क्रीडा सुविधांची चौपट दरवाढ मागे
By admin | Published: May 14, 2014 05:54 AM2014-05-14T05:54:59+5:302014-05-14T05:54:59+5:30
महापालिकेचे मैदान, तलाव, व्यायामशाळा, टेनिस कोर्ट आदी क्रीडा सुविधांच्या भाडेदरात थेट तिप्पट ते चौपट वाढ केली आहे
पिंपरी : महापालिकेचे मैदान, तलाव, व्यायामशाळा, टेनिस कोर्ट आदी क्रीडा सुविधांच्या भाडेदरात थेट तिप्पट ते चौपट वाढ केली आहे. ही दरवाढ कमी करून ती केवळ दुप्पट करण्याचा निर्णय महापालिकेच्या स्थायी समितीने आज घेतला. यासंदर्भात सर्वप्रथम ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध करीत या अन्याय्य दरवाढीस वाचा फोडली होती. भाडे दरवाढीबाबत क्रीडा क्षेत्रातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. अनेक प्रशिक्षक व क्रीडा संघटनांच्या पदाधिकार्यांच्या याबाबतच्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. त्याची दखल घेत स्थायी समितीने हा निर्णय घेतला. नेहरुनगर येथील मेजर ध्यानचंद पॉलिग्रास हॉकी स्टेडिअमचे दिवसाचे भाडे दीड हजारवरून थेट सहा हजार रुपये केले. जलतरण तलावाच्या वार्षिक पासचा दर हजारवरून थेट साडेचार हजार करण्यात आला. दरवाढ अशी भरमसाट न करता टप्प्याटप्प्याने करण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला. हॉकी मैदानाचे भाडे अडीच हजार तर, तलावाचा वार्षिक पास २ हजार रुपयांचा करण्याचा निर्णय समितीने घेतला. याच पद्धतीने इतर दर कमी करण्याचा निर्णय झाला. त्यामुळे खेळाडू व प्रशिक्षकांना दिलासा मिळाला आहे. महापालिकेच्या नव्या क्रीडा धोरणानुसार ही दरवाढ केली गेली आहे. त्याची अंमलबजावणी १० एप्रिलपासून सुरू झाली आहे. त्यामुळे अनेकांनी स्पर्धा संयोजनाचा निर्णय रद्द केला होता. तसेच, उन्हाळी शिबिराची संख्या घटली होती. क्रीडा क्षेत्रात या संदर्भात तीव्र रोष पसरला आहे. या दरवाढीस स्थायी समितीचे अध्यक्ष महेश लांडगे यांनी यापूर्वीच विरोध दर्शविला होता. दरवाढ मागे घेण्याचे पत्र त्यांनी आयुक्त राजीव जाधव यांना दिले होते. क्रीडा, विधी, स्थायी असा प्रवास करीत क्रीडा धोरण १८ जानेवारीच्या सर्वसाधारण सभेत मंजुर झाले. त्यानुसार क्रीडा सुविधा व सेवाच्या दरात वाढ झाली. आयुक्ताकडून अंतिम मंजुरीस विलंब झाल्याने ती १ ऐवजी १० एप्रिलपासून प्रत्यक्ष लागू केली गेली. त्यास तीव्र विरोध झाल्याने ही बाब नगरसेवकांच्या लक्षात आली. (प्रतिनिधी)