बेस्ट कामगार ६ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून संपावर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2017 07:14 PM2017-08-03T19:14:23+5:302017-08-03T19:24:04+5:30
मुंबई महापालिका प्रशासन कोणतीच दखल घेत नसल्याने अखेर बेस्टच्या कामगार संघटनाने तिसऱ्या दिवशी उपोषण मागे घेतले आहे. मात्र आर्थिक मदत मिळवण्यासाठी बेस्टच्या कमगारांनी आता संपाचे हत्यार उपसले आहे. त्यानुसार ६ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून बेस्टचे ४४ हजार कामगार बेमुदत संपावर जाणार आहेत.
मुंबई, दि. 3 - मुंबई महापालिका प्रशासन कोणतीच दखल घेत नसल्याने अखेर बेस्टच्या कामगार संघटनाने तिसऱ्या दिवशी उपोषण मागे घेतले आहे. मात्र आर्थिक मदत मिळवण्यासाठी बेस्टच्या कमगारांनी आता संपाचे हत्यार उपसले आहे. त्यानुसार ६ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून बेस्टचे ४४ हजार कामगार बेमुदत संपावर जाणार आहेत. बेस्टच्या इतिहासात पहिल्यांदाच वर्धापन दिनी बेस्ट बंद असणार आहे. ७ ऑगस्टला रक्षाबंधन असल्याने मुंबईकरांची मात्र प्रचंड गैरसोय होणार आहे.
बेस्ट उपक्रमाची आर्थिक स्थिती हालाखीची असल्याने महापालिकेने मदत करून पालकत्वाची भूमिका पार पाडावी, अशी कामगारांची मागणी आहे. मात्र याबाबत पालिका प्रशासनाबरोबरच्या पाच बैठका निष्फळ ठरल्याने अखेर बेस्ट कामगारांनी मंगळवारपासून बेमुदत उपोषण सुरु केले होते. वडाळा आगारात बेस्ट कामगार संघटनांचे नेते बेमुदत उपोषण तर कामगार साखळी उपोषणाला बसले होते. मात्र गेल्या तीन दिवसात पालिकेचा एकही वरिष्ठ अधिकारी तिथे फिरकला नाही. त्यामुळे कामगार हवालदिल झाले आहेत.
अखेर तिसऱ्या दिवशी उपोषण मागे घेत असल्याचे बेस्ट कामगार संघटनांच्या कृती समितीने जाहीर केले. लोकशाही मार्गाने मदत मिळत नसल्याने आपल्या मागण्या मंजूर करून घेण्यासाठी संपावर जाण्याचा निर्णय कृती समितीने घेतला आहे. विशेष म्हणजे बेस्ट उपक्रम ७० वा वर्धापन दिन साजरा करीत असताना त्याच दिवशी बेस्ट बस गाड्या बंद असणार आहेत. त्यामुळे पालिका प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.
संप अटळ
पालिका प्रशासनाने या आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन चर्चादेखील केली नाही. पालिका प्रशासनाची अशी मुजोरी सुरू असताना आंदोलनकर्त्यांची प्रकृती मात्र खालावत आहे. त्यामुळे उपोषण मागे घेऊन ६ ऑगस्ट मध्यरात्रीपासून सर्व कर्मचार्यांनी बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय कृती समितीच्या बैठकीत घेतला.
- सुहास सामंत, ‘बेस्ट’ कामगार सेना, कृती समिती
संपात सहभागी संघटना
बेस्ट कामगार सेना, बेस्ट वर्कर्स युनियन, बेस्ट कामगार संघटना, भाजप बेस्ट कामगार संघ, बेस्ट कामगार युनियन, बेस्ट एम्प्लॉइज युनियन, बेस्ट परिवहन कर्मचारी संघ, बेस्ट जागृत कामगार संघटनांसह अनेक संघटना सहभागी होणार आहेत. त्यामुळे बस सेवा पुर्णतः ठप्प असतील असा दावा बेस्ट कामगार संघटना करीत आहेत.
अशा आहेत बेस्टच्या मागण्या
- आर्थिक मदत मिळावी
- कर्जाचे व्याज दर कमी असावे
- बेस्टचा अर्थसंकल्प महापालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करावा
- पालिका आकारत असलेल्या विविध करांतून सूट मिळावी
- बेस्ट कामगारांचा पगार महिन्याच्या दुसर्या दिवशी करावा
बेस्ट उप्रक्रमाच्या बसगाड्यांमधून ३० लाख प्रवाशी दररोज प्रवास करतात. तर बेस्टमार्फत कुलाबा, चर्चगेट ते सायन, माहीमपर्यंत शहर भागातील दहा लाख ग्राहकांना वीजपुरवठा केला जातो. बेस्ट उपक्रमाच्या डोक्यावर सुमारे २१०० कोटींचे कर्ज आहे.
बेस्ट उपक्रमात ४४ हजार कामगार-अधिकारी आहेत. त्यांच्या वेतनापोटी दरमहा १२० कोटी रुपयांची तजवीज बेस्ट प्रशासनाला करावी लागते.
बेस्ट उपक्रमाला वाचवण्यासाठी बचतीचा पहिला मार्ग म्हणून बेस्टने २७८ वातानुकूलित बसगाड्या बंद केल्या. तसेच बेस्टच्या भाड्यात वाढ करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. मात्र या दरवाढीस विरोध असल्याने हा प्रस्ताव अडचणीत आहे.