मुख्य सभेतील बायोमेट्रिक हजेरीला अखेर सुरुवात
By admin | Published: August 4, 2016 12:53 AM2016-08-04T00:53:27+5:302016-08-04T00:53:27+5:30
महापौर प्रशांत जगताप यांनी बायोमेट्रिक पद्धतीने नोंद करून अखेर बुधवारपासून बायोमेट्रिक हजेरीला सुरुवात करण्यात आली
पुणे : महापालिका मुख्य सभा हजेरीची महापौर प्रशांत जगताप यांनी बायोमेट्रिक पद्धतीने नोंद करून अखेर बुधवारपासून बायोमेट्रिक हजेरीला सुरुवात करण्यात आली आहे. पालिकेतील ९२ नगरसेवकांनी आतापर्यंत बायोमेट्रिक हजेरीसाठी बोटांचे ठसे प्रशासनाकडे दिले आहेत, त्यांची हजेरी त्यानुसार नोंदविण्यास सुरुवात झाली आहे.
परिवर्तन या स्वयंसेवी संस्थेने ४ निकषांच्या आधारे नगरसेवकांचे प्रगतिपुस्तक तयार केले. त्यामध्ये मुख्य सभेला उपस्थिती किती होती, वॉर्डस्तरीय निधी कशावर खर्च केला, सभागृहात किती लेखी प्रश्न विचारले, गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का, याच्या आधारे त्यांनी त्यांचे निष्कर्ष नोंदवले. नगरसेवकांनी रजिस्टरवर सह्या करून नोंदवलेल्या उपस्थितीच्या आधारे परिवर्तन संस्थेने त्याची आकडेवारी जाहीर केली. त्यानुसार सर्वच राजकीय पक्षांच्या नगरसेवकांची मुख्य सभेला ७० टक्क्यांपेक्षा अधिक उपस्थिती असल्याचे स्पष्ट झाले आहे.
नगरसेवकांच्या मुख्य सभेची उपस्थिती बायोमेट्रिक हजेरीनुसार नोंदविण्याचा निर्णय झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यासाठी माननीयांना त्यांच्या बोटाचे ठसे प्रशासनाकडे नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले. नगरसचिव कार्यालयाने त्यासाठी तीन ते चार वेळा विशेष शिबिरांचे आयोजन केले. त्यांच्या पाठपुराव्यानंतर ९२ नगरसेवकांचे ठसे प्रशासनाला प्राप्त झाले. मात्र, उर्वरित ६० माननीयांना त्यांच्या बोटांचे ठसेच प्रशासनाकडे न नोंदविल्याने बायोमेट्रिक हजेरी प्रत्यक्षात येऊ शकली नव्हती. मात्र, ज्यांनी बायोमेट्रिकसाठी संमती दिली, तितक्यांची हजेरी बायोमेट्रिकने घेण्याचा निर्णय महापौरांनी घेतला.
>मुख्य सभेला उपस्थित न राहता नगरसेवकांकडून रजिस्टरवर सह्या केल्या जात असल्याने अनेक प्रकार यापूर्वी उघडकीस आले होते. शहरात सर्व शासकीय कार्यालये, खासगी संस्था यामधील अधिकारी व कर्मचाऱ्यांची हजेरी बायोमेट्रिक पद्धतीने नोंदविण्यात येते. अगदी महापालिकेतीलही सर्व अधिकारी व कर्मचारी बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी नोंदवितात.