बैलगाडा मालकांचा जल्लोष

By Admin | Published: April 7, 2017 01:02 AM2017-04-07T01:02:57+5:302017-04-07T01:02:57+5:30

राज्यातील बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू करण्याबाबत सादर केलेल्या विधेयकाला विधिमंडळाची मंजुरी मिळाली आहे.

Belagada Owners Shout | बैलगाडा मालकांचा जल्लोष

बैलगाडा मालकांचा जल्लोष

googlenewsNext

मंचर : राज्यातील बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू करण्याबाबत सादर केलेल्या विधेयकाला विधिमंडळाची मंजुरी मिळाली आहे. ग्रामीण भागाची शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या बैलगाडा शर्यती सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बैलगाडा मालकांच्या लढ्याला यश आले असून गावोगावी पुन्हा भिर्रर्रचा आवाज घुमणार आहे.
शर्यतीसंदर्भातील विधेयक पास झाल्यानंतर बैलगाडामालकांनी एकच जल्लोष केला. पेढे वाटून व फटाके वाजवून आनंद साजरा केला. बैलगाडा मालकांनी ‘आजचा दिवस दिवाळी’ असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
तीन वर्षांपासून शर्यती बंद असल्याने ग्रामीण भागात उत्साह नव्हता. यात्रा ओस पडल्या होत्या. बैलगाडामालकांनी आशा सोडली होती. मात्र, राज्य शासनाने बैलगाडा शर्यत सुरू करण्यासंदर्भातील विधेयक संमत करून घेतले. आज सर्व शेतकरी व बैलगाडामालकांच्या नजरा अधिवेशनाकडे लागल्या होत्या.
बैलगाडा शर्यतीसंदर्भातील विधेयक पास झाल्याचे समजताच बैलगाडामालकांनी एकच जल्लोष केला. पेढे वाटून व फटाके वाजवून आनंद साजरा केला. गावोगावी बैलगाडामालक जमून एकमेकांचे अभिनंदन करीत होते. शर्यतीचा निर्णय त्यांच्यासाठी महत्त्वाचा होता. शर्यती सुरू होण्याची ते वाट पाहत होते. शेतकरी व बैलगाडा मालक, शौकीन यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. या शर्यती सुरू होण्यासाठी मंचरमध्ये केलेले आंदोलन विशेष गाजले होते.
>पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, जुन्नर, खेड, शिरूर तालुक्यात बैलगाडा शर्यती लोकप्रिय आहेत. या शर्यतींना शेकडो वर्षांची परंपरा आहे. मंचर शहराच्या शिवाजी चौकात भंडाऱ्याची उधळण करून व फटाके वाजवून जल्लोष करण्यात आला. पेढे वाटून आनंद व़्यक्त केला. निर्णयाचे स्वागत केले.
लोकभावनेचा आदर केला
तमिळनाडू येथील जलीकट्टू स्पर्धेच्या धर्तीवर राज्यातील बैलगाडा शर्यत पुन्हा सुरु करण्याबाबत सादर केलेल्या विधेयकाला विधिमंडळाची मंजुरी मिळाली आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या भावनांचा विचार करुन भाजप सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतला. त्याला सर्वपक्षीय आमदारांनी एकमुखी पाठिंबा दिला आहे. राज्यातील तमाम शेतकरी, बैलागाडा शर्यतप्रेमी आणि बैलगाडा मालकांच्या विविध संघटनांचे प्रतिनिधी यांनी सातत्याने पाठपुरावा केला. शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा असलेला हा खेळ पुन्हा सुरु व्हावा. दोन्ही सभागृहांची मंजुरी मिळाली. त्यावर राज्यपालांची स्वाक्षरी झाल्यानंतर मा. राष्ट्रपती यांच्या मान्यतेसाठी पाठवले जाईल. त्यांची सही झाल्यानंतर हा कायदा राज्यात लागू करण्यासंदर्भात राज्य शासनाकडून अधिसूचना काढली जाईल. त्यानंतर खऱ्या अर्थाने बैलगाडा शर्यती सुरू होतील. या सर्व बाबी लवकरात लवकर पूर्ण होण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्नशील राहू
