राज्यात धुवाधार 'वर्षा'व करणाऱ्या मॉन्सूनच्या 'एक्झिट' ला सुरुवात; यंदा १७ दिवस अधिक मुक्काम
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2020 07:51 PM2020-10-26T19:51:31+5:302020-10-26T20:08:47+5:30
विदर्भातून मॉन्सूनची माघारी ; नांदेड, नाशिक, डहाणुपर्यंत मॉन्सून परतला
पुणे : गेल्या चार महिन्यांपासून अधिक काळ राज्यात धुवांधार वर्षा करणाऱ्या मॉन्सूनने राज्यातून एक्झिट घेण्यास सुरुवात केली आहे़. संपूर्ण विदर्भासह, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र व कोकणच्या काही भागातून मॉन्सून माघारी परतल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. दक्षिण पश्चिम मॉन्सून नांदेड, नाशिक, डहाणुपर्यंत माघारी आला आहे.
नैऋत्य मॉन्सूनने पश्चिम बंगालचा काही भाग, झारखंडचा बहुतेक भाग, ओडिशाचा काही भाग, छत्तीसगडचा उर्वरित भाग, आंध्र प्रदेशचा किनारपट्टीचा काही भाग, तेलंगणा, संपूर्ण विदर्भ, मध्य प्रदेश, गुजरात आणि अरबी समुद्राचा उत्तरेकडील भागातून परतला आहे़ संपूर्ण देशातून मॉन्सून २८ ऑक्टोबरपर्यंत माघारी परतण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर तामिळनाडु आणि पुडुचेरी, आंध्र प्रदेशचा किनारी भाग,कर्नाटक आणि केरळच्या आसपास २८ ऑक्टोबरपासून ईशान्य मॉन्सूनचा पाऊस सुरु होण्याची शक्यता आहे.
गेल्या २४ तासात कोकणातील संगमेश्वर, देवरुख, राजापूर, महाड, पोलादपूर, म्हसळा, वैभववाडी, वेंगुर्ला, लांजा, मालवण, मंडणगड, मुरुड आदि भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला़ मध्य महाराष्ट्रातील पाटण, पौड मुळशीसह अनेक ठिकाणी पाऊस पडला होता.
विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे.
२७ ऑक्टोबर रोजी कोंकण, गोव्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. २८ ऑक्टोबरपासून गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे़
़़़़़़़़
मॉन्सूनचा मुक्काम लांबला..
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाचे क्षेत्र आंध्र प्रदेश मार्गे मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातून अरबी समुद्रात जाऊन मिळाले होते. त्यामुळे मॉन्सूनचा परतीचा प्रवास लांबला होता. गेल्या काही वर्षांपासून मॉन्सूनचे आगमन व परतीच्या प्रवासात मोठा बदल आढळून आला आहे. त्यामुळे या वर्षी हवामान विभागाने देशभरातील विविध शहरात मॉन्सूनचे आगमन कधी होणार व तो कधी परतणार याच्या नवीन तारखा जाहीर केल्या आहेत.
विदर्भातून ३ ऑक्टोबर, मराठवाडा २८ सप्टेबर रोजी परतेल अशा यापूर्वी तारखा जाहीर केल्या होत्या. त्यात यंदा ८ व ९ ऑक्टोबर अशा सुधारित तारखा जाहीर केल्या होत्या. प्रत्यक्षात मॉन्सूनने आज सोमवारी एक्झिट घेतल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
मॉन्सूनच्या माघारीची सरासरी तारीख
स्थळ जुनी तारीख सुधारीत तारीख प्रत्यक्षात माघारी
अकोला ३ ऑक्टोबर ८ ऑक्टोबर २६ ऑक्टोबर
औरंगाबाद २८ सप्टेबर ९ ऑक्टोबर २६ ऑक्टोबर
अहमदनगर २८ सप्टेबर ८ ऑक्टोबर अजून मुक्काम
पुणे ३० सप्टेबर ९ ऑक्टोबर अजून मुक्काम
सातारा ३ ऑक्टोबर १२ ऑक्टोबर अजून मुक्काम
गोवा ३० सप्टेबर १४ ऑक्टोबर अजून मुक्काम