सत्तेत बसलेल्या घटकांकडून प्रोत्साहन मिळत असल्यानं जातीवाचक संघटना बाळसे धरतायत- शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2018 11:08 PM2018-02-21T23:08:03+5:302018-02-21T23:08:26+5:30
महाराष्ट्राचे सामाजिक ऐक्य हरवले जात आहे. विद्वेष वाढत आहे. दुपारी एकत्र डबा खाणारे चार मित्रही जातीचा विचार करत आहेत. माणसा-माणसात जात, धर्म, भाषा यातून दिसणारी कटुता घालविली पाहिजे. पण आज जातीवाचक संघटना बाळसे धरत आहेत. त्याला सत्तेवर बसलेल्या घटकांकडून प्रोत्साहन दिले जात आहे.
पुणे: महाराष्ट्राचे सामाजिक ऐक्य हरवले जात आहे. विद्वेष वाढत आहे. दुपारी एकत्र डबा खाणारे चार मित्रही जातीचा विचार करत आहेत. माणसा-माणसात जात, धर्म, भाषा यातून दिसणारी कटुता घालविली पाहिजे. पण आज जातीवाचक संघटना बाळसे धरत आहेत. त्याला सत्तेवर बसलेल्या घटकांकडून प्रोत्साहन दिले जात असल्याचा आरोप पवारांनी केला आहे.
मात्र, शाहू- फुले- आंबेडकरांचा महाराष्ट्र या रस्त्याने जाणार नाही, असे सांगताना जातींमधील कडवटपणा दूर करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे सांगताना पवार म्हणाले. जागतिक मराठी अकादमीच्या वतीने शोध मराठी मनाचा या उपक्रमाअंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुलाखत घेतली. त्यावेळी ते बोलत होते. बृहन्ममहाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाच्या (बीएमसीसी) प्रांगणावर तब्बल एक तास त्रेचाळीस मिनिटे रंगलेल्या या मुलाखतीला रसिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.
मुंबई, पुण्यातील अर्थकारणावर कब्जा करण्याचा प्रयत्न काही घटक करत आहेत. त्यांना प्रोत्साहित करण्याचे काम देशाचे नेतृत्व करीत आहे. पण कोणी वरून खाली उतरला तरी मुंबई महाराष्ट्रापासून तोडू शकत नाही , असे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष ठणकावून सांगत शरद पवार यांनी राज ठाकरे यांनी मुंबई तोडण्याच्या षड्यंत्र असल्याचे केलेल्या आरोपावर सहमती दर्शविली.
महाराष्ट्र आणि देशातील राजकारणावर शरद पवार यांना बोलते करताना राज ठाकरे यांनी संवादाच्या गाडीचा रोख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिशेनेच रोखण्याचा प्रयत्न केला. यशवंतराव चव्हाणांच्या पिढीचे मूल्याधिष्ठित राजकारण सध्या दिसत नाही, या राज ठाकरे यांच्या प्रश्नावर पवार यांनी मोदींवर हल्ला चढविला. ते म्हणाले, सध्या राजकारणात वैयक्तिक हल्ले केले जात असताना आपण कुठल्या पदावर आहोत याचेही भान राखण्यात येत नाही. जवाहरलाल नेहरुंनी या देशासाठी काहीच केलं नाही असे म्हणणे चुकीचे आहे. या देशातील लोकशाहीला 12व्या शतकात सुरुवात झाली असे वक्तव्य सभागृहात केले गेले. मग इंग्रजांच्या दीडशे वर्षांच्या गुलामगिरीत काय लोकशाही नांदत होती का? अटल बिहारींच्या काळात सभागृहात सर्वांचा सन्मान राखला जात असे. तसा आदर्श त्यांनी संसदेत घालून दिला होता. मात्र आताचे चित्र बदललेलं आहे. प्रत्येक व्यक्तीचा सन्मान करायला हवा. वैचारिक मतभेद असतील तरी टोकाची भूमिका घेऊ नये हे पथ्य आज देशात पाळले जात नाही.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने महाराष्ट्र एकत्र येईल. तो चिरकाल ठेवणारा विचार आहे, यामध्ये शंका नाही. महाराष्ट्र एकसंध ठेवण्यासाठी शाहू, फुले आणि आंबेडकर यांनी खूप काम केले आहे. सामाजिक ऐक्य टिकून ठेवले आहे. राज यांना पवार म्हणाले, सामाजिक ऐक्याच्या लढाईत माझ्या बरोबर तुम्हीही असणार आहात कारण तुमच्यावरही तेच संस्कार आहेत. प्रबोधनकार ठाकरे यांनी नेहमीच ठाकरी भाषेतून समाजातील विघातक प्रवृत्तींवर प्रहार केले. बाळासाहेब ठाकरे यांनीही कधीही जात पाहिली नाही. त्यामुळेच जातीची पाच हजार मतेही नसणाºया चंद्रकांत खैरे यांच्यासारख्या नेत्याला मंत्रीपद दिले, पाच वेळा लोकसभेवर पाठविले.
राज्य चालविण्याइतके देश चालविणे सोपे नाही
नरेंद्र मोदी अत्यंत कष्ट करतात ही त्यांची जमेची बाजू आहे. गुजरातमध्ये त्याचा त्यांना फायदा झाला. पण गुजरात चालविणे आणि भारत चालविणे यामध्ये फरक आहे. देश चालविण्यासाठी टीम म्हणून काम करावे लागते. देशाच्या विविध भागांतून तज्ज्ञ गोळा करावे लागतात. मात्र, सध्याच्या सरकारला हे जमत नाही, असे दिसत आहे. कोणालाही काही करावेसे वाटले तर त्यांना विचारून घ्यावे लागेल, अशी चर्चा दिल्लीत ऐकायला मिळते. हे योग्य नाही.