- दिलीप वळसे पाटील (आमदार)
पुन्हा गंडांतर येऊ नये
बैलगाडा शर्यती या यापूर्वीची सुरू व्हायला हव्या होत्या. तमिळनाडू राज्यात जनतेच्या पाच दिवसांच्या रेट्यानंतर सरकार कायद्यात बदल करून जलीकट्टूला परवानगी देते; मात्र महाराष्ट्र शासनाला शर्यती सुरू करण्यासाठी तीन महिने लागले. हरकत नाही. शर्यत सुरू केल्याबद्दल महाराष्ट्र शासन व विशेषत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन. शर्यतीसाठी राज्य सरकारने जरी कायदा बदलला असला, तरी त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले जाऊ शकते. त्यामुळे बैलगाडामालकांनी यापुढे शर्यतीसंदर्भातील नियम व शर्तींचे पालन करावे. नियमाप्रमाणे शर्यती भरवाव्यात. जेणेकरून, शर्यतींवर पुन्हा गंडांतर येणार नाही. बैलगाडा शर्यती सुरू करण्यासाठी सुरुवातीपासून प्रयत्न केले. न्यायालयाशी लढा दिला. या प्रयत्नांना यश आले आहे. सरकारचे व शेतकरी बांधव बैलगाडामालकांचे मी अभिनंदन करतो.
- शिवाजीराव आढळराव-पाटील (खासदार)
>हजारांचा बैल लाखांच्या घरात
मंचर : ग्रामीण भागात शर्यतीच्या बैलांच्या किमती लाखो रुपयांपर्यंत गेल्या होत्या. अगदी २५ लाख रुपयांपर्यंत एका बैलाला किंमत मिळाल्याची चर्चा होती. शर्यतबंदीनंतर बैलांच्या किमती लगेच ढासळल्या. लाखाचा बैल केवळ १० ते २० हजार रुपयांना मागितला जाऊ लागला. आता शर्यती सुरू होण्याची चिन्हे दिसू लागताच बैलांचे बाजारभावाने उसळी घेतली आहे. बैलांच्या किमती आत्ताच लाखाच्या घरात गेल्या आहेत.
बैलगाडा शर्यतींसाठीचे बैल जत, सांगोला, पंढरपूर, खरपुंडी येथून आणले जातात. खिलार, म्हैसूर या जातींचा त्यात समावेश असतो. सुरुवातीला बैलांना कमी पैसे देऊन आणले जाते. त्याचा मग शर्यतीचा सराव केला जातो. सराव करताना जुना, अनुभवी बैल सोबतीला जोडला जातो.
नवख्या बैलाने चमक दाखविली, की त्याला लगेच मागणी वाढते. अनेक बैलगाडामालक शर्यतीच्या घाटात बसून बैलांची पारख करीत असतात. एखादा बैल त्यांच्या नजरेत भरला, की मग वाटेल त्या किमतीला तो घेण्याचा त्याचा प्रयत्न असतो.
शर्यतीच्या बैलांच्या किमती साधारणत: ५० हजार रुपयांपासून सुरू होतात. प्रथम क्रमांकात येणाऱ्या गाड्याच्या मालकांच्या बैलांना लाखो रुपयांना खरेदी घेण्याची अनेकांची तयारी असते. बैलांच्या खरेदी-विक्रीतून कोटी रुपयांची उलाढाल होते. शर्यतीवरील बंदीनंतर ही उलाढाल थंडावली होती. बैलांच्या किमत कमी झाल्या होत्या. सरावाचा बैल दहा हजार रुपयांना मागितला जात होता.
>शर्यतीचा घाट पुन्हा गजबजणार
मंचर : ग्रामीण भागात पुन्हा एकदा ‘भिर्रर्र झाली.... झाली... उचलली एक सेकंद बारा’ असा पहाडी आवाज शर्यतीच्या घाटात घुमणार आहे. बैलगाडा शर्यती सुरू होणार असल्याने ओस पडलेले बैलगाडा शर्यतींचे घाट पुन्हा गजबजणार आहेत. गावोगावचे सुसज्ज बैलगाडा घाट शर्यतीसाठी लवकरच सज्ज होतील.
