बाजार समित्यांमधील व्यवहार कोलमडले

By admin | Published: June 3, 2017 04:07 AM2017-06-03T04:07:52+5:302017-06-03T04:07:52+5:30

शेतकऱ्यांच्या संपामुळे राज्यातील ३०५ बाजार समित्यांमधील व्यवहार पूर्णपणे कोलमडले आहेत. बहुतांश ठिकाणचे कामकाज पूर्णपणे

The behavior of market committees collapses | बाजार समित्यांमधील व्यवहार कोलमडले

बाजार समित्यांमधील व्यवहार कोलमडले

Next

नामदेव मोरे/  लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : शेतकऱ्यांच्या संपामुळे राज्यातील ३०५ बाजार समित्यांमधील व्यवहार पूर्णपणे कोलमडले आहेत. बहुतांश ठिकाणचे कामकाज पूर्णपणे थांबले आहे. शुक्रवारी जेमतेम ५५ बाजार समित्यांमध्येच समाधानकारक आवकची नोंद झाली असून, पूर्ण राज्यात २० हजार टन मालाचीच नोंद झाली आहे. एकूण आवकमधील ७ हजार टन आवक फक्त मुंबई बाजार समितीमध्ये झाली आहे.
कृषी मालाला योग्य भाव मिळावा. स्वामीनाथन आयोगाची तंतोतंत अंमलबजावणी व कर्जमाफी करावी, या मागणीसाठी बळीराजा संपावर जाताच, पूर्ण राज्यात हाहाकार सुरू झाला आहे. १२ कोटी नागरिकांना अन्नधान्याचा तुटवडा जाणवू लागला आहे.
मुंबई, पुणेसह सर्वच महानगरांमध्ये भाजीपाल्याचे दर गगनाला भिडू लागले आहेत. कृषी मालाचे प्रमुख केंद्र असणाऱ्या राज्यातील ३०५ बाजार समित्या व ६०३ उपबाजार आवारांमधील सर्व व्यवहार कोलमडले आहेत. ८० टक्के बाजार समित्यांमधील व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले असून, उर्वरित ठिकाणी आवक प्रचंड घटली आहे. मुंबई बाजार समितीमध्ये रोज १० ते १५ हजार टन मालाची आवक होत असते. शुक्रवारी फक्त ७,२४५ टन मालाचीच आवक झाली आहे. यामध्ये कांद्याची आवक झालीच नाही.
भाजीपाल्याची आवक ७० टक्के घटली आहे. मसाला व धान्य मार्केटमधील बहुतांश आवक परराज्यातून होत असल्याने, राज्यातील इतर बाजार समित्यांच्या तुलनेमध्ये मुंबईमधील आवक जास्त दिसत आहे.
संपाच्या दुसऱ्या दिवशी ३०५पैकी जेमतेम ५५ बाजार समित्यांमध्ये समाधानकारक आवक झाली आहे. पूर्ण राज्यभर फक्त २०,८८९ टन मालाची आवक झाली आहे. ज्या बाजार समित्यांमध्ये आवक झाली, त्यामध्येही भात, गहू, ज्वारी व इतर वस्तूंचा समावेश आहे. भाजीपाला, कांदा व इतर जीवनावश्यक व नाशिवंत वस्तूंची आवकच झालेली नाही. आंदोलन सुरूच राहिले, तर राज्यातील नागरिकांना शनिवारपासून भाजीपाला मिळणार नाही व डाळी व कडधान्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही.

शेतकऱ्यांची ताकद

राज्यातील शेतकरी संघटित झाला तर काय करू शकतो, हे शेतकरी संपामुळे दोन दिवसांमध्ये पूर्ण राज्याला समजले आहे. शेतकऱ्यांनी त्यांची ताकद दाखवून दिली असून, शासनाने आता तरी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावेत, अन्यथा आंदोलन तीव्र होऊन राज्यभर अन्नटंचाई सुरू होईल, असे एपीएमसीमधील व्यापारी सुरेश शिंदे यांनी सांगितले.

 

Web Title: The behavior of market committees collapses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.