विद्यार्थ्यांवर मधमाशांचा हल्ला
By admin | Published: April 21, 2015 11:38 PM2015-04-21T23:38:20+5:302015-04-22T00:29:12+5:30
मडुरा येथील घटना : ४० विद्यार्थी गंभीर जखमी, मुख्याध्यापकांना पालकांचा घेराव
बांदा : मडुरा येथील न्यू इंग्लिश स्कूलमधील विद्यार्थ्यांवर मंगळवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास मधमाशांनी शाळेतच विद्यार्थ्यांवर हल्ला केल्याने ४० विद्यार्थी जखमी झाले.
दरम्यान, शाळा व्यवस्थापनाच्या हलगर्जीपणामुळे मधमाशांनी हल्ला केल्याचा आरोप करत पालकांनी प्रशाळेचे मुख्याध्यापक श्रीपाद पणशीकर यांना घेरावो घालत जाब विचारला. जखमी विद्यार्थ्यांवर बांदा आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत.
मडुरा प्रशाळेत नववीच्या विद्यार्थ्यांचे दहावीसाठी जादा अभ्यासिका वर्ग सुरू आहेत. सकाळी वर्ग सुरू होता. खोलीच्या इमारतीलाच खिडकीलगत मधमाशांचे पोळे आहे. पालकांनी शाळा व्यवस्थापनाला ते काढून टाकण्याविषयी सूचना केली होती. मात्र, व्यवस्थापनाने कानाडोळा केला होता.
अभ्यासिका संपल्यानंतर मुले घरी जाण्यासाठी बाहेर पडत असताना मधमाशांचे मोहोळ उठल्याने त्यांनी विद्यार्थ्यांवर हल्ला केला. विद्यार्थी सैरावैरा पळू लागले. तब्बल ४० विद्यार्थ्यांना मधमाशांनी चावा घेतला. काही विद्यार्थ्यांनी लगतच्या जंगलाचा आसरा घेतला.२२ जखमी विद्यार्थ्यांना पालकांनी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. इतरांना बांद्यात खासगी दवाखान्यात उपचारासाठी आणले. वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील यांनी विद्यार्थ्यांवर उपचार केलेत. (प्रतिनिधी)
जखमी झालेले विद्यार्थी
स्वाती शिवदास गवंडे (वय १५, रा. निगुडे), निकिता मंगेश कोरगावकर (वय १५, रा. निगुडे), अक्षता राजाराम नाईक (वय १५, रा. इन्सुली), मंदाकिनी सुनील आरोसकर (वय १५, रा. शेर्ले), अमिषा दशरथ मळगावकर (वय १५, रा. शेर्ले), श्वेता शत्रृघ्न तुळसकर (वय १५, रा. निगुडे), प्रियांका सत्यवान राणे (वय १४, रा. निगुडे), रोशन जयराम गवंडे (वय १५, रा. निगुडे), श्रध्दा ज्ञानेश्वर यादव (वय १५, रा. शेर्ले), सुजाता संजय धुरी (वय १५, रा. शेर्ले), सुप्रिया संजय धुरी (वय १५, रा. शेर्ले), सिमिता ज्ञानेश्वर धुरी (वय १५, रा. शेर्ले), समृध्दी सुदन धुरी (वय १५, रा. शेर्ले), मनाली बाळा गावडे (वय १५, रा. निगुडे), नटेश्वरी दत्ताराम पवार (वय १५, रा. निगुडे), अर्पिता अशोक अमरे (वय १५, रा. पाडलोस), बस्तॅव फास्कू फर्नांडीस (वय १५, रा. रोणापाल), वासुदेव मुकुंद गावडे (वय १५, रा. निगुडे), अरुण चिंदरकर ( वय १५, रा. मडुरा)
मुख्याध्यापकांना घेराव
प्रशाळेच्या इमारतीवर असलेले मधमाशांचे पोळे धोकादायक असल्याने हे पोळे काढण्याविषयी पालकांनी वेळोवेळी सूचना करूनही शाळा व्यवस्थापनाने पोळे न काढल्याने विद्यार्थ्यांना नाहक मधमाशांचा हल्ला सहन करावा लागला. बांदा प्राथमिक आरोग्य केंद्र आवारात प्रशाळेचे मुख्याध्यापक श्रीपाद पणशीकर यांना पालकांनी घेराव घालत जाब विचारला.
आपण हलगर्जीपणा केल्याने व बेजबाबदार वागल्याने ही घटना घडल्याचा आरोप पालकांनी केला. यावेळी पणशीकर यांनी आपली चूक मान्य करत पालकांची माफी मागितली. यावेळी निगुडे सरपंच आत्माराम गावडे, उपसरपंच जयराम गवंडे, ग्रामपंचायत सदस्य झेवियर फर्नांडीस, रोणापाल उपसरपंच उदय देऊलकर, पाडलोस माजी उपसरपंच लक्ष्मण कुडतरकर, दीपक गोेवेकर, शत्रृघ्न तुळसकर आदिंसह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.