्यांना बाहेर काढले. त्यांच्या मान आणि पायावर मार लागला होता. या दुर्घटनेत नेने हे सर्वात आधी बचावलेले नशीबवान ठरले.
त्यांना तातडीने १०८ रुग्णवाहिका सेवेने ३ वाजून १६ मिनिटांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. प्रकृती स्थिरावल्यानंतर ते म्हणाले, की रोज झोप येईपर्यंत रात्री वाचन करीत असतो. सोमवारी रात्रीही १ ते १.३० वाजतापर्यंत जागा होतो. त्यानंतर साधारण डुलकी लागली, पण अचानक मोठा आवाज झाला. तसे पत्नी माधुरीला हाक मारली. काही समजण्याच्या आतच अंधार झाल्यामुळे तिला दिवाही लावायला सांगितला. नंतर काय झाले ते कळालेच नाही.
१९६३ मध्ये बांधकाम झालेल्या या इमारतीमध्ये १९६४ मध्ये ते राहण्यास आले. सात हजार रुपये डिपॉझिट आणि दीडशे रुपये भाडे अजूनही ते सुरू होते. गणपत पाटील या मालकाच्या मुलाकडे ते दिले जायचे. तळमजल्यावर गेल्या दोन-तीन दिवसांमध्ये काही तरी बांधकाम सुरू होते. बहुदा त्यामुळेच इमारतीच्या ढाच्याला धक्का बसल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
नेने सोमय्या महाविद्यालयातून निदेशक म्हणून निवृत्त झाले होते. त्यांना दोन मुले असून, एक पुण्याला तर दुसरा ठाण्याच्या घोडबंदर रोड येथे वर्षभरापूर्वीच वास्तव्याला गेला. त्यामुळे हे दाम्पत्य एकटेच वास्तव्याला होते. दुर्घटनेत पत्नी माधुरी (७०) हिला गमावल्याचे मात्र त्यांना कळालेले नव्हते. त्यांना बाहेर काढले, त्या वेळीही ते तिचे नाव घेत होते.