बोदवडमध्ये मोहरमला सुरुवात
By Admin | Published: October 10, 2016 07:46 PM2016-10-10T19:46:49+5:302016-10-10T19:46:49+5:30
शंभरपेक्षा जास्त वर्षांची परंपरा असलेल्या हिंदू-मुस्लीम एकतेचा राज्यभर संदेश देणाऱ्या मुस्लीम बांधवांच्या मोहरम सणाला येथे सुरूवात झाली आहे. मोहरमला येथे विशेष महत्त्व
ऑनलाइन लोकमत
बोदवड, दि. 10 - शंभरपेक्षा जास्त वर्षांची परंपरा असलेल्या हिंदू-मुस्लीम एकतेचा राज्यभर संदेश देणाऱ्या मुस्लीम बांधवांच्या मोहरम सणाला येथे सुरूवात झाली आहे. मोहरमला येथे विशेष महत्त्व आहे. मोहरमनिमित्त बोदवड शहरात ठिकठिकाणी मंडप टाकून सुमारे २३० सवाऱ्या बसविण्यात आल्या आहेत.यात हिंदू बांधवांनीही सवाऱ्या बसविल्या आहेत हे विशेष आहे. या सणासाठी राज्यभरातून भाविक बोदवड येथे येतात. मोठी आर्थिक उलाढाल या निमित्त होते.
हिंदू-मुस्लीम एकात्मेचे दर्शन घडवणाऱ्या मोहरम सणाला येथे सुरूवात झाली. १० रोजीपासून सवाऱ्या बसविण्यात आल्या आहेत. चार दिवस चालणाऱ्या या उत्सवासाठी बोदवड शहरात ठिकठिकाणी मंडप टाकून सजावट करण्यात आली आहे. मोहरमसाठी चांदीची नाल व फुलांच्या गलेबने सजवलेल्या सवाऱ्या (छड्या) बसवण्यात आल्या आहेत. या काळात सवाद्य मिरवणूक भगत मंडळीकडून काढण्यात येते.ही मिरवणूक पाहण्यासाठी मुंबई, सुरत, बुऱ्हाणपूर, अकोला व इतर ठिकाणाहून ग्भाविकांचे गर्दी होते. भगत मंडळींच्या घरी नातेवाईकांची गर्दी असते. मिरवणुकीची रंगत पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा गर्दीचा महापूर पाहायला मिळतो.
फुलांची उधळण यावेळी केली जाते.
चार दिवसाशीय या मोहरमच्या पहिल्या दिवशी मिरवणुकीने सुरूवात झाली. तिसऱ्या दिवशी नवस, मान फेडण्याचा विधी होतो. चौथ्या दिवशी मिरवणुकीने शासकीय दप्तरी नोंद कौन सवाऱ्या (थंड्या) विसर्जन केल्या जातात.
ब्रिटिश काळात नोंद
बोदवड येथील सवाऱ्यांची ब्रिटीश शासन काळापासून शासकीय दप्तरात नोंद आहे. बोदवड पोलीस ठाण्यातही याची नोंद ठेवली जात आहे.
चार दिवसात माठी उलाढाल
मोहरमच्या सवाऱ्यांच्या या चार दिवशीय उत्सवात शहरात मोठी आर्थिक उलाढाल होते. कापड दुकानदार, किराणा, फुलहार, वाजंत्री व सराफ बांधवांचा चांगला व्यवसाय होतो. भाविक नवस व मान फेडण्यासाठी अत्तर, चांदीचा पाळणा, खोबरावाटी, फुलाची चादर, कपड्याचा गलेब असे खरेदी करुन चढवत असतात त्यातून लाखोंची उलाढाल होते.बोदडचा बाजार या सणासाठी सजला आहे.
हिंदू-मुस्लीम एकता
वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या बोदवडला सुरू असलेल्या मोहरमच्या सवाऱ्यामध्ये हिंदू-मुस्लीम बांधव सवाऱ्याच्या निमित्ताने एकत्र जमून या उत्सवातून मिरवणुकीतून एकात्मतेचा संदेश देत आहेत. आजपावेतो याला गालबोट लागले नाही हे विषेश आहे.
शहरातील सवाऱ्यामध्ये भगत मंडळीत गोपाल गुरूजी, जगू भगत, बुना भगत, अमृत भगत, पप्पू मारवाडी भगत, सलाम भगत, अमीर भगत, सुभान भगत, ताहेर भगत, नईम शहा भगत, संतोष खाटीक भगत, आकाश कल्याणकर, सागर, गुड्डू,नाना, रमेश भगत अशी ही भगत मंडळी असून त्यांना मस्तानबाबा असे संबोधले जाते.
मोहरमच्या सवाऱ्यानिमित्त शहरातील हिंदू-मुस्लीम बांधव सलोख्याने एकत्र येवून हा उत्सव साजरा करतात. याची काटेकोर अंमलबजावणी ही पोलिसांकडून करण्यात येते यालाही वाढीव बंदोबस्त ही तैनात करण्यात आला आहे.
हिंदुच्या सवाऱ्या अधिक
आजघडीला बोदवड पोलीस ठाण्यात १२५ सवाऱ्यांची नोंद झाली आहे. त्यात ७५ सवाऱ्या या हिंदुच्या तर ५० सवाऱ्या मुस्लीम बांधवांच्या आहेत. हा शासकीय आकडा आहे. तर एकूण २३० सवाऱ्या बसविण्यात आल्याची माहिती देण्यात आली. येथील सवाऱ्या व मोहरम महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. सवाऱ्या या प्रसिद्ध आहेत.
मोहरम म्हटल्यानंतर बोदवडला उत्सवाचे जणू उधाणच आले आहे. यावर उच्च शिक्षित लोकांची ही असिम श्रद्धा आहे. ते या सवाऱ्याच्या मिरवणुकीत भगत मंडळीसोबत सहभागी झाले आहेत. त्यात पेशाने डॉक्टर, वकील, शिक्षक व सरकारी नोकरदार वर्गाची ही संख्या मोठी आहे.