बीडमध्ये बँकेतून १६ लाख पळविले
By admin | Published: July 29, 2015 02:05 AM2015-07-29T02:05:59+5:302015-07-29T02:05:59+5:30
शहरातील मध्यवर्ती बस स्थानक परिसरातील आयसीआयसीआय बँकेतून सात जणांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांची नजर चुकवून कॅश काऊंटरच्या मागील तब्बल १६ लाखांची रोकड
बीड : शहरातील मध्यवर्ती बस स्थानक परिसरातील आयसीआयसीआय बँकेतून सात जणांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांची नजर चुकवून कॅश काऊंटरच्या मागील तब्बल १६ लाखांची रोकड असलेली बॅग मंगळवारी भर दुपारी पळविली.
बँकेतील सीसीटीव्हीत हे चोरटे कैद झाले असून, त्यांच्या शोधासाठी जिल्हाभरात नाकाबंदी करण्यात आली आहे. दुपारी १ वाजेच्या सुमारास सहा ते सात व्यक्ती बँकेत घुसले. यातील काहींनी पोस्ट आॅफिस कुठे आहे, अशी चौकशी केल्यानंतर शाखा व्यवस्थापकास आम्हाला बँकेत एक लाख रुपये जमा करायचे आहेत, असे सांगितले.
कॅश काऊंटरच्या मागच्या बाजूला असलेल्या दरवाजातून शिपाई आत जाऊन बाहेर आला. त्याचवेळी एक जण तेथे जाऊन १६ लाख रुपये रक्कम ठेवलेली बॅग उचलून बाहेर पडला. त्यापाठोपाठ त्याचे सहकारीही निघून गेले. त्यानंतर बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हा प्रकार लक्षात येताच तत्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली. फूटेजमध्ये काही चोरांचे चेहरे स्पष्ट दिसत नसले तरी त्यांचा पेहराव लक्षात येत आहे. चोरटे २५ ते ३५ वयोगटातील आहेत. (प्रतिनिधी)
अवघ्या ३० सेकंदांत : बँकेचा शिपाई कॅश काऊंटरच्या मागच्या दारातून आतील भागात गेला. दरवाजातून गेल्यानंतर तो ३० सेकंदांत बंद होतो. शिपाई बाहेर येताच अवघ्या ३० सेकंदांत चोरट्याने आतून बॅग
आणली. हे सर्व आरोपी कोल्हापूर परिसरातील असावेत, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
देना बँकेतील डाव फसला : आयसीआयसीआय बँकेच्या मागच्या बाजूला असणाऱ्या देना बँकेतही हे चोरटे गेले होते. तेथे डाव फसल्यामुळे त्यांनी आयसीआयसीआय बँकेकडे मोर्चा वळविला.