भीक मागणारी मुले केली गायब!

By Admin | Published: January 10, 2016 11:02 PM2016-01-10T23:02:45+5:302016-01-11T00:45:04+5:30

सांगली, मिरजेत छापे : ‘आॅपरेशन स्माईल’चा परिणाम; तीन मुली सापडल्या

Beggar kids have disappeared! | भीक मागणारी मुले केली गायब!

भीक मागणारी मुले केली गायब!

googlenewsNext

सचिन लाड -- सांगली वाट चुकलेल्या मुलांना पुन्हा त्यांच्या घरी पोहोचविण्यासाठी पोलिसांनी सुरू केलेल्या ‘आॅपरेशन स्माईल’ या मोहिमेचा चांगलाच परिणाम झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शहरात भीक मागण्यासाठी लहान मुलांचा वापर करणाऱ्या टोळीने या कारवाईचा चांगलाच धसका घेतला आहे. मुलांमार्फत पोलीस आपल्यापर्यंत पोहोचू नयेत, यासाठी या टोळीने मुलांनाच गायब केले आहे. त्यामुळे गेल्या चार दिवसात सांगली, मिरजेत भीक मागणाऱ्या एकाही मुलाचे दर्शन झालेले नाही.
खेळण्या-बागडण्याचं, शाळेत जाण्याचं त्यांचं वय. या वयात त्यांना भीक मागण्यासाठी रस्त्यावर फिरविले जात असल्याचे चित्र शहरात दररोज पाहायला मिळते. चार ते बारा वयोगटातील ही मुले हातात ताट व ताटात देवीची मूर्ती ठेवून रस्त्यावर दिसेल त्या व्यक्तीकडे भीक मागताना दिसतात. ही मुले कुणाची? त्यांना ज्यांनी जन्माला घातले ते कुठे आहेत? ते काय करतात? असे प्रश्न या मुलांना पाहिल्यानंतर पडल्याशिवाय राहत नाहीत. ही मुले स्वत:च्या चैनीसाठी किंवा कुटुंब चालविण्याची जबाबदारी म्हणून भीक मागतात असे नाही, तर त्यांच्या माध्यमातून भीक मागणे सुलभ होते म्हणून त्यांचा वापर केला जात आहे.
सांगली, मिरजेत अनेक सामाजिक संस्था आहेत. राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आहेत. तसेच शासनाचे विविध सामाजिक उपक्रम आहेत. मात्र तरीही बालभिकाऱ्यांच्या प्रश्नावर वाचा फोडण्यास कुणाला वेळ नाही.
भीक मागणाऱ्या मुलांना रिक्षातून सांगलीतील राम मंदिर व मिरजेतील रेल्वे स्टेशन परिसरात सकाळी अकराला सोडले जाते. त्यानंतर त्यांना दुपारी एक वाजता नेण्यासाठी पुन्हा रिक्षा येते. दोन तासात भीक मागून वीस रुपयेही गोळा होत नाहीत. थंडीचा कडाका वाढला असताना मुलांच्या अंगावर स्वेटरही नसतो. या मुलांची भेट घेऊन चौकशी केली, तर ते शिकवल्यासारखे ठराविक उत्तर देतात. यामध्ये ते शाळेला जातोय, पण आज सुट्टी असल्याने भीक मागायला आलो आहे, आई किंवा वडील या दोघांपैकी एकाचे निधन झाले आहे, असे सांगतात. ही मुले एकमेकांची फार काळजी घेतात. चार वर्षाचं लेकरू सोबत असेल तर त्याची आपुलकीने काळजी घेतात.
‘आॅपरेशन स्माईल’ ही मोहीम राबविणाऱ्या पथकातील सहायक पोलीस निरीक्षक संजय मेंढे यांच्या पथकाने गेल्या चार दिवसांपासून अशा मुलांवर वॉच ठेवला आहे.


मुले गेली कुठे?
‘आॅपरेशन स्माईल’ या मोहिमेंतर्गत वाट हरविलेल्या मुलांचा शोध घेतला जातो. पण भिकेसाठी त्यांचा वापर केला जात असेल, तर त्याचीही दखल घेतली जाते. त्यानुसार सांगली व मिरजेत मुलांचा शोध सुरू आहे. पोलीस आपल्यापर्यंत पोहोचू नयेत, यासाठी भीक मागणाऱ्या मुलांना रातोरात गायब करण्यात आले आहे. सांगलीत काँग्रेस भवन परिसरात केवळ तीन मुली सापडल्या. या मुलींना बालसुधारगृहात ठेवण्यात आले आहे. त्यांचे पालक अद्याप पुढे आलेले नाहीत. यावरुन या मुली अनाथ असून, त्यांचा भिकेसाठी वापर केला असण्याची शक्यता आहे. पण अन्य मुले गेली कुठे? असा प्रश्न पोलिसांना पडला आहे.


दयेसाठी दयनीय अवस्था
भीक मागण्यासाठी ज्या लहान मुलांचा वापर आणि उपयोग केला जातो, त्यांना पुरेसे खाण्यास दिले नसल्याचे त्यांच्या तब्येतीवरुन दिसून येते. या मुलांकडे पाहून कुणालाही दया आली पाहिजे, अशाच अवस्थेत त्यांना ठेवले जाते


डोळ्यात तरळतात अश्रू...
भीक मागणाऱ्या मुलांकडे पाहिले तर, डोळ्यात अश्रू उभारतात. अंगावर धड कपडे नाहीत, केस वाढलेले, पायात चप्पल नाही. शर्टाची बटणे तुटलेली, डोळ्यावर प्रचंड ताण, पोट खपाटीला गेलेले असते. या मुलांना पाहून अनेकांना दया येते. यामुळे काहीजण भीक देतात, तर काहीजण भिकेचा फंडा म्हणून त्यांना झिडकारतात. या कोवळ्या मुलांना भीक मागायला कोण लावतो, यामागचे अर्थकारण काय, याचा विचार करायला कुणालाही वेळ नाही.

Web Title: Beggar kids have disappeared!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.