जवानांच्या पत्नीबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या प्रशांत परिचारक यांचे निलंबन मागे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2019 02:37 AM2019-06-21T02:37:01+5:302019-06-21T07:01:32+5:30
विविध पक्षांच्या गटनेत्यांच्या बैठकीत निर्णय झाल्याची सभापतींची माहिती
मुंबई : लष्करातील जवान आणि त्यांच्या पत्नीबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजप समर्थक आमदार प्रशांत परिचारक यांच्या बडतर्फीचा प्रस्ताव फेटाळण्यात आल्याची घोषणा सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी गुरूवारी विधान परिषदेत केली. शिवाय, परिचारक यांचे निलंबन तसेच विधिमंडळ परिसरातील प्रवेश बंदीही मागे घेण्यात आली आहे. विविध पक्षांच्या गटनेत्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे सभापतींनी स्पष्ट केले.
जवानांच्या कुटंबियांबाबत वादग्रस्त विधान केल्यामुळे परिचारक यांच्यावर २०१७ साली निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. याबाबत नेमलेल्या उच्चाधिकार समितीच्या अहवालानंतर २०१८ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात निलंबनाची कारवाई मागे घेण्याचा ठराव सभागृहात संमत करण्यात आला होता. यावर शिवसेनेसह विरोधी पक्षांनी तीव्र विरोध दर्शवला. होता निलंबन मागे घेतल्यानंतर शिवसेनेकडून थेट परिचारक यांच्या बडतर्फीचा प्रस्ताव मांडला होता. सभापतींनी या प्रस्तावावरील निर्णय राखून ठेवला होता. आज गटनेत्यांच्या बैठकीत याबाबत चर्चा झाली. परिचारक यांनी पुन्हा एकदा आपल्या वक्तव्याबाबत दिलगिरी व्यक्त करत जवानांची आणि त्यांच्या कुटुंबियांची माफी मागितली आहे. त्यामुळे साकल्याने विचार करत बडतर्फीचा प्रस्ताव फेटाळत असल्याचे सांगतनाच परिचारक यांना विधिमंडळ आणि सभागृहातील प्रवेश बंदी उठविण्यात आल्याचे सभापतींनी स्पष्ट केले. त्यामुळे परिचारक यांना आता सभागृहातील कामकाजात भाग घेता येणार आहे.