Pankaja Munde : Video - "जीव देऊन भागणार नाही रे बाळांनो, तुम्हाला माझी शपथ"; पंकजा मुंडेंची हात जोडून विनंती
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2024 11:32 AM2024-06-13T11:32:24+5:302024-06-13T11:43:55+5:30
BJP Pankaja Munde : भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी हात जोडून आपल्या समर्थकांना कळकळीची विनंती केली आहे.
लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा झालेला निसटता पराभव जिव्हारी लागल्याने मुंडे समर्थक एका तरुणाने गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना मंगळवारी घडली. पोपट वायभासे असं य़ा तरुणाचं नाव आहे. बीड जिल्ह्यातील ही दुसरी घटना असून यापूर्वी ९ जून रोजी अंबाजोगाई येथील तरुणानेही पंकजा यांचा पराभव जिव्हारी लागल्याने जीवन संपवलं होतं. याच दरम्यान भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी हात जोडून आपल्या समर्थकांना कळकळीची विनंती केली आहे.
"असं जीव देऊन भागणार नाही रे बाळांनो, मग मी कसं काम करू, मी तुम्हाला हात जोडून विनंती करते, मी तुमच्याकडे यायलेय, पण माझा पायच उचलत नाही, कृपा करुन तुम्हाला माझी शपथ आहे. स्वत:च्या जीवाला काही करून घेऊ नका" असं म्हटलं आहे. पंकजा मुंडे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. "नमस्कार... काय बोलू, मी तुमच्या सर्वांशी हे मला कळत नाही. मी आवाहन केलंय, माझं आवाहन तुमच्या दु:खाच्या, नैराश्याच्या पलीकडे ते आवाहन पोहोचत नाही की काय, असं मला वाटतंय. गेल्या काही दिवसांत ज्या तरुणांनी आत्महत्या केल्यात, त्यामुळे मी जितकी खचलेय तितकं कोणी खचलं नसेल."
"प्रत्येकक्षणी एक-एक कर्ज माझ्यावर चढवत आहात"
"मी अहमदपूरमधल्या त्या तरुणाच्या आईशी बोलले, ती माऊली म्हणाली की, ताई तुम्ही टेन्शन घेऊ नका, त्याचा तुमच्यावर खूप जीव होता. इतकं प्रेम याला मला शब्द सापडत नाहीत. कदाचित त्याला अघोरी प्रेम म्हणतात, जे तुम्ही माझ्यावर करत आहात. प्रत्येकक्षणी एक-एक कर्ज माझ्यावर चढवत आहात. तुम्ही मला पाहिलंय, गेल्या 20-22 वर्षात, मुंडे साहेबांसारख्या... पहाडासारख्या नेत्याला मी भावनिक होताना पाहिलं आहे, खचताना पाहिलंय, मी त्यांना आधार दिला."
"मी त्यांना आधार देण्याइतकी मोठी नाही. पण मी आधार द्यायचा भाव आणला, कारण त्यांना वाटायला नको की, आपल्याला मुलगी आहे आणि ती खूप कोमल आहे. नाही बाबा, मी खूप कठीण आहे, मी खूप कर्मठ आहे, मी तुमच्यासाठी लढायला मागे हटणार नाही. जेव्हा मुंडेसाहेब गेले आठवा तो दिवस ४ जूनचा... दगड पडत होते सगळ्यांच्या डोक्यावर, पण मी धावत जाऊन माईक हातात घेतला, जीवाची पर्वा केली नाही."
माझी नम्र विनंती...🙏 pic.twitter.com/jqscye05iV
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) June 12, 2024
"राजकारणात पुढचं पाऊल काय उचलायचं हा प्रश्न पडतो"
"कोणाचाही विचार केला नाही, विचार केला समाज चेंगरेल, अनेक जीव जातील, याचा केला. तेव्हा मी तुम्हाला मुंडे साहेबांची शपथ दिली, ती शपथ तुम्ही पाळली. आता जे काही झालं ते तुमच्या जीवाला फार लागलं आहे, पण तुम्ही असं जिव्हारी लावून घेणार असाल आणि अशा रस्त्यावर जाणार असाल तर... माझी शक्ती बनण्यापेक्षा असं पाऊल उचलणार असाल तर राजकारणात पुढचं पाऊल काय उचलायचं हा मला प्रश्न पडतो."
"माझ्या राजकारणात स्वार्थ नाही, माझं आजपर्यंतचं राजकारण उद्देशाचं होतं, जेव्हा पद मिळालं तेव्हा गरिबांसाठी काम केलं, नाही मिळालं तेव्हा ती गोष्ट अत्यंत हसतखेळत झेलली. सकारात्मकपणे पुढे गेली. हे राजकारण आहे, राजकारणात अशी वेळ येत असते. आतापर्यंतच्या इतिहासात थेटपणे एखाद्या व्यक्तीला, वर्गाला, वर्णाला हीन लेखून प्रचार झाला नाही, ते तुमच्या जिव्हारी लागलं आहे, हे मला माहिती आहे."
"स्वत:च्या जीवाला काही करून घेऊ नका"
"आपल्याला वंचितांचा आवाज बनायचं आहे, या संघर्षात, आपल्याला त्या सगळ्यांना ताकद देणारी फौज बनायचं आहे. असं जीव देऊन भागणार नाही रे बाळांनो, मग मी कसं काम करू, मी तुम्हाला हात जोडून विनंती करते, मी तुमच्याकडे यायलेय, पण माझा पायच उचलत नाही, सांत्वनासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. मी येत आहे. कृपा करुन तुम्हाला माझी शपथ आहे. मी साहेबांची शपथ घालून पाहिली, पण स्वत:च्या जीवाला काही करून घेऊ नका" असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.