संभाजी ब्रिगेडला यश मिळण्याची शक्यता नसल्याने शेकापमध्ये
By Admin | Published: January 11, 2017 03:51 AM2017-01-11T03:51:55+5:302017-01-11T03:51:55+5:30
संभाजी ब्रिगेडच्या सामाजिक शाखेचा आजही मी प्रदेश अध्यक्ष असून, संभाजी ब्रिगेड या नव्यानेच स्थापन झालेल्या राजकीय पक्षाला सद्यस्थितीमध्ये राजकारणात यश मिळेल असे वाटत नाही.
पुणे : संभाजी ब्रिगेडच्या सामाजिक शाखेचा आजही मी प्रदेश अध्यक्ष असून, संभाजी ब्रिगेड या नव्यानेच स्थापन झालेल्या राजकीय पक्षाला सद्यस्थितीमध्ये राजकारणात यश मिळेल असे वाटत नाही. त्यामुळे मी कसलाही डाग नसलेल्या शेतकरी कामगार पक्षात सहभागी होत आहे, असे मराठा क्रांती मोर्चाचे नेते प्रवीण गायकवाड यांनी मंगळवारी येथे सांगितले.
गायकवाड, शांताराम कुंजीर, अजय भोसले, श्रीमंत कोकाटे, यशवंत गोसावी, सारिका भोसले यांच्यासह राज्यातील अनेक कार्यकर्ते तसेच स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड, राष्ट्रसेवा समूह या काही संघटना शनिवारवाड्याच्या पटांगणावर गुरुवार,
दि. १२ रोजी शेतकरी कामगार पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत. त्याची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत गायकवाड बोलत होते. पक्षाच्या चिटणीस मंडळाचे एस.व्ही. जाधव, राजेंद्र कोरडे आदी उपस्थित होते.
गायकवाड म्हणाले, सध्याचे राजकारण धनिकांचे झाले आहे. सर्वच पक्ष भ्रष्ट असून विचारांविना स्वैराचार अशीच स्थिती सर्वत्र आहे. शेकाप हा कसलाही डाग नसलेला
आणि शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या प्रश्नांवर काम करणारा व देवाच्या आळंदीत स्थापन झालेला पक्ष आहे. त्यामुळे हे प्रश्न सोडविण्यासाठी समविचारी प्रतिनिधी निवडून देऊन कायदे करणे हा आपल्या पक्ष प्रवेशाचा हेतू आहे.
ते म्हणाले, मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेड या सत्यशोधक विचारांनी काम करणाऱ्या संघटना असून संभाजी ब्रिगेड
हा आज एक ब्रँड असल्याने त्यातून वेगळा पक्षही निर्माण झाला आहे. संभाजी ब्रिगेडची विचारधारा मानणारे कार्यकर्ते, यापूर्वीचे ७ प्रदेश अध्यक्ष वेगवेगळ्या पक्षांत आहेत. कार्यकर्ते ज्येष्ठ झाले की त्यांना अशी मुभा असते. वैयक्तिक स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. पुरुषोत्तम खेडेकर यांच्या मार्गानुसारच आपण शेकापमध्ये जात आहोत. या पक्षाला राज्यात बहुजनांचा पक्ष म्हणून, डाव्या विचारांचा पक्ष म्हणून चांगले भवितव्य आहे. (प्रतिनिधी)