सूर-तालाच्या आविष्काराने ‘सवाई’ला सुरुवात

By Admin | Published: January 2, 2015 01:05 AM2015-01-02T01:05:53+5:302015-01-02T01:05:53+5:30

नववर्षाचा पहिला दिवस सूर, लय, तालातील विभिन्न आविष्कारांच्या अद्वितीय मैफलींनी रंगला.

The beginning of 'Sawai' by the invention of Sur-Taal | सूर-तालाच्या आविष्काराने ‘सवाई’ला सुरुवात

सूर-तालाच्या आविष्काराने ‘सवाई’ला सुरुवात

googlenewsNext

पुणे : नववर्षाचा पहिला दिवस सूर, लय, तालातील विभिन्न आविष्कारांच्या अद्वितीय मैफलींनी रंगला. निमित्त होते ६२व्या सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाचे. पं. हरिप्रसाद चौरसियांच्या मनमोहक बासरीवादनाने रसिकांवर मोहिनी घातली तर पूरबायन चॅटर्जी यांची सतारीवरील हुकमत आणि आनंद भाटे यांच्या अभिजात स्वरांनी रसिकांना थक्क केले.

प्रथेप्रमाणे डिसेंबर महिन्यात आयोजित करण्यात आलेल्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात मेघमल्हारच्या सुरांची नव्हे तर अवकाळी सरींमुळे रसिकांच्या आनंदावर विरजण पाडणारा ठरला. त्यामुळे महोत्सवच स्थगित करण्याची वेळ आर्य संगीत प्रसारक मंडळावर आली. मात्र नववर्षाच्या प्रारंभीच पुनश्च तितक्याच उत्साहात आणि रसिकांच्या उदंड प्रतिसादात या ‘स्वरयज्ञास’ रमणबागेच्या पटांगणावर गुरुवारी प्रारंभ झाला.
जुन्या-नव्या कलाविष्कारांचा सांगीतिक नजराणा रसिकांसमोर पेश झाला. गायन व वादनावर उत्तम प्रभुत्व असलेल्या पूरबायन चॅटर्जी यांच्या सतारीच्या आविष्काराने महोत्सवाला सुरुवात झाली.
वयाच्या पंधराव्या वर्षी युवावादक म्हणून राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवप्राप्त केलेल्या चॅटर्जी यांच्या सतारीवरची जबरदस्त हुकमत रसिकांनी अनुभवली. सतारीवर लीलया फिरणाऱ्या त्यांच्या जादुई बोटांनी रसिकांना मोहित केले. पटदीप रागात रूपक आणि तीन तालामध्ये आलाप, जोड, झाला हे प्रकार त्यांनी सादर केले. बंगालच्या भटियाली रागातील सादर केलेल्या धुनेने रसिकांचे कान तृप्त केले. ‘बालमा केसरीया, पधारो मारो देस’ ही रचना सादर करून त्यांनी आपल्या गायकीचे दर्शनही रसिकांना घडविले. तबल्यावर त्यांना पं. रामदास पळसुले यांनी साथसंगत केली.

आज सवाईमध्ये
सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची (दि. २) सुरुवात दुपारी ३ वाजता होणार आहे. या सत्रात धनंजय हेगडे (गायन), सुमित्रा गुहा (गायन), ध्रुपदसंच (गुंदेचा बंधू आणि सामवेद म्युझिक, वादन आणि गायन), सुचेता भिडे-चापेकर (नृत्य), पं. अजय पोहनकर (गायन)

४महोत्सवाच्या पहिल्या दिवसाचा समारोप पं. हरिप्रसाद चौरसियांच्या मंजूळ आणि मनमोहक बासरीवादनाने झाला. चौरसिया यांचे मोहक बासरीवादन आणि पं. विजय घाटे यांनी तबल्यावर केलेली साथ रसिकांच्या काळजाचा ठाव चुकविणारी होती. रसिकांनी समाधी अवस्थेतील ‘नादमाधुर्याची’ अनुभूती यावेळी घेतली.
४कृष्णाच्या बासरीतील मोहक स्वरलहरींचा तरंग आसमंतात पसरला असल्याची प्रचिती रसिकांना आली. झंजोटी रागात आलाप, जोड झाला त्यांनी सादर केले. पं. विजय घाटे यांच्या तबल्याची थाप आणि पंडित चौरसियांच्या बासरीचे सूर यांचा सुंदर मिलाफ अनुभवास मिळाला.
४रसिकांची वर्षाची सुरुवात जशी संगीतमय झाली तशीच रसिकांना सुख-शांती देणारे ठरावे यासाठी पं. हरिप्रसाद चौरसिया यांनी ‘ओम जय जगदीश हरे’ हे भजन सादर केले. अखेरीस पहाडी धून सादर करून मैफलीचा समारोप केला.

४सवाई गंधर्वांच्या नातसून पद्मा देशपांडे यांचेही बहारदार गायन झाले. मारूबिहाग रागात विलंबित एकतालातील ‘कल नाही आए’ व तीनतालातील ‘अखियाँ उनसे लागी’ या बंदिशी त्यांनी सादर केल्या. देशपांडे यांच्या गायनाने रसिकांना एक वेगळी अनुभूती आली.

४भारतीय अभिजात संगीतातील पिढीजात वारसा उलगडून दाखविणाऱ्या ‘विरासत’ या सतीश पाकणीकर यांनी टिपलेल्या छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरसिया यांच्या हस्ते झाले.

पुणेकर रसिकांची नवर्वर्षाची सुरुवात ‘सवाई’ने सुरेल व्हावी आणि पहिल्याच दिवशी सादरीकरण करण्याची संधी मिळावी ही अनेक वर्षांची इच्छा आज पूर्ण होत आहे. रसिकांचे हे वर्ष सुरेल व्हावे, ही प्रार्थना.
- पं. हरिप्रसाद चौरसिया

४स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांचे पट्टशिष्य आनंद भाटे यांच्या अभिजात गायकीचा प्रत्यय रसिकांनी घेतला. पंडितजींच्या गायकीचे संस्कार लाभलेल्या भाटे यांनी मैफल सुंदरपणे सजविली. ‘दुर्गा’ रागात विलंबित एकतालातील ‘तुम रस कान्हरे’ आणि ‘चतुर सुघरवा बालमा’ या बंदिशी त्यांनी खुलविल्या. अभंग, भजन आणि नाट्यसंगीत यांवर त्यांचे उत्तम प्रभुत्व असल्यामुळे त्यांचे सादरीकरण बहारदार झाले.
४माऊली टाकळकर यांचे स्वरमंचावर आगमन होताच रसिकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. भाटे यांचे ‘देव विठ्ठल’ हे सूर आसमंतात गुंजले अन् रसिकांच्या मुखातून ‘वाह्’ हे शब्द बाहेर पडले. पंडितजींचे ‘तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल’ या त्यांच्या भजनाने वातावरणात भक्तीचा रंग भरला. रसिकांनी उभे राहून त्यांच्या गायनाला मानवंदना दिली. रसिकांच्या आग्रहाखातर संगीत मानापमानमधील ‘खरा तो प्रेमा’ हे नाट्यसंगीत सादर करून सर्वांचीच वाहवा मिळविली. त्यांना हार्मोनिअमवर सुयोग कुंडलकर, तबल्यावर भरत कामत, तानपुऱ्यावर नीता दीक्षित आणि विनय चित्राव यांनी त्यांना साथसंगत केली.

 

Web Title: The beginning of 'Sawai' by the invention of Sur-Taal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.