ग्रामदैवतांच्या यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यत आयोजित करण्याची परंपरा आहे. त्यासाठी बहुतेक गावांलगत शर्यतीचे घाट आहेत. साधारणपणे १ हजार फूट अंतराची धावपट्टी असते. पूर्वी असे घाट दगडात बांधले जायचे. आता मात्र आधुनिक पद्धतीने सिमेंट-काँक्रीटचा वापर करून घाट बनवण्यात आले आहेत.
या सुसज्ज घाटात यात्रा पार पडत होत्या. उत्साही ग्रामस्थ या घाटांची विशेष काळजी घेत होते. पावसाळ्यात घाट वाहून जाऊ नये, यासाठी बांध घालण्यापासून अगदी घाटाची रंगरंगोटीसुद्धा करण्यात आली आहे. पंचांसाठी वेगळे स्टेज असते, तर मान्यवरांनासुद्धा बसण्यासाठी वेगळी व्यवस्था असते. तीन वर्षांपासून शर्यती बंद असल्याने शर्यतीचे घाट अक्षरश: ओस पडले होते. या घाटाकडे कोणीही फिरकत नव्हते. शर्यतीवर बंदी असल्याने त्याचे कोणीही उल्लंघन करू नये, यासाठी प्रशासन काळजी घेत होते.
बैलगाडा शर्यतीसंदर्भात कायदा आज एकमताने मंजूर झाला आहे. काही नियम व अटींवर शर्यतींना परवानगी मिळाली असून त्यांचे पालन करून शर्यतीचा आनंद लुटतील. शेतकऱ्यांना आज कर्जमाफीपेक्षा जास्त आनंद झाला आहे. अखेर भाजपा-सेनेने शर्यत जिंकली आहे़ आज खऱ्या अर्थाने अच्छे दिन आले आहेत.
- जयसिंग एरंडे, बैलगाडामालक
बैलगाडा मालकांसाठी आजचा दिवस आनंदाचा आहे. सर्वसामान्य माणूस आज आनंदात असून यापुढे ग्रामीण भागात सदैव आनंदाचे वातावरण राहील. बैलगाडा हा शेतकऱ्यांसाठी एकमेव आनंदाचा व विरंगुळ्याचा क्षण आहे. शासनाने बैलगाडा शर्यती संदर्भात घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करतो.
- सुखदेव शेटे, बैलगाडामालक
बैलगाडा चालू झाला हा शेतकऱ्यांचा फार आनंदाचा दिवस आहे. बैलगाडामालक बैलांना पोटच्या मुलाप्रमाणे जीव लावतो. शेतकरी काबाडकष्ट करून जो आनंद पाहावयाचा मिळतो, तो आनंद बैलगाडा शर्यतमालकांना जीवनामध्ये आनंद देतोे. शेतकऱ्यांना कर्जमाफीपेक्षा जास्त आनंद बैलगाडा शर्यतीतून मिळणार आहे.
- राजेंद्र शेवाळे, बैलगाडामालक
>बैलगाडामालकांनी
नियमांचे पालन करावे
बैलगाडा शर्यती सुरू झाल्याबद्दल खूप आनंद वाटला. बैलगाडा शर्यतीसंदर्भात ज्या अटी व शर्ती आहेत, त्यांचे पालन बैलगाडामालकांनी करावे. नियमांचे उल्लंघन करू नये. ग्रामीण भागात आनंदाचे वातावरण आहे. शर्यती कायमस्वरूपी सुरू राहिल्या पाहिजेत. आम्ही शर्यती सुरू व्हाव्यात म्हणून आतुर होतो.
- शिवाजी निघोट, बैलगाडामालक, निघोजवाडी
>गेलेला आनंद परत आल्याची भावना
सर्वपक्षीय नेत्यांच्या लढ्याला यश आले आहे. बैलगाडामालक आज सर्वांत जास्त खूष आहे. बैलगाडामालकांच्या जीवनात आनंद पुन्हा परत आला आहे. महाराष्ट्र शासनाचे आम्ही अभिनंदन करतो. बैलगाडा शर्यतीची परंपरा कायमस्वरूपी सुरू राहावी. नियम व अटींचे पालन सर्वांनी करावे. म्हणजे शर्यती बंद होणार नाहीत.
- के. के. थोरात, बैलगाडामालक, मंचर

Web Title: Belagada Owners Shout

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.