"हे माझ्यासाठी किती कठीण आहे कळतंय का?"; कार्यकर्त्याने स्वतःला संपवल्याने पंकजा मुंडे भावूक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2024 04:58 PM2024-06-09T16:58:45+5:302024-06-09T17:03:51+5:30
Beed : पंकजा मुंडे यांच्या पराभवानंतर त्यांच्या एका समर्थकाने आपली जीवनयात्रा संपवली आहे.
Pankaja Munde : बीड लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या पंकजा मुंडे या शरद पवार गटाच्या बजरंग सोनावणे यांच्याकडून पराभूत झाल्या आहेत. पंकजा मुंडे यांच्यामुळे सुरुवातीपासून बीड जिल्ह्यातील निवडणूक ही एकतर्फी होणार असल्याची चर्चा होती. मात्र शरद पवारांनी बीडसाठी बजरंग सोनावणे यांना उमेदवारी दिल्याने ही निवडणूक अटीतटीची झाली होती. शेवटी संपूर्ण राज्याचे लक्ष असलेल्या बीड मतदारसंघात भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचा पराभव झाला. हा पराभव पंकजा मुंडे यांच्यासह त्यांच्या चाहत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्याही जिव्हारी लागला आहे. याच पराभवातून एकाने आत्महत्या केल्याने पंकजा मुंडे यांनी आता कार्यकर्त्यांना विनंती केली आहे.
पंकजा मुंडे यांचा पराभव जिव्हारी लागल्याने अंबाजोगाई तालुक्यातील डिघोळअंबा येथील ऊसतोड कामगार युवक पांडुरंग रामभाऊ सोनवणे यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पांडुरंग सोनवणे यांनी रविवारी सकाळी शेतात जाऊन गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. धक्कादायक बाब म्हणजे निकालाच्या दिवशीच पांडुरंग हे आत्महत्या करायला गेले होते. मात्र त्यांना अडवण्यात आल्याने त्यांनी पाचच दिवसात आपले जीवन संपवले. या घटनेनंतर पंकजा मुंडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत शांत आणि सकारात्मक राहण्याचा सल्ला दिला आहे.
"स्वतः च्या जीवाला धक्का तोच लावेल ज्याला माझ्यावर प्रेम किंवा श्रद्धा नाही. मी लढत आहे संयम ठेवत आहे तुम्हीही सकारात्मकता दाखवा आणि संयमाने रहा. कोणी माझ्यासाठी जीव देणे कळतेय का किती कठीण आहे माझ्यासाठी??मला प्रचंड अपराधी आणि दुःखी वाटत आहे. मी स्वीकारला आणि पचवला आहे पराभव तुम्ही ही पचवा!! अंधारी रात्री नंतर सुंदर प्रकाश असतो तुम्ही माझ्या जीवनातील प्रकाश आहात. शांत व सकारात्मक रहा," असे पंकजा मुंडे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
स्वतः च्या जीवाला धक्का तोच लावेल ज्याला माझ्यावर प्रेम किंवा श्रद्धा नाही ...मी लढत आहे संयम ठेवत आहे तुम्हीही सकारात्मकता दाखवा आणि संयमाने रहा..कोणी माझ्यासाठी जीव देणे कळतेय का किती कठीण आहे माझ्यासाठी??मला प्रचंड अपराधी आणि दुःखी वाटत आहे ... मी स्वीकारला आणि पचवला आहे पराभव…
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) June 9, 2024
बीड लोकसभा मतदार संघातील पराभव झाल्याने अंबाजोगाई तालुक्यातील डिघोळअंबा येथील उसतोड कामगार पांडुरंग सोनवणे शेतात जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली. पांडुरंग सोनवणे हे भाजप आणि पंकजा मुंडे यांचा कट्टर समर्थक होते. त्यांच्या मागे कुटुंबात आई, वडील, पत्नी व एक मुलगी व लहान मुलगा आहे.
दरम्यान, मुंडेच्या पराभवाची घोषणा झाल्यानंतर पांडुरंग सोनवणे हे दुःखी झाले होते आणि त्यांनी आत्महत्या करणार असे बोलून दाखवले होते. मात्र त्यावेळी सरपंच आणि गावकऱ्यांनी त्यांची समजूत काढली आणि त्यांना आत्महत्येचा विचार मनातून काढून टाक असे सांगितले. मात्र त्यानंतर पाच दिवसांनी सोनवणे यांनी टोकाचे पाऊल उचलले.