महाराष्ट्राच्या प्रगतीमुळेच मोदींची प्रचारात पायपीट
By admin | Published: October 12, 2014 11:05 PM2014-10-12T23:05:42+5:302014-10-12T23:30:28+5:30
सुप्रिया सुळे : मानसिंगराव नाईक यांच्या प्रचारार्थ शिराळ्यात सभा
शिराळा : प्रत्येक गावात रस्ते, प्रत्येकाच्या हातात मोबाईल, प्रत्येकाच्या घरात पाणी, एवढ्या सुविधा दिल्या आहेत. या मतदारसंघात येऊन विश्वास कारखान्यावर जा, म्हणजे तुम्हाला समजेल कोठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र! महिला असुरक्षित आहेत म्हणता, म्हणजे येथील पुरुषांवर ठपका ठेवता? येथील पुरुष सुसंस्कृत आहेत. त्यांना महिलांबाबत आदर आहे. ही आमची संस्कृती आहे. या सर्व प्रगतीमुळेच नरेंद्र मोदींना २५-२५ सभा घ्याव्या लागतात, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.
येथील सोमवार पेठेत राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार मानसिंगराव नाईक यांच्या प्रचार सभेत त्या बोलत होत्या.
खा. सुळे म्हणाल्या की, महागाई कमी करण्याचे आश्वासन मोदी सरकारने पाळले नाही. शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. जे मोदींबरोबर गेले, त्यांनाही आता शेतकऱ्यांचा विसर पडला आहे. शरद पवार यांनी प्रत्येकवेळी शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. मोदी सरकार या महाराष्ट्राची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करीत आहे. येथील प्रगती पाहून मोदी २५-२५ सभा घेतात. त्यांना येथील निवडणुकीचीच जास्त काळजी वाटते. तिकडे पाकिस्तान-चीन यांच्या अतिक्रमणाबाबत त्यांनी पूर्ण दुर्लक्ष केले आहे.
या मतदारसंघात दरवेळी पक्ष बदलणारे विरोधक आहेत. दरवेळी भूमिका बदलणारे या मतदारसंघाचे भवितव्य कसे सुधारणार? याउलट मानसिंगराव नाईक यांनी राज्यात सर्वात उच्चांकी ऊसदर दिला. मतदारसंघातील प्रत्येक गावात विकास केला. महाराष्ट्र कोठे नेऊन ठेवला हे पाहायचे असेल, तर शिराळा मतदारसंघातील विश्वास उद्योग पहा. काळ्या मातीशी, शेतकऱ्यांच्या रक्ताशी इमान राखणारा, न्याय देणारा आमचा उमेदवार आहे. खासदार पवार यांना चांगल्या आणि वाईट दिवसांत या तालुक्याने सतत साथ दिली आहे, असेही खा. सुळे यांनी सांगितले.
यावेळी माजी ग्रामविकासमंत्री जयंत पाटील म्हणाले की, १५ वर्षांत येथील विरोधकांनी वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर नेले नाही, मात्र पाच वर्षांत मानसिंगरावांनी वाकुर्डे आणून वारणा नदीचे पाणी उत्तर भागात आणले. राजकारणात नात्यांचा संबंध नसतो. नात्यावरून राजकारण बदलू शकत नाही. आता वाळवा तालुक्यातील २८ ऐवजी ४८ गावे या मतदारसंघात आहेत. त्यामुळे आता २६ हजार नाही, तर ५० हजाराने मानसिंगरावांना विजयी करणार आहे.
आमदार नाईक म्हणाले की, शेतकरी महिला, युवक यांना समान न्याय देऊन समतोल विकासाची भूमिका ठेवली. विरोधकांनी १५ वर्षे फक्त भाषणेच केली आणि वाकुर्डेवर केवळ २० कोटीचा खर्च केला. मात्र आपणपाच वर्षात १६५ कोटींची कामे या योजनेची केली. गिरजवडे मध्यम प्रकल्पाचे २५ वर्षे रेंगाळलेले काम सुरू झाले आहे. यावेळी विजयराव नलवडे, भीमराव गायकवाड, सम्राटसिंह नाईक, अॅड. भगतसिंग नाईक यांनी मनोगत व्यक्त केली. डॉ. प्रतापराव पाटील, रवींद्र बर्डे, हंबीरराव नाईक, उदयसिंगराव नाईक, सुरेश चव्हाण, डॉ. उषाताई दशवंत, सौ. सुनीतादेवी नाईक, वैशाली नाईक, रणजितसिंह नाईक आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
उल्लू मत बनाओ...
एन. डी. पाटील, शरद पवार तत्त्वाशी एकनिष्ठ आहेत. त्याच तालमीत जयंतराव तयार झाले आहेत. त्यामुळे राजकारणात ते नातीगोती बाजूला ठेवतात. मोदींना येथे २५-२५ सभा घ्याव्या लागतात. नरेंद्रभैय्या, उल्लू मत बनाओ, येथे साधे लोक राहतात, असा टोला सुळे यांनी लगावला.