आम आदमी बनून बघा
By admin | Published: April 26, 2016 06:14 AM2016-04-26T06:14:15+5:302016-04-26T06:14:15+5:30
आम आदमी बना म्हणजे सामान्यांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागते याची कल्पना येईल, अशा शब्दांत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी बँकांच्या अधिकाऱ्यांना कानपिचक्या दिल्या.
मुंबई : शासकीय अधिकारीपदाची झुल बाजूला ठेवून काही क्षणांसाठी आम आदमी बना म्हणजे सामान्यांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागते याची आपल्याला कल्पना येईल, अशा शब्दांत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी शासकीय आणि बँकांच्या अधिकाऱ्यांना कानपिचक्या दिल्या.
इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशन (आयआयपीए) आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने यशवंतराव चव्हाण स्मृती व्याखानमालेंतर्गत राजन यांचे, ‘स्टार्टअप इंडिया’ विषयावर मंत्रालयात व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते म्हणाले की, स्टार्ट अप इंडियांतर्गत अतिशय लहानलहान व्यावसायिकांना विकासाच्या प्रक्रियेत सामावून घेण्यावर भर द्यायचा उद्देश समोर ठेवून अधिकाऱ्यांनी वागणे अपेक्षित आहे. त्यासाठी त्यांना येणाऱ्या अडचणी स्वत:ला त्यांच्या जागी ठेवून समजवून घ्याव्या लागतील.
स्टार्ट अप इंडियासाठी पोषक वातावरणाची निर्मिती करणे आवश्यक असून त्यासाठी वेगेवेगळ्या नियमनांची संख्या कमीत कमी करणे, करपद्धती अधिक पारदर्शक करणे, शिक्षण, आरोग्य आणि विम्याची व्याप्ती वाढविणे गरजेचे आहे. यासाठी सरकारी अधिकाऱ्यांची भूमिका महत्त्वाची आहे.
छोट्या उद्योजकांना व्यवसायासाठी कर्ज देण्याची पद्धत सुलभ करणे, बँकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी उत्तम समन्वयाचे आणि विश्वासाचे नाते जपणे यावर भर दिला पाहिजे. कारण या उद्योजकांभोवतीच स्टार्ट अप इंडियाची संकल्पना केंद्रित आहे.
आयआयपीएचे अध्यक्ष आणि राज्याचे मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय यांनी राजन यांचे स्वागत केले. सचिव विजय सतबिर सिंग यांनी प्रास्ताविक केले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे सचिव शरद काळे यांनीही विचार व्यक्त केले.
(विशेष प्रतिनिधी)