पालिकेच्या पार्किंगमधील बिअरबार सुरूच
By admin | Published: June 9, 2016 01:01 AM2016-06-09T01:01:35+5:302016-06-09T01:01:35+5:30
महापालिकेच्या मुख्य भवनाच्या आवारामधील पार्किंगमध्ये तळीरामांचा अड्डा सुरूच आहे.
पुणे : महापालिकेच्या मुख्य भवनाच्या आवारामधील पार्किंगमध्ये तळीरामांचा अड्डा सुरूच आहे. मुख्य इमारतीत रात्री सुरक्षेसाठी डझनभर सुरक्षारक्षक असतानाही या पार्किंगमध्ये दारूच्या बाटल्यांचा खच साठला असून या पार्किंगमध्ये राजरोसपणे दारू पार्ट्या रंगत असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे महापालिका आयुक्तांची गाडी ज्या ठिकाणी पार्किंग केली जाते त्या आवारातच या पार्ट्या रंगत असून या बाटल्या उचलून महापालिकेचे स्वच्छता कर्मचारीही वैतागले आहेत. दरम्यान, या बुधवारी या पार्किंगमध्ये तब्बल ७० ते ८० बाटल्यांचा खच आढळून आला आहे. महापालिकेच्या पार्किंगमध्ये सुरू असलेल्या या रंगेल दारूपार्ट्यांची बाब दोन वर्षांपूर्वी ‘लोकमत’ने उजेडात आणली होती. त्याची गंभीर दखल घेत रात्री सुरक्षेसाठी तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करून जादा सुरक्षा तैनात करण्यात आली होती. त्यानंतर हे प्रकार काही प्रमाणात बंदही झालेले होते. मात्र, आता पुन्हा हे प्रकार सुरू झाले असून दररोज सकाळी या पार्किंगची सफाई करताना किमान डझनभर पाणी, सोडा तसेच दारूच्या बाटल्या सापडत आहेत. (प्रतिनिधी)
>या इमारतीच्या सुरक्षेसाठी रात्री डझनभर सुरक्षारक्षक तैनात असतात. हे कर्मचारी रात्रभर गस्त घालून पालिकेचा काना कोपरा पिंजून काढत असल्याचा दावा करतात. मग पार्किंगमध्ये सुरू असलेल्या दारू पार्ट्या या कर्मचाऱ्यांना दिसत नाहीत का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. मात्र, या पार्ट्या या सुरक्षा रक्षकांच्या आशीर्वादानेच होत असून त्यात काही कर्मचारीही दारूवर ताव मारत असल्याचे काही कर्मचारी खासगीत बोलताना सांगतात.