मी आव्हान दिल्यामुळेच मोदींनी कऱ्हाड टाळलं!
By admin | Published: October 13, 2014 10:25 PM2014-10-13T22:25:07+5:302014-10-13T23:06:31+5:30
पृृथ्वीराज चव्हाण : गुजरातचे महत्त्व वाढविण्यासाठी महाराष्ट्रावर अन्याय सहन करणार नाही
कऱ्हाड : ‘गुजरात मॉडेलची टीमकी वाजविणाऱ्या नरेंद्र मोदींना लोकसभा निवडणुकीपूर्वीपासून एकाच व्यासपीठावर येण्याचे आव्हान देतोय; पण त्यांनी ते अद्याप स्वीकारलेले नाही़ कऱ्हाडला गेलो तर माझ्याशी सामना होईल़ म्हणूनच त्यांनी कऱ्हाडला येण्याचे टाळले,’ असा टोला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी लगावला़
कऱ्हाड येथे आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते़ यावेळी सत्त्वशीला चव्हाण, व्यंकटराव घोरपडे, प्रदेश काँग्रसचे प्रवक्ते अॅड़ महादेव शेलार, आमदार आनंदराव पाटील, ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते, सुभाषराव जोशी, डॉ़ इंद्रजित मोहिते, उपनगराध्यक्ष राजेंद्र यादव, अरुण जाधव, ‘एनएसयूआय’चे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, माजी नगराध्यक्षा शारदा जाधव, अर्चना पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती़
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘गेले काही दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी कऱ्हाडला येणार येणार, असे ऐकत होतो़ मोदींचे सभेचे राजकारण झाले. पंतप्रधान तिथे जातात, जिथे विजयाची थोडीशी तरी खात्री असते. यातून तुम्ही काय ओळखायचं ते ओळखलं असेलच!
नरेंद्र मोदींची सभा स्टेडियमवर आयोजित केल्याने आम्हाला नाईलाजास्तव मुख्य बाजारपेठेत सभा घ्यावी लागली़ परिणामी व्यापाऱ्यांना झालेल्या त्रासाबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो़
खरंतर मोदी कऱ्हाडात येऊन काय बोलतात, याची मला उत्सुकता होती़ मला त्यांना उत्तरं द्यायची होती; पण ती संधी मला मिळाली नाही़ त्यांची मी जरूर वाट पाहीऩ गुजरात आमचा छोटा भाऊ आह़े़ त्यानं प्रगती केली तर आम्हाला आनंदच वाटेल; पण गुजरातचे महत्त्व वाढविण्यासाठी महाराष्ट्रावर अन्याय करायचा प्रयत्न केला तर ते आम्ही सहन करणार नाही़
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून भाजपकडे चेहरा नाही़ मुख्यमंत्रिपदावरून त्यांच्यात वाद आहे़ हा वाद असाच कायम ठेवत मोदी आणि शहांना दिल्लीतून रिमोटद्वारे महाराष्ट्र चालवायचा आहे़ ‘आरएसएस’च्या तालावर नाचणारे भाजप ताकाला जाऊन मोगा लपविण्याचा प्रयत्न करीत आहे़ तो महाराष्ट्रातील जनता हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही़’ (प्रतिनिधी)
ते दुसऱ्याला काय मंत्री करणार ?
भाजपचे नेते राजीवप्रताप रुडी यांची आज कऱ्हाडात सभा झाली म्हणे! त्यांनी इथल्या भाजपच्या उमेदवाराला साथ द्या, त्यांना मंत्री करतो, असे सांगितले; पण ज्या रुडींना केंद्रात मोदींनी मंत्री केले नाही, ते दुसऱ्यांना काय मंत्री करणार?
- पृथ्वीराज चव्हाण
पृथ्वीराज चव्हाणांच्या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद
काँग्रेसचे उमेदवार व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची प्रचार रॅली दुपारी तीनच्या सुमारास आझाद चौकातून निघालेली ही रॅली दीड तासांनी दत्त चौकामध्ये पोहोचली.
मी महाराष्ट्राचेच नेतृत्व करणार !
निवडणुकीनंतर मी दिल्लीला जाऊन बसणार, अशी टीका आज काही उमेदवार करत आहेत; पण मी आता महाराष्ट्रात रमलोय. यापुढे मी कऱ्हाडातच राहणार असून, महाराष्ट्राचे राजकारण करणार आहे़ महाराष्ट्राला विकासाच्या सर्वोच्च शिखरावर नेऊन ठेवण्यासाठी माझा प्रयत्न राहील, असे सांगत चव्हाणांनी आपण मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असल्याचे स्पष्ट केले़
काँग्रेस-सेना आमने-सामने
काँग्रेसने पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रचारार्थ शहरात दुपारी भव्य पदयात्रा काढली़ त्याचवेळी शिवसेनेच्या आदित्य ठाकरे यांची रॅली निघाली होती़ शनिवार पेठेत त्या दोन्ही रॅली आमने-सामने आल्या. मात्र, पोलीस निरीक्षक बी़ आऱ पाटील यांनी प्रसंगावधान राखत ठाकरेंची रॅली अन्य मार्गाने पुढे काढली़