अंबरनाथमध्ये गोमांस विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2016 06:41 AM2016-08-29T06:41:51+5:302016-08-29T06:41:51+5:30

अंबरनाथच्या उलनचाळ या वस्तीत अनधिकृतपणे कत्तलखाना उभारून गोवंशातील चोरलेल्या प्राण्यांची हत्या करण्याचा तसेच मांसविक्रीचा व्यवसाय पोलिसांनी रविवारी छापा टाकून उघडकीस आणला.

Beef sale in Ambernath | अंबरनाथमध्ये गोमांस विक्री

अंबरनाथमध्ये गोमांस विक्री

Next

अंबरनाथ : अंबरनाथच्या उलनचाळ या वस्तीत अनधिकृतपणे कत्तलखाना उभारून गोवंशातील चोरलेल्या प्राण्यांची हत्या करण्याचा तसेच मांसविक्रीचा व्यवसाय पोलिसांनी रविवारी छापा टाकून उघडकीस आणला.

अंबरनाथ पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी सकाळी छापा टाकला, तेव्हा त्यांच्यासमोरच हे कृत्य सुरू होते. पोलिसांनी लागलीच आरोपींना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी मनसेच्या शहर उपाध्यक्षासह पाच जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. खातरजमा करण्यासाठी मांसाचे तुकडे तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.

मनसेचे शहर उपाध्यक्ष युसुफ काशीद शेख (४५) यांचा या घटनेशी थेट संबंध असल्याचे उघड झाले. जेथे प्राण्यांची हत्या करण्यात येत होती, तो गाळा आणि तेथे काम करणारे सर्व कामगार हे शेख यांचेच होते. शेख यांचा मांसविक्रीचा व्यवसाय असल्याने त्यांच्यावर यापूर्वीही अनेकवेळा गोवंशाच्या मांसविक्रीचा आरोप झाला होता. पण, पुरावे नव्हते. यावेळी मात्र थेट पुरावे सापडल्याने ते अडचणीत सापडले. प्राण्यांची हत्या करून मांसविक्रीची तयारी जेथे सुरू होती, तेथून शफी इब्राहिम कुरेशी (४०), रियाज मोहमद शेख (३५),अजाद निजामुद्दीन कुरेशी (२६) आणि सज्जाद निजामुद्दीन कुरेशी (३३) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच कत्तलीसाठी वापरलेले शस्त्रही जप्त करण्यात आले आहे. या सर्व आरोपींविरोधात महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा १९९५ च्या कलम ५ (९) प्रमाणे तसेच आयपीसीच्या ४२९ (३४) नुसार गुन्हा दाखल केला आहे. सर्व आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली आहे. या आरोपींना सोमवारी उल्हासनगर न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Beef sale in Ambernath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.