उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वीच जिल्हाप्रमुखाचा शिवसेनेला 'जय महाराष्ट्र'; भाजपात प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2022 11:29 AM2022-09-08T11:29:51+5:302022-09-08T11:30:41+5:30
मागील अडीच वर्षात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. मतदारसंघातील कामांसाठी वारंवार त्यांच्याकडे गेलो परंतु एकही काम त्यांनी केले नाही असा आरोप जिल्हाप्रमुख वानखेडेंनी केला.
अमरावती - मागील दोन महिन्यापासून शिवसेनेला लागलेली नेत्यांची गळती थांबण्याचं चिन्हे नाही. शिंदे गटासोबतच आता शिवसेनेतील उद्धव ठाकरेंसोबतचे नेते भाजपात प्रवेश करत आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या महाप्रबोधन यात्रा दौऱ्यापूर्वीच जिल्हाप्रमुख राजेश वानखेडे हे भाजपात प्रवेश करणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत ते प्रवेश करतील.
याबाबत जिल्हाप्रमुख राजेश वानखेडे म्हणाले की, शिंदे गटात जाणे म्हणजे शिवसेनेच्या वेगळ्या गटात जाण्यासारखं आहे. त्यामुळे मतदारसंघातील लोकांचा विचार करता ज्यांनी मागच्या निवडणुकीत मला ६६ हजार मतदान केले त्यांची इच्छा आहे आपण भाजपात गेले पाहिजे. भाजपा हिंदुत्ववादी पक्ष आहे. उद्धव ठाकरे हे काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आहेत. त्यामुळे सर्वानुमते शिवसैनिकांसह मी भाजपात प्रवेश करणार आहे असं त्यांनी सांगितले. २०१९ च्या निवडणुकीत तिवसा मतदारसंघात काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांच्याविरोधात राजेश वानखेडे यांनी निवडणूक लढवली होती. त्यावेळी नंबर दोनची मते वानखेडेंना मिळाली होती.
तसेच मागील अडीच वर्षात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. मतदारसंघातील कामांसाठी वारंवार त्यांच्याकडे गेलो परंतु एकही काम त्यांनी केले नाही. यशोमती ठाकूर यांच्याविरोधात आम्ही लढलो. त्यात मुख्यमंत्री आमचा असूनही कामे होत नव्हती. त्यामुळे लोकांकडून प्रश्न येत होते. त्या प्रश्नांना उत्तरं देऊन आम्ही त्रस्त झालो. पक्षप्रमुखच जर न्याय देत नसतील तर पक्षात राहायचं कशाला? असा प्रश्न राजेश वानखेडे यांनी उपस्थित केला.
उपजिल्हाप्रमुखापासून विभागप्रमुख प्रवेश करतील
शिवसेनेच्या काही लोकांनी माझ्याविरोधात काम केले होते. परंतु मतदारांनी त्यांचं न ऐकता माझ्या बाजूने मतदान केले. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, विभागप्रमुख हे माझ्यासोबत भाजपात प्रवेश करणार आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून उद्धव ठाकरे निवडणुका लढवत असतील तर हिंदुत्वाच्या विचारांनी ज्यांनी काम केले. ज्या लोकांनी मतदान केले त्यांनी काय करायचं? असं जिल्हाप्रमुख राजेश वानखेडे म्हणाले. अमरावतीत जिल्हाप्रमुख राजेश वानखेडे यांच्या भाजपा प्रवेशामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.