परिचारक यांची बडतर्फी मागे; रावतेंनी मागितली सभापतींची माफी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 06:08 AM2019-03-01T06:08:10+5:302019-03-01T06:08:13+5:30
परिचारक यांनी दोन वर्षापूर्वी जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचारादरम्यान विरोधकांवर टीका करताना सीमेवर तैनात जवानांबाबत अपमानास्पद वक्तव्य केले होते.
मुंबई : सैनिकांच्या पत्नीबाबत आक्षेपार्ह विधानामुळे निलंबित करण्यात आलेले भाजपा पुरस्कृत अपक्ष आमदार प्रशांत परिचारक यांची बडतर्फी मागे घेतल्याच्या कारणावरून परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सभागृहात गोंधळ घातला. शिवाय, सभापतींच्या दालनात जाऊन असभ्य भाषा वापरली. मात्र, बडतर्फीवर दिला नसल्याचे समजताच रावतेंनी सभापतींची माफीही मागितली.
परिचारक यांनी दोन वर्षापूर्वी जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचारादरम्यान विरोधकांवर टीका करताना सीमेवर तैनात जवानांबाबत अपमानास्पद वक्तव्य केले होते. त्यांच्या विधानानंतर देशभर संतप्त प्रतिक्रीया उमटल्या. या विधानाची दखल घेत त्यांना विधान परिषदेतून दीड वर्षासाठी निलंबित करण्यात आले होते. गेल्या वर्षी त्यांचे निलंबन मागे घेण्यात आले, परंतु शिवसेना आमदारांनी आक्रमक पवित्रा घेत त्यास विरोध केला होता. शिवसेना गटनेते अनिल परब यांनी परिचारक यांना बडतर्फ करण्याचा प्रस्ताव मांडला होता.
सभापतींनी या प्रस्तावावरील निर्णय राखून ठेवतानाच परिचारकांच्या सभागृह प्रवेशावरील बंदी कायम ठेवली होती. त्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर परिचारक यांना विधानभवनाच्या प्रांगणात येण्यास परवानगी मिळावी, यासाठी भाजपा आमदारांनी सभापतींना पत्रे पाठवली होती. त्याची माहिती देत आज विधानपरिषदेत सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी अनिल परब यांनी दिलेला परिचारकांच्या बडतर्फीचा प्रस्ताव अस्वीकार्य असल्याचे सांगितले. याबाबत गटनेत्यांच्या बैठकीत निर्णय होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र गोंधळामुळे सभापती नेमके काय म्हणाले हे सदस्यांना नीट ऐकू न गेल्याने शिवसेनेसह काँगेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांनी आक्रमक होत संताप व्यक्त केला. सभापतींच्या निवेदनाबाबत गैरसमज झाल्याने रावते दालनात जाऊन अद्वातद्वा बोलले.
मुंडे करणार होते सभापतींची तक्रार
सभापतींनी बडतर्फीची सूचना फेटाळताच शिवसेना आणि विरोधी बाकांवरील सदस्य आक्रमक झाले. या गदारोळात सभापतींची पुढील घोषणा ऐकली गेली नाही. सभापतींनी निलंबनच मागे घेतल्याचा समज झाल्याने सदस्य आक्रमक झाले. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सभापती आणि भाजपाचा निषेध केला. सभापतींचा निषेध करतानाच पक्षश्रेष्ठींच्या कानावर हा विषय घालणार असल्याचेही मुंडे यांनी स्पष्ट केले.