अहवालामुळे ‘त्या’ चौघांचे धाबे दणाणले

By admin | Published: October 27, 2015 02:09 AM2015-10-27T02:09:58+5:302015-10-27T02:40:22+5:30

ठाण्यातील कॉसमॉस ग्रुपचे मालक सूरज परमार यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाइड नोटच्या अहवालात पालिकेतील चार नगरसेवकांची नावे असल्याची माहिती समोर आली आहे

Because of the report, the 'dhane' of the 'four' has become tremendous | अहवालामुळे ‘त्या’ चौघांचे धाबे दणाणले

अहवालामुळे ‘त्या’ चौघांचे धाबे दणाणले

Next

ठाणे : ठाण्यातील कॉसमॉस ग्रुपचे मालक सूरज परमार यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाइड नोटच्या अहवालात पालिकेतील चार नगरसेवकांची नावे असल्याची माहिती समोर आली आहे. परंतु, पोलिसांनी ती नावे देण्यास नकार दिला असला तरी रविवारी दिवसभर त्या चौघांची नावे व्हॉट्स अ‍ॅप आणि इलेक्ट्रॉनिक मीडियावर व्हायरल झाल्याने त्यांचे धाबे दणाणले आहे. विशेष म्हणजे यातील काहींनी अटकपूर्व जामिनासाठी हालचाली सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली. तर, या चौघांनीही फोन घेण्यास नकार दिल्याने त्यांच्यावरील संशय आणखी वाढला आहे. तपासाचा भाग म्हणून पोलिसांनी अद्याप त्यांची नावे अधिकृतरीत्या जाहीर केलेली नाहीत. परंतु, रविवारी व्हॉट्स अ‍ॅपद्वारे महापालिकेतील विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे, काँग्रेसचे नगरसेवक विक्रांत चव्हाण, माजी विरोधी पक्षनेते नजीब मुल्ला, मनसेचे नगरसेवक सुधाकर चव्हाण यांची नावे व्हायरल झाली आहेत. यासंदर्भात रविवारी या चौघांशी संपर्क होऊ न शकल्याने सोमवारी पुन्हा त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता फोनवर त्यांचे पीए अथवा सहकारी होते. साहेब बिझी आहेत. साहेब मिटिंगमध्ये आहेत, असे सांगून त्यांनी संपर्क साधण्यास नकार दिला. परंतु, व्हॉट्स अ‍ॅपद्वारे त्यांची नावे व्हायरल झाल्याने चौघांचे धाबे दणाणल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे यातील दोघांनी अटक टाळण्यासाठी अटकपूर्व जामिनासाठी हालचाली सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
‘तो’ तपशील थेट
न्यायालयात सादर करणार
सूरज परमार यांच्या ‘सुसाइड नोट’च्या अहवालातील नावांचा तसेच इतर सर्व तपशील हा थेट न्यायालयात सादर केला जाणार आहे. ज्या राजकीय पदाधिकाऱ्यांची नावे या अहवालाच्या अनुषंगाने चर्चेत आली, त्यापैकी कोणावरही गुन्हा दाखल केलेला नाही. मात्र, साक्षी-पुरावे गोळा करण्यासाठी चार पथकांची नियुक्ती केल्याची माहिती पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी दिली. यासंदर्भात ठाणे महापालिकेतील १० ते १२ अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांचे जबाब नोंदविले आहेत. आर्थिक व्यवहारासंबंधी पुरावे गोळा करण्यासाठी परमार यांचा मोबाइल आणि लॅपटॉप न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविला असल्याचेही ते म्हणाले. मात्र, ‘सुसाइड नोट’ संदर्भातील तपशील थेट न्यायालयात सादर करण्यात येणार असल्यामुळे गोपनीयता बाळगली जाणार आहे.
या समूहाचे बांधकाम प्रकल्प मंजुरीसंबंधीची कागदपत्रे तपासण्यात येत असून, ही प्रक्रिया कशी असते, याचा अभ्यास करण्यात येत आहे. यामागे राजकीय दबाव होता का, याची चाचपणी करण्यात येत आहे. या गुन्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक कलम लावल्याने संबंधित कथित आरोपींची बँक खाती तसेच मालमत्तेची तपासणी होण्याची शक्यता असल्याचे सहपोलीस आयुक्त लक्ष्मीनारायण यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)

Web Title: Because of the report, the 'dhane' of the 'four' has become tremendous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.