“आम्ही न्यायाची अपेक्षा कधी करायची?”; मृत संतोष देशमुख यांच्या मुलीची संतप्त विचारणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 13:53 IST2024-12-31T13:52:40+5:302024-12-31T13:53:34+5:30
Beed Sarpanch Santosh Deshmukh Case: माझ्या वडिलांना आणि आम्हाला लवकरात लवकर न्याय द्या एवढीच अपेक्षा आहे, असे मृत संतोष देशमुख यांच्या मुलीने म्हटले आहे.

“आम्ही न्यायाची अपेक्षा कधी करायची?”; मृत संतोष देशमुख यांच्या मुलीची संतप्त विचारणा
Beed Sarpanch Santosh Deshmukh Case: बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात फरार असलेला वाल्मिक कराड हा पुण्यात सीआयडीला शरण आला आहे. यामुळे पुण्यातील CID मुख्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला होता. CID ची पथके मागील पंधरा दिवसापासून वाल्मीक कराड याचा शोध घेत आहेत. परंतू तो त्यांना सापडू शकला नव्हता. वाल्मीक कराडच्या शेवटच्या लोकेशनबाबत मोठी अपडेट समोर आली होती. कराड याचे शेवटचे लोकेशन मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये होते, यानंतर त्याचा फोन बंद असल्याचे समोर आले. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मृत संतोष देशमुख यांच्या कन्या वैशाली देशमुख यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
माझ्या वडिलांना लवकरात लवकर न्याय मिळायला हवा. इतके दिवस झाले पोलीस यंत्रणा काम करते आहे. पण त्यांना इतका वेळ का लागत आहे, ते गुन्हेगार असतील तर ते स्वतः सरेंडर होत आहेत. तर मग इतके दिवस पोलीस यंत्रणा काय करत आहे. त्यांना पकडण्यासाठी इतका वेळ लागत असेल तर, आम्ही न्यायाच्या पेक्षा कधी करायची. आम्हाला न्याय कधी मिळणार, माझी एकच मागणी आहे. ज्यांनी माझ्या वडिलांची क्रूरपणे हत्या केली. जे तीन आरोपी फरार आहेत, लवकरात लवकर अटक करावी. माझ्या वडिलांना आणि आम्हाला लवकरात लवकर न्याय द्या एवढीच अपेक्षा आहे, असे वैभवी देशमुख यांनी म्हटले आहे.
...तर न्यायदेवता जी शिक्षा देईल ती भोगायला तयार आहे
सीआयडीला शरण जाण्यापूर्वी कराडने एक व्हिडिओ जारी केला आहे. यामध्ये त्याने केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झाल्याचा आरोप केला आहे. मी सीआयडी ऑफिस पुणे येथे सरेंडर होत आहे. संतोष देशमुख यांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी, फाशी द्यावी. राजकीय द्वेषापोटी माझे नाव त्याच्याशी जोडले जात आहे. पोलीस तपासात जर मी दोषी दिसलो तर न्यायदेवता जी शिक्षा देईल ती भोगायला तयार आहे, असे वाल्मीक कराड याने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, वाल्मीक कराड परळी नगर परिषद माजी नगराध्यक्ष आहे. मंत्री धनंजय मुंडे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखला जातो. गेल्या दहा वर्षांपासून परळी मतदारसंघातील राजकीय व्यवस्थापनाची जबाबदारी वाल्मीक कराडने पाहिली. धनंजय मुंडेंचे राजकारण सुरू झाले, तेव्हापासून वाल्मीक कराड सावलीसारखा त्यांच्यासोबत आहे. जिल्ह्यातील सरकारी, सामाजिक सर्व कार्यक्रम कराड पाहतो. धनंजय मुंडे पालकमंत्री असताना एक प्रकारे तो जिल्हा चालवायचा. वाल्मीक कराड याच्यावर गंभीर गुन्हे दाखल झालेत.