राजकीय हस्तक्षेपामुळेच मारेकरी मोकाट फिरत आहेत
By Admin | Published: April 30, 2015 01:51 AM2015-04-30T01:51:44+5:302015-04-30T13:22:16+5:30
राजकीय हस्तक्षेपामुळे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यांचे मारेकरी मोकाट फिरत असल्याचा आरोप कॉ. पानसरे, डॉ. दाभोलकर आणि सतीश शेट्टी यांच्या नातेवाइकांनी आज एका चर्चासत्रात केला.
मुंबई : राजकीय हस्तक्षेपामुळे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यांचे मारेकरी मोकाट फिरत असल्याचा आरोप कॉ. पानसरे, डॉ. दाभोलकर आणि सतीश शेट्टी यांच्या नातेवाइकांनी आज एका चर्चासत्रात केला.
मुंबईच्या प्रेस क्लबमध्ये बुधवारी ‘हम आझादीयोंके हकमें’ संस्थेतर्फे चर्चासत्र पार पडले. त्यात डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची मुलगी मुक्ता, कॉम्रेड गोविंद पानसरे यांची सून मेघा आणि आरटीआय कार्यकर्ते सतीश शेट्टी यांचे भाऊ संदीप शेट्टी या तिघांनी व्यवस्थेविरोधात रोष व्यक्त केला.
मेघा पानसरे म्हणाल्या, की कॉम्रेड पानसरे यांच्या हत्येच्या तपासाबाबत पोलीस आम्हाला कोणतीही माहिती देत नाहीत. हत्येवेळी धर्मांध शक्तींसोबत त्यांचे वैचारिक मतभेद सुरू होते. पोलिसांना ही माहिती देऊनही कौटुंबिक आणि भांडवलदारांसोबत असलेले मतभेद या मुद्द्यांवर तपास सुरू आहे. परिणामी हत्येचा तपास न्यायालयाच्या नियंत्रणाखाली नेमलेल्या विशेष चौकशी समितीने करावा, ही कुटुंबीयांची मागणी होती. मात्र न्यायालयात याचिका दाखल करताच सरकारने स्वतंत्र विशेष चौकशी समिती नेमली. यावरून न्यायालयाच्या नियंत्रणाखालील समिती सरकारला मान्य नाही, असा त्यांनी आरोप केला.
संदीप शेट्टी यांनी सांगितले, की सतीश शेट्टी हत्येमध्ये सीबीआयच्या अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव असल्याचे निदर्शनास आले. शुक्रवारी भक्कम पुरावा मिळाल्याचा दावा करणारा अधिकारी सोमवारी तपास थांबवतो. न्यायालयात ठोस पुरावे सादर केल्यानंतरही त्यांचा विचार केला जात नाही. त्यामुळे यंत्रणेसोबत लढून काहीही उपयोग होणार नाही; मात्र लढा देण्याचे काम सुरूच ठेवावे लागेल.
मुक्ता दाभोलकर यांनी शेट्टी यांचे समर्थन करीत तपासाबाबत राजकीय इच्छाशक्तीच्या विरोधात रोष व्यक्त केला.