पंकजा मुंडेंमुळे मंत्रिपदाची संधी हुकली - मेटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 06:24 AM2019-04-12T06:24:28+5:302019-04-12T06:25:51+5:30
बीड : माझ्या मंत्रिपदाच्या वाटेत पालकमंत्री पंकजा मुंडे मांजरासारख्या आडव्या आल्या. सत्ता आल्यापासून मागील साडेचार वर्षांत शिवसंग्राम संपविण्याचे मनसुबे ...
बीड : माझ्या मंत्रिपदाच्या वाटेत पालकमंत्री पंकजा मुंडे मांजरासारख्या आडव्या आल्या. सत्ता आल्यापासून मागील साडेचार वर्षांत शिवसंग्राम संपविण्याचे मनसुबे त्यांनी रचले. आम्हाला विरोध आणि आमच्या विरोधकांना मदत केली. तसेच दुष्काळी परिस्थितीत आम्ही सांगितलेल्या ठिकाणी छावण्या आणि टँकरसुद्धा मिळू दिले नाहीत. दुष्काळातही शेतकऱ्यांसोबत गलिच्छ राजकारण करणाऱ्यांना धडा शिकवा, शेतकरीपुत्राच्या पाठीशी शिवसंग्रामची ताकद उभी करा, असे म्हणत आ. विनायक मेटे यांनी राज्यात भाजपाला तर बीडमध्ये राष्ट्रवादीला साथ देण्याची भूमिका शिवसंग्रामच्या गुरुवारी बीड येथे झालेल्या मेळाव्यात घेतली.
मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरुन आम्ही जिल्हा परिषदेत मदत केली, त्याठिकाणी देखील आम्हाला संपविण्याचा प्रयत्न त्यांनी केला. मात्र कार्यकर्त्यांमध्ये रोष निर्माण होत असल्यामुळे बीडच्या निवडणुकीत शिवसंग्रामची संपूर्ण ताकद शेतकरी पुत्राच्या पाठीशी उभी करा, असे आवाहन मेटे यांनी कार्यकर्त्यांना केले.
बीड लोकसभेची या वेळेसची निवडणूक अत्यंत रंगतदार होत आहे. मागील आठवड्यात क्षीरसागर बंधूंनी राष्ट्रवादीची साथ सोडत भाजपच्या प्रीतम मुंडे यांना विजयी करण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन केले. क्षीरसागर बंधू नंतर जिल्ह्यात असंतुष्ट असलेले शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे काय भूमिका घेतात याकडे साऱ्यांचे लक्ष होते. पालकमंत्र्यांकडून जिल्ह्यात होत असलेल्या कोंडीमुळे मेटे यांनी समर्थकांच्या बैठकीत भाजपचा जिल्ह्यात प्रचार करणार नाही, परंतु राज्यात मात्र युतीचा घटक म्हणून भाजपसोबत असेल, असे जाहीर केले होते. त्यांची ही दुहेरी भूमिका भाजप श्रेष्ठींनाही आवडली नाही. कोणताही एकच निर्णय घ्या. राज्यात सोबत असाल तर बीड जिल्ह्यातही भाजपसोबत काम करावे लागेल, असे प्रदेशाध्यक्षांनी सांगितले होते.
या पार्श्वभूमीवर मेटे यांनी आज कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला. मेळाव्यात त्यांनी शिवसंग्रामचा पाठिंबा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना जाहीर केला. जिल्ह्यातील आगामी राजकारण पाहता मेटेंनी जिल्ह्यात त्यांची झालेली कोंडी फोडण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे.
मुंडे यांच्याकडून फारसे महत्व नाही
पंकजा मुंडे यांनीही मेटे यांच्या ‘असहकार्य’च्या भूमिकेला फारसे महत्त्व न देता शिवसंग्रामचेच दोन जि. प. सदस्य फोडून चोख उत्तर दिले होते. यानंतरही पत्रकारांशी संवाद साधताना आपण मेटेंशी या विषयावर बोलणार नाही, कारण त्यांनी हा निर्णय घेतला, असे सांगून विषय बंद केला. भाजपच्या शिस्तीत मेटेंचे हे वागणे बसत नव्हते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या संदर्भात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुंडेंकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही.