शासनामुळेच एस. टी. तोट्यात : विखे-पाटील
By admin | Published: November 30, 2015 12:24 AM2015-11-30T00:24:25+5:302015-11-30T01:08:47+5:30
या मेळाव्याला राज्यभरातून कर्मचारी, प्रतिनिधी उपस्थित होते. विखे-पाटील यांनी एस. टी. महामंडळाच्या कार्यपद्धतीवर जोरदार आसूड ओढले.
चिपळूण : एस. टी. महामंडळाला राज्य शासनाकडून २८०० कोटी रुपयांचे येणे बाकी आहे. ही रक्कम शासनाने महामंडळाला त्वरित द्यावी. एस. टी. महामंडळ सर्वसामान्यांना सेवा देणारे महामंडळ आहे. चालक, वाहक व कर्मचाऱ्यांच्या जिवावर महामंडळाचा डोलारा उभा आहे. कर्मचाऱ्यांना शासकीय दर्जा देण्यासाठी आपण परिवहन मंत्र्यांना भेटू व चर्चा करू, असे आश्वासन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिले. चिपळूण येथे स्वामी मंगल कार्यालय, बहादूरशेख येथे एस. टी. कामगार प्रतिनिधींचा हल्लाबोल मेळावा झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष आमदार भाई जगताप होते. यावेळी कार्याध्यक्ष शेखर कोठारे, सरचिटणीस श्रीरंग बरगे, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर दळवी, तालुकाध्यक्ष संदीप सावंत, शहराध्यक्ष परिमल भोसले, उपनगराध्यक्ष कबीर काद्री, अश्विनी भुस्कुटे, राज खेतले, फैसल पिलपिले, लियाकत शाह, अॅड. विवेक रेळेकर, इब्राहिम दलवाई आदी उपस्थित होते. या मेळाव्याला राज्यभरातून कर्मचारी, प्रतिनिधी उपस्थित होते.
विखे-पाटील यांनी एस. टी. महामंडळाच्या कार्यपद्धतीवर जोरदार आसूड ओढले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांनी तत्कालीन समाज व्यवस्थेच्या विरोधात आसूड हाती घेतला होता. आपण आता भ्रष्टाचाराच्या विरोधात आसूड हाती घेऊ, आपण परिवहन मंत्री असताना मुंबई सेंट्रल येथे चालक - वाहक निवासस्थानाला भेट दिली होती. तेथील अस्वच्छता व सुविधांची वानवा पाहून ज्या चालक, वाहकांच्या जिवावर तुम्ही आहात, त्यांना चांगल्या सोयीसुविधा पुरवा. ते जेथे झोपतात, तेथे एक दिवस तुम्ही झोपून दाखवा. त्यानंतर त्याची ३२ लाख रुपये खर्चून दुरुस्ती झाली. आजचे जग आधुनिक आहे. आधुनिक यंत्रसामुग्री उपलब्ध असताना आजही एस. टी.च्या गाड्या हाताने स्वच्छ केल्या जातात. आपण आता आधुनिकतेची कास धरायला हवी. एस. टी. भरतीतील भ्रष्टाचार संपवण्यासाठी परिवहन मंत्री असताना एकाच दिवशी परीक्षा व मुलाखती घेतल्याने कारभारात पारदर्शकता आली. शिवाय त्या त्या भागातील कर्मचाऱ्यांना आपापल्या भागात प्राधान्य मिळाले. कर्मचाऱ्यांनी घाम गाळायचा आणि आपले काम प्रामाणिकपणे करायचे. पण हातात असलेली गाडी कधी बंद पडेल, याचा नेम नाही. महामंडळात अनेकवेळा डुप्लिकेट साहित्य वापरले जाते. त्यातही भ्रष्टाचार होतो. एकीकडे कर्मचाऱ्यांना शासकीय नोकरीत सामावून घ्या, अशी अनेक वर्षांची कर्मचारी संघटनांची मागणी आहे, तर दुसरीकडे खासगी वाहतुकीचे आव्हान आहे. ही आव्हाने पेलून महामंडळाचे कर्मचारी काम करीत आहेत. दिवाळीत अचानक भाववाढ करुन गाव तेथे एस. टी. या ब्रिदाला छेद देण्याचा प्रयत्न सरकारने केला, असा आरोप त्यांनी केला. आधुनिकतेची साथ धरा पण कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचारी म्हणून सामावून घ्या. एस. टी. महामंडळाला उज्वल भविष्य आहे. हे महामंडळ जनतेच्या विश्वासाचे प्रतिक आहे. तुमच्या कष्टाचे फळ तुम्हाला मिळायला हवे. तुमचा अधिकार तुम्हाला मिळायला हवा. तो देण्यासाठी अधिवेशनाच्या काळात आपण भाई जगताप यांच्याबरोबर परिवहन मंत्र्यांना भेटू व आपल्याला न्याय देण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन विरोधी पक्षनेते विखे-पाटील यांनी दिले. (प्रतिनिधी)