सरकारात मंत्री असल्यामुळे मी कोणालाही भेटू शकतो - सदाभाऊ खोत
By admin | Published: June 16, 2017 08:26 PM2017-06-16T20:26:48+5:302017-06-16T20:26:48+5:30
सरकारात मंत्री म्हणून काम करत असताना कामानिमित्त मी कोणालाही भेटू शकतो. एकमेकांच्या गाठीभेटी घेणे, संबंध जपणे यामध्ये
ऑऩलाइन लोकमत
इस्लामपूर, दि. 16 - सरकारात मंत्री म्हणून काम करत असताना कामानिमित्त मी कोणालाही भेटू शकतो. एकमेकांच्या गाठीभेटी घेणे, संबंध जपणे यामध्ये वेगळे असे काही नसते. त्यामुळे आपल्याला जर वेळ असेल आणि बोलावणे आलेच तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याबरोबरची भेट होणारच, असा पलटवार कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी खासदार राजू शेट्टी यांच्यावर शुक्रवारी केला.
इस्लामपूर येथे सावकार कॉलनीतील निवासस्थानी खोत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक-खासदार राजू शेट्टी यांनी अमित शहा यांच्या भेटीबाबत ह्यआपल्या आदेशाशिवाय संघटनेचा प्रतिनिधी म्हणून कोणालाही भेटता येणार नाहीह्ण, असे वक्तव्य केल्याच्या पार्श्वभूमीवर खोत बोलत होते.
ते म्हणाले की, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची स्थापना खासदार शेट्टी यांनी केली आहे. ते संघटनेचे सर्वेसर्वा आहेत. त्यामुळे कोणताही निर्णय घेण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे. मी चळवळीत कार्यकर्ता म्हणून काम करतो. खासदार शेट्टी यांनीच यापूर्वी अनेकवेळा संघटनेत अनेक कार्यकर्ते असून, त्यापैकीच सदाभाऊ एक असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे मला कार्यकर्ता, विद्यार्थी म्हणून आयुष्यभर रहायला आवडेल. या संघटनेत मी त्यांचे नेतृत्व मानून काम केले आहे.
अमित शहा यांच्या भेटीविषयी शेट्टींकडून आपल्याशी कसलीही चर्चा झालेली नाही. मंत्री म्हणून काम करत असताना कामानिमित्त भेटीगाठी होणे क्रमप्राप्त असते. माझ्यात कार्यकर्त्याचा गुण असल्यामुळे मानसन्मान न मागता मी भेटीगाठी घेतो. कार्यकर्त्याला लहान-मोठा असा भेदभाव नसतो. तो कार्यकर्ताच असतो, वेळ आली तर सतरंज्या उचलतो. जमिनीवर बसतो. त्याचे कुठल्या पत्रिकेत नाव असलेच पाहिजे असा आग्रह धरत नाही, असा उपरोधिक चिमटाही खासदार शेट्टी यांचे नाव न घेता खोत यांनी काढला.
नेतेपण आले की मानसन्मान येतो. त्यामुळे मला कार्यकर्ता म्हणून राहण्यात स्वारस्य आहे. नेता म्हणून जगायचे नाही. सोमवारी मी मुंबईत असणार आहे. त्यामुळे मला वेळ असला की अमित शहा यांच्याबरोबरची भेट होणारच, असा पुनरुच्चारही खोत यांनी शेवटी केला.