राज्यातील पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन अभ्यासमाला सुरू : शिक्षण विभागाचा उपक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2020 09:07 PM2020-04-13T21:07:01+5:302020-04-13T21:16:51+5:30
शाळा बंद मात्र दररोज मिळणार ऑनलाईन शिक्षण
पुणे: कोरोनामुळे जाहीर केलेल्या लॉकडाऊन (बंद) च्या काळात विद्यार्थ्यांचा शालेय अभ्यास थांबू नये यासाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने इयत्ता पहिली ते नववी च्या विद्यार्थ्यांसाठी दररोज विविध विषयाची ऑनलाईन अभ्यासमाला सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवारपासून (दि.13)मराठी विषयाने या अभ्यासमालेला सुरूवात करण्यात आली आहे, असे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक दिनकर पाटील यांनी संगितले.
राज्यातील शाळांना सुट्टी असली तरी अनेक खासगी व सरकारी शाळांकडून विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन पध्दतीने विविध शैक्षणिक उपक्रम राबविले जात आहेत. तर काही शाळा नियमितपणे ऑनलाईन वर्ग घेत आहे. त्यामुळे काही विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरूच आहे.परतु, राज्याच्या शिक्षण विभागाने पुढाकर घेत सर्व भाषेतील व माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी पाठ्य पुस्तकावर आधारित ऑनलाईन अभ्यासमाला सुरू केली आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना ऑनलाईन पध्दतीने शिकता येणार आहे.
'एससीआरटीई' कडून
सोमवारी पहिल्याच दिवशी मराठी विषयाचे पाठ शिकण्यासाठी देण्यात आले. इयत्ता पहिलीसाठी पाठ वाचन, इयत्ता दुसरीसाठी ' फुग्या रे ' हा पाठ , इयत्ता तिसरीला ' ट्राफिकदादा ' पाठ,इयत्ता चौथीला ' आभाळमाया' हा पाठ तर पाचवीला 'पाण्याची गोष्ट' , सहावीला 'नवा पैलू' , सातवीला 'कोळीण' , आठवीसाठी 'गे मायभू' हा पाठ तर नववीच्या विद्यार्थ्यांसाठी 'वनवासी' हा पाठ दिला. पाठांसह अनेक घटक दीक्षा अॅपवर उपलब्ध आहेत.
कोव्हिड-१९ (कोरोना) च्या साथीमुळे शाळा बंद आहेत. तसेच इयत्ता अकरावीपर्यंतच्या परीक्षा रद्द झाल्या आहेत.असे असले तरी विद्यार्थी घरी शालेय अभ्यासाच्या पलीकडे जाऊन पालकांकडून काही गोष्टी शिकत आहेत. प्रत्येक जण सतत काही ना काही तरी शिकतच असतो. परंतु, आता ' एससीआरटीई' ने दीक्षा ऍप च्या माध्यमातून ऑनलाईन पध्दतीने दररोज शालेय अभ्यासक्रम शिकण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. त्यामुळे विद्यार्थ्यांना घर बसल्या मोबाईलवर विविध गोष्टी शिकायला मिळणार आहेत, असे पाटील यांनी सांगितले तसेच विद्यार्थ्यांनी घरीच थांबा आणि सुरक्षित रहा, असेही आवाहन त्यांनी केले.
----------
'ऑनलाईन अभ्यासासाठी दीक्षा अॅप https://bit.ly/dikshadownload लिंक वरून डाऊनलोड करता येते.
---------
पुढील काळात ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीने व दूरचित्रवाणी संच (टीव्ही) व रेडिओ च्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी उपाययोजना केल्या जाणार आहेत. दीक्षा अॅपसाठी नेटवर्क असणे गरजेचे आहे.परंतु, काही दूर्गम भागात नेटवर्क बाबत अडचणी आहेत.त्यामुळे सकाळी दोन तास व सायंकाळी दोन तास दूरचित्रवाणी संचावरून विद्यार्थ्यांना शिकवण्याबाबत प्रयत्न सुरू आहेत . तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांना ऑडिओ बूक व रेडिओच्या माध्यमातून शिकवण्याचा विचार केला जात आहे.
- दिनकर पाटील,संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद