Onion Price : नवीन वर्षाच्या सुरुवातीला कांद्याचे दर आले निम्म्यावर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2020 03:47 AM2020-01-04T03:47:03+5:302020-01-04T03:47:13+5:30
Onion Price : एपीएमसीत ३५ ते ५० रुपये दर; किरकोळ मार्केटमध्ये दर ६०
नवी मुंबई : नवीन वर्षाच्या सुरुवातीला कांदा दरामध्ये घसरण सुरू झाली आहे. दर जवळपास निम्म्यावर आले आहेत. होलसेल मार्केटमध्ये कांदा ३५ ते ५० रुपये व किरकोळ मार्केटमध्ये ५० ते ६० रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत आहे.
२०१९ साली देशभर कांद्याचा तुटवडा निर्माण होऊन दरवाढीने नवीन विक्रम प्रस्थापित केला होता. सोलापूरमधील होलसेल मार्केटमध्येही २०० रुपये प्रतिकिलो दर प्राप्त झाला होता. मुंबई बाजार समितीमध्येही बाजारभाव १३० रुपयांवर गेले होते. नवीन वर्षामध्ये कांद्याचे दर नियंत्रणामध्ये येण्यास सुरुवात झाली आहे. शुक्रवारी बाजार समितीमध्ये ७२५ टन कांद्याची आवक झाली असून, प्रतिकिलो ३५ ते ५० रुपये दराने विक्री झाली आहे. किरकोळ मार्केटमध्येही दर घसरू लागले असून, ५० ते ६० रुपये किलो दराने विक्री होत आहे. बाजारभाव जवळपास निम्यावर आल्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
मुंबईमध्ये नाशिक, पुणे परिसरामधून कांद्याची आवक होत आहे. पांढऱ्या कांद्याचीही आवक सुरू असून, तो ५० ते ६० रुपये किलो दराने विकला जात आहे. इजिप्त व तुर्कीच्या कांद्याला ३० ते ३५ रुपये दर मिळत असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे.
मुंबई बाजार समितीतील बाजारभाव पुढीलप्रमाणे-
दिनांक दर
७ डिसेंबर ६० ते १३०
२० डिसेंबर ६० ते १००
२७ डिसेंबर ६० ते ८०
३ जानेवारी ३५ ते ५०